Friday, August 14, 2009

कुणी निंदा कुणी वंदा आमचा ब्लॉग लिहीण्याचा धंदा

रविवारचा दिवस. म्हणजे बेड पे लोळने का वार. भल्या पहाटे साडे दहा वाजता आळोखे पिळोखे देत उठलो. मनाशीच म्हटल, चला, ब्लॉगवर काही तरी एकदम धांसू लिहु की कमीत कमी 7-8 कॉमेंट्स तरी आले पाहिजेत. तोच एक आवाज आला,
"गप्प बस रे मुर्खा.."
दचकून इकडे तिकडे पाहिल तर कुणीच नव्हत. बायको सकाळीच बाजारात भाजी आणायला गेली होती. जरी ती जगातल्या सर्व बायकांप्रमाणे स्वत:च्या नवर्‍याला मूर्ख समजत असली तरी इतक्या उघडपणे माझ्यावर खेकसणार नाही याबद्दल मला खात्री होती.
" इकडे तिकडे काय बघतोयस मूर्खासारखा??"
च्यामारी पुन्हा मूर्ख? सकाळी सकाळी इज्जतचा भाजीपाला?? आता काहीतरी केलच पाहिजे.
" च्या मारी, कोन हाय थित? कवादरना मूर्ख बोलून र्‍हायलाय"..
जोर दाखवायचा असेल तर मी अस अधून मधून ग्रामीण मराठीत बोलतो. पुणेरी मराठीतून शालजोड्यातला ठेवून देता येत, पण जोर हवा तर रांगडी ग्रामीण मराठीच उपयोगाला येते. त्यात एक दोन फुल्यावाले शब्द असतील तर अजुनच जोर चढतो.
"गप्प बस.... कसला विचार करतोयस सकाळी उठल्या उठल्या... मूर्खासारखा..."
आयला, याला कस कळल की मी विचार करतोय ते? नीट आठवल तर आवाज माझ्या आवाजासारखाच होता. अंतरात्म्याचा आवाज अंतरात्म्याचा आवाज म्हणतात तो हाच की काय? इथे आवाज तर येत होता पण हिंदी सिनेमात जसे आरशात दुसर रूप दाखवतात तसे दुसरे रूप काही इथे दिसत नव्हते. म्हटल आरशात जाऊन पहावे मग दिसेल दुसरे रूप.
"काही गरज नाहीय आरशात जाऊन पाहायची..."
आता तर 100% confirmed की हा माझ्या अंतरात्म्याचाच आवाज. म्हटल आलाच आहे आतला आत्मा बाहेर तर साधावा संवाद त्याच्याशी.
" काय रे बाबा? माझाच आतला आवाज असून मलाच मूर्ख का म्हणतोयस?"
" नाहीतर काय? कसला विचार करत होतास सकाळी उठल्या उठल्या?"
" कसला म्हणजे? ब्लॉगवर काहीतरी पोस्ट करायचा"
" आणि?...."
" आणि काय?..."
" 7-8 कॉमेंट्स चा विचार नव्हतास करत?"
" हम्म्म्म.... मग त्यात काय चुकल?"
" काय चुकल? म्हणजे तू फळाची अपेक्षा ठेवून कर्म करतोयस....."
" मग.. कॉमेंट्स ची अपेक्षा केली तर काय फरक पडतो? कॉमेंट्स आल्याशिवाय कळणार कस की मी चांगला लिहितो की वाईट ते? बाकीची लोक कॉमेंट्स नाही आली की आपल्या प्रोफाइल मध्ये लिहितात की मी हा ब्लॉग कॉमेंट्स साठी लिहतच नाहीय मुळी. आपल्याला बाबा नाही जमणार ते... गायकाला कसा फीडबॅक टाळ्यांनी मिळतो तसा ब्लॉग लेखकाला कॉमेंट्सनी मिळतो. मग कॉमेंट्स नको यायला?"
" तुझ्या लेखनाला लोकांनी का म्हणून कॉमेंट्स द्याव्यात? अस आहे तरी काय तुझ्या लेखनात..?"
" का म्हणजे?"... आता मला काही सुचेनास झाल. तरीही मी आपल घोड पुढे दामटवले
" का म्हणजे?... इतक्या वेगवेगळ्या विषयांवर इतक सर्वांगसुंदर, सुलभ लेखन. अगदी इंग्लीश मीडियम मधले लोक सुद्धा वाचून खुश होतात. थेट हृदयाला भिडणार लेखन आणि ते ही मोफत... माझ लेखन म्हणजे..... "
माझ बोलण अर्धवट तोडत माझा आतला आवाज खो खो करून हसायला लागला. मी एकदम फर्स्ट क्लास आणि रुचकर जेवण बनवू शकतो अस जेव्हा जेव्हा म्हणतो तेव्हा तेव्हा माझी बायकोही असच खो खो करून हसते. आपल हस दाबत तो म्हणाला.
" अस? मग तुझ्या प्रत्येक पोस्ट च्या 'बंद करा' बॉक्स वर कोण का क्लिक करत आहे"
आईई ग्ग्ग्ग.. एकदम माझ्या दुखर्‍या नसेवर त्याने हात ठेवला.मी ब्लॉग प्रसिद्ध केल्यापासून ते आजतागायत, माझ्या प्रत्येक पोस्टवर कोणीतरी 'बंद करा' च्या बॉक्स वर क्लिक करतोय. मी समजू शकतो जर मराठी मीडियम आणि रावसाहेबसारख्या पोस्ट ने त्याच्या/तिच्या भावना दुखावल्या असतील पण अगदी मी माझ्या कोकणातल्या दिवसावर पोस्ट टाकली त्यावर सुद्धा 'बंद करा' म्हणून क्लिक केल गेलय. मला समजत नाहीय की तो बंद का करावा हे कॉमेंट टाकून का सांगत नाहीय ते.
" का ते मला माहीत नाही. जो पर्यंत तो वा ती व्यवस्थित कॉमेंट लिहत नाही तो पर्यंत मी त्याकडे दुर्लक्षच करणार"
" एक सल्ला देऊ? "
" फुकटचे सल्ले देणार्‍या शतमुर्खा... मगितलाय कोणी तुझा सल्ला? ठेव तुझ्याजवळच" - मी मनातल्या मनात.
" तुला नकोय तरी हा शतमूर्ख तुला सल्ला देणार आहे"
अरेच्चा विसरलोच होतो की याला माझ्या मनात विचार केलेल समजत ते.
" सल्ला असा आहे की कॉमेंट्स ची अपेक्षा करून लिहण्यापेक्षा लिहिण बंद कर"
घ्या. देऊन देऊन काय सल्ला दिला तर म्हणे कॉमेंट्स ची अपेक्षा करून नका.
"नकोय मला तुझा सल्ला. ठेव तुझ्यापाशीच"
" अरे माझ म्हणणे पूर्ण ऐकून तर घे. कॉमेंट्स ची अपेक्षा ठेवून लिहु नकोस. लिखाणातील मजा अनुभवण्यासाठी लिहीत जा. मनातली तगमग व्यक्त करण्यासाठी लिहीत जा. कॉमेंट्स चा विचार करून लिहिलेली पोस्ट्स नंतर वाचल्यावर तुला तरी त्यावर कॉमेंट्स द्यावसा वाटतो का?"
"खरय. नंतर मी माझी पोस्ट्स जेव्हा वाचतो तेव्हा पहिला विचार येतो की शी काय लिहिलायस हे?"
" म्हणूनच म्हणतो की लिखाणाची मजा अनुभव. ती नक्कीच तुझ्या लिखाणात उतरेल आणि लोकांना ती नक्कीच आवडतील. त्यांना आवडली की कॉमेंट्स नक्कीच टाकतील. त्या अनिकेत, महेन्द्र, अपर्णा चे ब्लॉग्स बघ. वाचल्यावर वाटत ना कॉमेंट्स द्याविशी? "
हम्म्म्म. त्याच बोलण तर पटल. आत्ता यापुढे कॉमेंट्स साठी लिहिण बंद. एन्जॉय करत लिहायच. चांगला लेख झाला तर 'बंद करा' म्हणणारा सुद्दा बंद करा म्हणणार नाही.
" काही विषय सुचतोय का? " मी विचारात असतानाच माझ्या आतल्या आत्म्याचा आवाज आला
" अ नाही. कंपनी मधल्या गमती जमतीवर लिहु का?"
" अरे त्या सॉफ्टवेर मधली लोक सोडली तर कोणाला कळणार आहेत का?"
" मग माझ्या लग्नाची गोष्ट लिहु ?"
" का तुझ लग्न म्हणजे काय ऐश्वर्या अभिषेकच लग्न आहे का?"
" अरे म्हणून काय झाल? बर तूच सुचव काही विषय"
" "
" अरे सुचव ना, मी सुचवलेल्या सगळ्या विषयांवर काट मारलीस"
" "
" अरे आत्ता गप्प का? बोल ना काही तरी"
" "
माझा आतला आवाज एकदम बंद का झाला म्हणून मागे पाहील तर बायको उभी होती. आररेच्चा, ही बाजारातून आल्याच मला कळल कस नाही?

तिच्या चेहरा म्हणत होता, " माझा नवरा अस स्वत:शीच काय बडबडतोय........ मूर्खासारखा"

8 comments:

Ajay Sonawane said...

१ नंबर लिहलंयस तु..खुप खुप आवडलं..एकदम हलकंफुलकं..लेख खुप छान आहे , फक्त आज रविवार नाहि शनिवार आहे. :-)

बाय द वे, ब्लॉग बंद करा हा ऑप्शन कुठे आहे ? ही ही ही..just kidding !

-अजय

Mahendra Kulkarni said...

hi pahili comment.. good post... :)

me said...

wachun kharach comment dyavishi vatli.. pan ekdum suchat nahiye kaay lihayche ithe.. jaude.. "sahi", "good one" etc. etc. typical lihinya peksha.. fakt "avadla" asa tick karne jast sope aahe :)

mugdha said...

hey..masta lihilays re tu!! aani nehamich chhan lihitos...blog banda kara ha optionach theu nakos mhanje jhala..:)

Yani said...

chan sunder! mast lihilas, tujhya bhashevarche prabhutva pahun sahee vatale. I know comments milalyavar lai bhari vatate!!!

अपर्णा said...

खरं सांगु का?? एकदा ब्लॉग लिहायला लागलं की कॉमेन्टस मिळाव्याश्या वाटतात. कॉमेन्ट्स मिळाल्या की पुढे काही लिहावसं वाटतं. अशा वेळी नेमकं काही सुचतही नाही. पण लिहितो. मग पुन्हा कॉमेन्ट्स मिळाव्याशा वाटतात. नाही आल्या की खरंच कसं वाटतं हे किती हलक्या आणि फ़ुलक्या भाषेत मांडलस यार...तोडलंस....

सतीश गावडे said...

सही लिहिलंयस मित्रा... थोडयाफार फरकाने सगळ्या जालखरडयांना (bloggers :ड) अगदी असंच वाटत असेल...

मलाही कधी कधी असं वाटतं पण मग मी लगेच गीतेमधील ते सुप्रसिदध वचन फेरफार करुन स्वत:लाच ऐकवतो, "जालखरडयांनी जालनिशीवर खरडत जावे. प्रतिक्रियांची अपेक्षा करू नये"...

त्या अनिकेत, महेन्द्र, अपर्णा चे ब्लॉग्स बघ. वाचल्यावर वाटत ना कॉमेंट्स द्याविशी? याच्याशी एकशे एक टक्के सहमत...

नसती उठाठेव said...

अहो हे "बंद करा" कॉमेंट वैगरे मनावर नाही घ्यायचे. जो पर्यंत "बंद करा" कॉमेंट्स ची संख्या बाकी कॉमेंट्स पेक्षा कमी आहे तोवर काही प्रॉब्लेम नाही. आपल्या धंद्याच्या भाषेत बोलायचे तर

do
{

असेच... कधीतरी..... काहीतरी....

}while(BandKara_Comments < Other_Comments);

:-)

असेल कोणीतरी "येडxx आणि गावात नवा". शिकेल हळूहळू चांगल्या कॉमेंट लिहायला. बाकी पोस्ट मस्त आहे. झकास!!!