Friday, April 30, 2010

फोर्ट ब्रॅग

माझी मोटरसायकल बहुतेक माझ्यावर रुसली होती. हजार वेळा स्टार्ट करूनदेखील स्टार्ट होत नव्ह्ती. जॉय आणि मी होण्डा व्ही टी एक्स १३०० एस चे सगळे फोरम्स वाचून काढले होते. स्पार्क प्लग बदलले, धक्का स्टार्ट, जम्प स्टार्ट करायचा प्रयन्त केला, पण तरीही ती सुरू होईना. शेवटी जॉय ने पेटकॉक पासून निघालेला छोटा वॅक्युम पाईप पाहिला. तो पुन्हा जोडल्यावर ती फुरफुरत स्टार्ट झाली. बहुतेक आठवडाभर बाहेर न नेल्यामुळे रुसली होती. म्हणून विकांताला तिला कुठेतरी लांब फिरायला न्यायचं ठरवलं.

जॉय/प्रिति आणि पियुश यांनी जवळपास २०० मैलांवर असलेल्या फोर्ट ब्रॅग येथे जायचं ठरवलं. शनिवारी भल्या पहाटे ९:३० वाजता जॉयच्या घरी भेटायचं ठरलं. इतर राईड्स प्रमाणे ही राईड मध्यरात्री ६:०० वाजता सुरु न झाल्याने मी तसा आनंदी होतो :) जॉयच्या घरी जॉयचा मित्र वैभव याने बनवलेली ऑम्लेट्स आणि कॉफी हादडून शेवटी ११:३० ला आमची राईड सुरु झाली. हो ना करत शेवटी वैभव, पूजा आणि त्यांची क्युट ८ महिन्यांची मुलगी सिमी कारमधून आमच्या बरोबर यायला तयार झाले. जॉय/प्रिती त्यांच्या १८०० सीसी च्या होण्डा गोल्डविंग वर, पियुश त्याच्या होण्डा व्हीएफ़ार ८०० सीसी वर आणि मी माझ्या होण्डा व्हीटीएक्स १३०० सीसी वर असा आमचा लवाजमा निघाला.


सुरुवातीला मुक्तमार्ग १०१ वर जवळपास २ एक तास चालायचं होतं. मुक्तमार्गावर मोटरसायकल चालवणं यासारखं बोरिंग काम या जगात दुसरं कोणतच नसेल. सुरुवाती सुरुवातीला हाय स्पीड ची मजा वाटायची पण आता नाही :( त्यात १०१ मार्गावर या हाय स्पीड मुळे माझं इंजिन कव्हर निखळून पडलं. बहुतेक स्पार्क प्लग लावल्यावर मी घट्ट बंद केलं नव्हतं. मी बाकिच्यांना थांबायला सांगेपर्यंत आम्ही जवळपास अर्धा पाऊण मैल पुढे आलो होतो. मुक्तमार्गावर मागे जाऊन रस्त्याच्या मधोमध पडलेलं कव्हर उचलणे म्हणजे मरणाला स्वत:हून मिठी मारण्यासारखं होतं, म्हणून शेवटी तसच पुढे जायचं ठरलं. त्यात माझ्या मोटरसायकलची पेट्रोल टाकीची क्षमता फक्त ५ गॅलन (जवळपास १९ लिटर) आहे. पुढे घाटात पेट्रोलपंप असेल की नाही याची गॅरण्टी नव्हती, त्यामुळे आमचं दिसला पम्प की भर पेट्रोल असं चालू होतं.

शेवटी एकदाचा १०१ मुक्तमार्ग संपला. आम्ही दुपारचा लंच केला आणि हाय्वे १२८ च्या घाटाला लागलो. आता फोर्ट ब्रॅग येईपर्यंत या घाटात चालायचं होतं. दोन्ही बाजूला दाट झाडी आणि वळणावळणांचा रस्ता, आत्ता कुठे राईडची मजा यायला सुरुवात झाली होती. पियुश एकदम धूम स्टाईलने पुढे दिसेनासाही झाला. बाकीच्या तीन गाड्या एकत्र चालल्या होत्या. शेवटी एका जागेवर पियुश आणि आम्ही एकत्र आलो आणि फोटो सेशन सुरु केलं.


जवळपास २४० मैल चालवल्यावर आम्ही फोर्ट ब्रॅगला पोचलो. फोनवर बुक केलेलं मोटेल बाहेरून तरी आमच्या पसंतीस उतरलं नव्ह्तं. पण दुसरी काही व्यवस्था होण्यासारखी नसल्यानं आम्ही तिथेचं राहायचा निर्णय घेतला. त्या माणसाने पर नाईट रेट म्हणून ६५ डॉलर लिहिला. प्रिती ने सांगितलं कि फोनवर ४५ सांगितलं होतं, तेव्हा त्याने ६५ खोडून ४५ लिहिलं :) रूम्स ठिकठाक होत्या. बाहेर पार्किंगमध्ये मला एक इंटरेस्टिंग हार्लेचा साईड स्टॅण्ड दिसला. तुम्हीही पहा :)



संध्याकाळी आम्ही जवळच्याचं ग्लास बीचला सनसेट पाहण्यासाठी गेलो होतो. त्या ग्लासबीच वर एक बीअरची बाटली वगळता दुसरा कुठलाही ग्लासचा तुकडा दिसला नाही. सनसेट पाहून आणि थोडे फोटो काढून आम्ही मोटेलवर परतलो.
रात्री जेवणानंतर गप्पा मारता मारता झोपी गेलो. त्या जागेवर बीचवर जाण्याव्यतिरिक्त दुसरे करण्यासारखे काहीही नव्हते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोणतातरी वेगळा मार्ग पकडून घरी जायचं ठरलं.

सकाळी जवळच्याच एका रेस्टॉरंट मध्ये एकदम पोटभरून नाश्ता झाला. नाश्ता केल्यावर आम्ही आमच्या मार्गी लागलो. नवीन रस्ता देखील घाटाघाटांचा आणि दोन्ही बाजूला गर्द झाडी असणारा होता. जवळपास अर्धा तास चालल्यावर एका जागी फोटो शूट साठी थांबलो. कॅमेरा घेण्यासाठी टॅंन्क बॅग काढायला गेलो आणि पाहतो तर काय, टॅंन्क बॅग नव्हतीच पेट्रोलच्या टाकीवर. थोडक्यात मी ती रेस्टॉरंट मध्येच विसरलो होतो. माझ्या बाईकवर जाण्यापेक्षा ट्विस्टीमास्टर पियुशच्या बाईकवर जाणे हा वेगवान मार्ग होता. मी आणि पियुश परत गेलो आणि बाकीची जनता तिथेच फोटो काढत थांबली. माझ्या नशीबाने रेस्टॉरंटवाल्यांनी ती बॅग जपून ठेवली होती. पियुशच्या बाईकवर गेल्यामुळे आम्ही अर्ध्या तासाचा रस्ता जवळपास वीस मिनिटातच कव्हर केला :)

परत येताना आम्ही क्लिअर लेक स्टेटपार्क मध्ये थोडा वेळ थांबलो. नंतर पुढचे ६० मैल आम्ही एकमेकांच्या बाईक्स चालवल्या. मी जॉयची, जॉयने पियुशची आणि पियुशने माझी बाईक चालवली.



नंतर घरापर्यंतची राईड पुन्हा मुक्तमार्गावरची असल्याने बोरिंग होती :( रात्री ८:३० वाजता आम्ही घरी पोचलो. जवळपास ५२५ मैलांची आम्ही दोन दिवसांत रपेट केली. दुर्दैवाने माझा फोटोशॉप असलेला लॅपटॉप खराब झाला असल्याने अजून फोटो प्रोसेस केलेले नाहीत. वरच्या फोटोंचं क्रेडिट जॉय आणि प्रितीला जातं :)

तर पुन्हा भेटू असेच... कधीतरी.... कुठेतरी ...

Sunday, March 21, 2010

Life at 150kmph

मस्तपैकी चहा ढोसत मुंबई ईंडियन्सची इनिंग सुरू व्हायची वाट बघत होतो. तेवढ्यात जॉय चा मेसेज आला की गोल्डविंगर ग्रुप ची मीट आहे आणि त्यानंतर कुठेतरी रपेटीला जायचा बेत आहे. मी जाऊ की नको हा विचार करत होतो. तेवढ्यात सचिन ने स्टेन ला खणखणीत ३ चौके लावले आणि माझी द्विधा मन:स्थिती अजूनच वाढली. पण सचिननेच बाद होऊन माझी द्विधा मन:स्थिती दूर केली. कॅमेरा टॅन्क बॅग मध्ये टाकला, रायडिंग जॅकेट, पॅण्ट, ग्लोव्ज आणि हेल्मेट चढवले. बायको अजून झोपलेलीच होती. तिला सांगितलं कि मी चाललोय घर सोडून, तर झोपेतच म्हणाली कि बरं जा म्हणून. :) बाहेर आलो आणि मारली किक मोटरसायकलला (म्हणजे बटन स्टार्ट केली, च्या मारी माझ्या बाईकला किकच नाहिय)

मी पोचलो आणि १५-२० १८०० सीसी गोल्डविंग बाईकच्या मध्ये माझी VTX १३०० सी सी उभी केली. त्या दैत्यांसमोर माझी मोटरसायकल एकदम कुक्कुलं बाळ वाटत होती.




जॉय आणि प्रिति अगोदरच तिथे पोचले होते. सगळ्यांशी ओळख झाली. सगळे कमीत कमी ५० च्या वरचे म्हातारे म्हाताऱ्या होत्या पण बाईक चालवायचा उत्साह एकदम दांडगा. अर्ध्याहून अधिक लोकांकडे मोटरसायकल चालवताना एकमेकांशी बोलण्यासाठी हेल्मेटमध्ये इंटिग्रेट केलेले रेडिओ सेट होते. जवळपास प्रत्येक गोल्डविंगमध्ये सीडी प्लयेअर आणि जीपीएस होता. एका सुजान नावाच्या म्हातारीकडे बहुतेक या जगातली सर्वात रंगीबेरंगी गोल्डविंग होती. हा पहा तिचा तिच्या मोटरसायकलसहीत फोटो. किरण, ही बाईक म्हणजे a car on two wheels आहे.



मीटिंग नंतर माऊंट हॅमिल्टन येथे जायचे ठरले. साधारण ८० मैलांचा घाटात रस्ता होता. १०-१५ मैल, हायवेवर १८०० सीसी गोल्डविंग्सशी बरोबरी करताना नाकीनऊ येत होते. ते सर्वजण १००+ मैल/तास (१६० किमी/तास) ने चालवत होते. मी माझ्या लिमिटमध्ये(९५ मैल/तास) राहूनच त्यांना फॉलो करायचे ठरवले. फ़्री वेवर १० मोटरसायकल्स स्टॅगर्ड फॉर्मेशन मध्ये एका लेन मध्ये धावताहेत हे दॄष्यचं मोठं विलोभनीय होतं. तो आवाज ऐकून आमच्या लेनमधील मोटारी एक एक करत बाजूला होऊन आमच्यासाठी लेन मोकळी करून देत होत्या. १० मैलांनंतर घाटातला रस्ता सुरू झाला आणि मला माझ्या पुणे-मुंबई-गोवा राईडची आठवण झाली. कशेडी, परशूराम घाटात जशी नागमोडी वळणे होती अगदी तशीच इथेही होती पण जवळपास ८० मैल तसेच चालवायचे होते. त्या वळणांवर ३१५ किलो ची बाईक चालवताना भारीच मजा येत होती.

२५-३० मैलानंतर आमच्या लीडरने थांबायची खूण केली. त्यांना रॅन्च मध्ये घोडे दिसले. मग एक फोटो ब्रेक झाला. सगळे म्हातारे म्हाताऱ्या घोड्यांना काही ना काही खायला देऊ लागले.


१२० हॉर्सपावर असलेल्या गोल्डविंग्चे मालक मालकीणी ४ हॉर्स ना चणे खायला देताहेत हे पाहून १ हॉर्सपावर अशी दात काढून हसली.

तिथून निघालो आणि पुन्हा मार्गी लागलो. रस्ता आता अजूनच अरुंद होत चालला होता. मधली येलो लाईन नाहीशी झाली होती आणि रस्ताभर माती पसरली होती. फ्रीवेवर १०० च्या स्पीडने चालणारे आता २५-३० च्या स्पीडवर आले होते. रस्त्यात असणाऱ्या ऑब्स्टॅकल्स ची एकमेकांना जाणीव करून देत होते. एकदम शिस्तीत एकामागून एक चालले होते. ५० एक मैलानंतर एका रेस्टॉरंट जवळ एक ब्रेक घेतला. निसर्गसानिध्यात आत्तापर्यंत ३ तासांची राईड झाली होती, पण तरीही निसर्ग हाक देतच होता. रायडिंग जॅकेट आणि जीन्स वर रायडिंग पॅण्ट घालून निसर्गाच्या हाकेला ओ देण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. रायडिंग पॅण्ट्ची झिप अनझिप करून मी ’ते’ शोधायला लागलो आणि मग लक्षात आलं की अजून एक लेयर अनझिप करावी लागणार :)

या राईड साठी मी मला टाईट होणारा बाईकनोमॅडचा टी-शर्ट घालून गेलो होतो. माझ्या बाइकनोमॅड च्या मित्रांनो, bikenomad rides go international. हा त्याचा पुरावा


तिथून जॉय आणि मी लवकर निघालो आणि बाकिच्या लोकांचा फोटो काढण्यासाठी एक मोक्याची जागा पाहून थांबलो. मग येणाऱ्या बाईकर्स चे असे फोटो काढले.

शेवटी माऊंट हॅमिल्टन च्या माथ्यावर पोचलो. एक ग्रुप शॉट घेतला, थोड्या गप्पा मारल्या आणि पांगलो. जॉय आणि मी थोडी फोटोग्राफी करत थांबायचं ठरवलं आणि बाकीच्या ग्रुप ला बाय बाय केलं. ते पुढे निघून गेले आणि मग आम्ही ब्रेक घेत घेत फोटोग्राफी करत परत आलो.


ट्रिपचे सगळे फोटो पाहण्यासाठी खाली टिचकी मारा.

http://www.flickr.com/photos/pappupp/sets/72157623660591012/

Wednesday, January 13, 2010

टांगलंय

भारत वारीवर असताना मीनल आणि सिद्धार्थ ने टॅगलं, पण ईमेल न बघितल्याने ते तसच टांगून राहिलं. आता दोन तास काही खतरनाक उत्तरं लिहिता येतील का हे विचार करण्यात घालवले, पण जेट लॅग डोळ्यावर असल्याने फारसं काही सुचलं नाही, म्हणून ही सरळसोट उत्तरं.



1.Where is your cell phone?

माझा सेलफोन नाहीय. आहे तो ऑफीस तर्फे दिलेला आहे. ११ सेलफोन हरवाल्यानंतर स्वत:चा फोन ठेवण्याची छाती होत नाही :)

2.Your hair?

भारतातून परत येताना मस्तपैकी बारीक करून आलोय. आता अजून २ महिने तरी चिंता नाही. जायच्या अगोदर ३ महिने केस कापले नव्हते. माझे केस बघून माझा भारतातला न्हावी म्हणाला की साहेब तुमचे केस वाढल्यावर लय डेंजर दिसतात म्हणून :)

3.Your mother?
इमोशनल अत्याचार!! आता भारतात गेलो तेव्हा तिला सांगितलं नव्हतं, सर्प्राइज़ विज़िट होती. बघून खूष झाली तरी बाकी सगळ्यांना सांगताना माका येकट्याकच तेवडा सान्ग्लानी नाय म्हणून इमोशनल अत्याचार चालला होता.

4.Your father?
देवमाणूस. दिवसातले ४ तास तरी देवपूजेत घालवायचे. आता देवाच्यादारी जाऊन देवाच्या चरणी सेवा अर्पण करताहेत.

5.Your favorite food?
Anything spicy, पण जीव की प्राण म्हणजे वरण-भात, चपाती आणि गोड्या बटाट्याची भाजी. उरलेलं आयुष्य मी एवढ्या चार गोष्टींवर जगू शकतो.

6.Your dream last night?
कालचं आठवत नाही पण काही दिवसांपूर्वी एक ब्लॅक अँड व्हाईट स्वप्नं पडलं होतं.

7.Your favorite drink?
चहा

8.Your dream/goal?
काहीही नाही. मी काही महत्वाकांक्षी मनुष्य नाही आहे. येणारा दिवस मजेत जावा एवढं एकच स्वप्न.


9.What room are you in?
भाड्याच्या खोलीतला हॉल.


10.Your hobby?
फोटोग्राफी आणि मोटरसायकल वर दूर दूर चा प्रवास.

11.Your fear?
भूते खेते. विश्वास नाही पण भीती मात्र वाटते. हॉरर सिनेमे बघायची अजून हिंमत होत नाही आपली

12.Where do you want to be in 6 years?
क्र. ८ चे उत्तर पहा :)

13.Where were you last night?
घरीच होतो (स्वत:च्याच)

14.Something that you aren’t diplomatic?
कधीच नाही. मनात आणि ओठांवर एकाच गोष्ट असते आपल्या.एक वेळ बोलणार नाही पण डिप्लोमॅटिक बोलणं जमत नाही.

15.Muffins?
गोड खाण्यापासून मैल भर दूर राहतो :)

16.Wish list item?
कॅमेरयासाठी $१०००० ची एक लेन्स

17.Where did you grow up?
आमची मुंबई


18.Last thing you did?
सोफ्याच्या कूशन ला कवर घातली


19.What are you wearing?
टी शर्ट जीन्स आणि सॉक्स

20.Your TV?
सॅमसंग चा ४०" एच डी टी वी


21.Your pets?
None..

22.Friends
Lots of them...

23.Your life?

जगा आणि जगू द्या. अल्प संतोषी माणूस.

24.Your mood?
jetlagged.

25.Missing someone?
होय. बायकोला. अजून भारतात आहे


26.Vehicle?

Nissan Altima 2.5 S

27.Something you’re not wearing?
शेरवानी. कशी घालणार? १९ मध्ये टी शर्ट जीन्स आणि सॉक्स अगोदरच घातलेत ना :)

28.Your favorite store?
Any electronics store.

29. Your favorite color?
black



30.When was the last time you laughed?
३ ईडियट्स चं बलात्कारी स्पीच ऐकून :)


31.Last time you cried?

१९९३ जेव्हा वडिलांचा स्वर्गवास झाला.

32.Your best friend?

सचिन. तेंडुलकरांचा नाही सावंतांचा. गिनी आणि जॉयसी

33.One place that you go to over and over?
flickr.

34.One person who emails me regularly?
गिनी

35.Favorite place to eat?
अंजप्पर, ऑलिव गार्डन, बनाना लीफ

मी हेरंब ओक याना टॅगतोय