Tuesday, August 4, 2009

खेड्यामधले घर कौलारू -1

अनिकेतच्या कोकणातल्या आठवणी वाचल्या माझ्या मनात निद्रिस्त असलेल्या कोकणातल्या आठवणी दाटून आल्या. तसा मी काही कोकणात जन्मलो वा वाढलो नाही पण दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत साधारण महिना दोन महिने आम्हा चाकरमान्यांचे कोकणात वास्तव्य असायचे. मी जन्मल्यापासून ते साधारण माझे ग्रॅजुयेशन संपेपर्यंत यात खंड पडला नाही.

मुंबई गोवा महामार्गावर विजयदूर्गला जायला जिथे फाटा फुटतो तिथे असलेले कासार्डे हे माझे गाव. आम्ही सख्खे चुलत मिळून 12 भाऊ आणि 6 बहिणी, त्यापैकी मी शेंडेफळ. त्यामुळे बहुतेक पुतणे / पुतण्या आणि भाचे भाच्या एकतर माझ्यापेक्षा वयाने मोठे नाहीतर माझ्या वयाचे होते :) मे महिन्यात सर्वांची कुटुंबे एकाच वेळी खाली फोटोत असणार्‍या घरात नांदत असत.


कधी मोजली नाहीत पण सहज 80-90 लोक उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या घरात गुण्या गोविंदाने नांदत असत. मुंबईत केवळ लग्नाच्या वेळी दिसणार्‍या मोठाल्या टोपामध्ये त्या वेळी रोज दुपार संध्याकाळ इतक्या माणसांचे जेवण बने. रात्री झोपायला गावात कुणाच्याही अंगणात आडवे पडले तरी चालत असे. परवानगी मागण्याचा तर प्रश्नच नव्हता. गावातील सगळीच घरे आपलीच असल्याच्या थाटात सगळे गावकरी वागत. कुणाच्याही घरी कोणत्याही वक्ताला कुणीही जाऊ शकत असे. So called आगंतुक पाहुणा आणि यजमान कुणालाही त्यात काही वावगे आहे असे वाटत नसे.

मुंबईच्या त्या 10X20 च्या खुरड्यातून गावच्या त्या ऐसपैस घरात जायला जीव परीक्षेच्या अगोदरपासून आतुर व्हायचा.त्यात गावी जाणे हा एक मोठा event असायचा ज्याची तयारी साधारणपणे दोन एक महिने अगोदरपासून सुरू व्हायची. सगळ्यात महत्वाचे मिशन म्हणजे एस टी उर्फ लाल डब्ब्याची तिकिटे काढणे. त्या काळी कोरे झाली नव्हती. त्यासाठी वडील आणि भाऊ रात्रभर रिज़र्वेशन खिडकी पाशी रांगेत राहायचे. मग जायच्या आठवडाभर अगोदरपासून सामानाची बांधाबांध व्हयायची जी जायच्या मिनिटापर्यन्त चालू असायची. कुणी तिसर्‍या माणसाने पाहिले तर त्याला वाटेल की ही लोक हे घर सोडून दुसर्‍या घरात राहायला चाललीत इतके ते सामान असायचे. ते सामान आणि 10-12 माणसे कांजूरमार्ग ते ठाणे अथवा परेलपर्यंत मध्य रेलवे मधून सहीसलामत नेणे म्हणजे एक दिव्य असायचे आणि नंतर तेवढे सामान बस च्या टपावर चढवून सगळ्यांनी आपापल्या सीटवर बसणे हे त्याहून मोठे दिव्य असायचे. सगळ्यांना खिडकीजवळ जागा हवी असे, कारण बर्‍याच जणांना गाडी लागायची, त्यामुळे ती जागा सोइस्कर असायची :) मला मात्र ड्राइवर च्या मागची सीट आवडायची. रात्री बस मधले दिवे बंद झाले की मला रात्रभर समोरचा रस्ता बघायला कोण मजा यायची. मी आजही गावी जायच म्हटल तर कोकण रेलवे आणि वोल्वो पेक्षा एस टी लाच पसंती देईन. आयुष्यभर वोल्वो ने प्रवास करणार्‍या लोकांना कदाचित नाही कळणार एस टी च्या प्रवासातली मजा. कधी एस टी च्या प्रवासातल्या मजा सविस्तर लिहेन.

गावी पोचल्यावर पहिले एक दोन दिवस जो भेटेल तो 'काय चाकरमाण्यानू, कवा इलास' म्हणून विचारी. आम्ही त्याला किंवा तो आम्हाला ओळखत नसला तरी काही फरक पडत नसे. एक दोन दिवसात माझे समवयस्क भाचे / पुतणे /पुतण्या आले की खरी मजा सुरू होई. मुंबईत भल्या पहाटे नऊ वाजता उठणारा मी गावी मात्र सर्वांबरोबर सकाळी सहाला उठायचो. घरातल्या बायकांचा दिवस तर सकाळी चारच्या अगोदर पासून सुरू होई. उठल्यावर सगळ्या बाळगोपालांना उठवून एकत्र परसाकडे (शौचाला) जायचा कार्यक्रम असे. साधारणता 2000 सालापर्यंत आमच्या आणि कोकणातल्या बहुसंख्य गावांत निसर्ग हेच शौचालय असे. जाताना रस्त्यात असणार्‍या प्रत्येक आंब्याच्या झाडावर दगड मारुन 1-2 आंबे पाडून खाल्ल्याशिवाय कोणाचे पोट साफ होत नसे :)परत आल्यावर राखेने किंवा कोळशाने दात घासले जात. टूथपेस्ट ही तेव्हा चैनीची गोष्ट होती.असली तरी इतक्या लोकांमधे ती 1-2 दिवसात संपे. नंतर चहा नाश्ता होई. चहा शक्यतो बिन दुधाचाच असे.

साधारणतः 10-11 वाजता दोन वहिन्या आणि एखादी बहीण घरातल्या सगळ्या लोकांचे कपडे टोपल्यांमध्ये भरून नदीवर धुवायला नेत असत. इतक्या लोकांचे कपडे धुणे आणि जेवणाची भांडी घासणे ही महाकठीण कामे घरातल्या बायका लीलया पार पाडीत असत. पुरुषांनी घरकामात मदत करण्याइतपत समाज तेव्हा सुधारलेला नव्हता :) आदल्या दिवशी धुतलेल्या कपड्यांमधून आपले कपडे ओळखने मुश्कील ही नही नामुमकीन भी असे. खास करून सफेद बनियान. मग आपापल्या बनियानला रंगीबेरंगी धागे बांधून ठेवावे लागत. पण तेही फारसे टिकत नसत. बाय द वे आमच्यात बनियानला बॉडी म्हणतात. माझी बायको जेव्हा नवीन लग्न होऊन आली होती तेव्हा कुणीतरी कुणाला तरी विचारात होते की आमच्या अमक्या अमक्याची बॉडी बघलास खयसर (म्हणजे आमच्या अमक्या अमक्याची बनियान पाहिलित का कुठे?) माझ्या बायकोला वाटले की कोणीतरी कुणाची तरी डेड बॉडी शोधतय :)

बायका कपडे धुण्यासाठी नदीवर निघाल्या की आम्ही पोरटोर गुरांना नदीवर नेण्याच्या बहाण्याने नदीवर सटकत असू. वास्तविक पाहता गुरांना कुठल्या direction ची गरज नव्हती, पण आम्हाला नदीवर डुंबायला जाण्यासाठी काहीतरी बहाणा हवा असे. एकदा घर दिसेनासे झाले की गुरे आपणहून नदीकडे जात आणि आमचे पुन्हा आंबे, काजू पाडणे असले उद्योग चालू होत :) आयला कसला सॉलिड नेम होता आम्हा लोकांचा. चार पाच दगडात कितीही उंचावरचा आंबा पडलाच पाहिजे असा. मग अशीच मजल दरमजल करीत आम्ही नदीवर पोचायचो आणि धडा धड पाण्यात उड्या टाकायचो. नदीत विविध प्रकारची जनावर (अका साप) सुद्धा असायचे. नदीचे पाणी शांत असले की ते पाण्याच्या बाहेर डोकी वर काढून बसायचे. ते विषारी होते की बिनविषारी ते माहीत नाही पण आम्ही नदीत असताना मात्र आम्हाला ते कधी चावले नाहीत.

तास दीड तास मनसोक्त डुंबल्यावर परत घराकडे निघायचो. जाता जाता जमल्यास भिजलेले कपडे आमच्या घरातील बायकांकडे धुवायला द्यायचो. जाताना पुन्हा आंब्यांवर नेम धरणे ओघाने आलच कारण इतक्या लोकांच्या गदारोळात घरी पोटभर जेवायला मिळेलच याची शाश्वती नसायची. आम्ही इतके आंबे खायचो की महिन्याच्या अखेरीस आंबा तोंडाला लावला की दातातून शिरशिरी यायची. याला आम्ही दात आंबणे असे म्हणायचो. घरी आल्यावर गुरे परतली तरी आम्ही न परतल्याबद्दल आणि नदीत डुंबण्याबद्दल ओरडा मिळायचा. तो एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देऊन जेवायला बसू. ते चुलिवरचे जेवण इतके रुचकर असे की आठवणीने आत्ताही माझ्या तोंडाला पाणी सुटलय.

[क्रमश:]

4 comments:

Harshal said...

बेष्ट एकदम बेष्ट लिहिलयस ... मला माझ्या गावच्या घराची आठवण झाली. आमच्याकडे अजुनही असे सर्व चुलत भावंडे मिळून गावाला जातात. खरच खुप आनंद दायक क्षण असतात ते. मला वाटते कोकणात सगळिकड़े तू लिहिलयसतसच असते. आमचे गाव (खरे तर वाडी) वारकर्यांची अस्ल्यामुळे नेहमी भजन कीर्तनाची धमधम चालू असते ... गावी मी जितका रिलाक्स करू शकतो तितका कुठल्या ही होलीडे रिसॉर्ट मधे नाही करू शकत. गावंच घर म्हणजे खरच ग्रेट गोष्ट असते.
तुमची "बॉडी" बोलण्याची ची पद्धत पण आमच्याकडे आहे... माज्या घरी अजुन ही आई , पप्पा बनियन ला बॉडी च बोलतात. मस्तच :)

by the way माझे गाव मुंबई गोवा रोड वर आहे, वाटुळ त्याचे नाव ... लांजा राजापुर च्या मधे ....

Ajay Sonawane said...

खुप मस्त लिह्तोस तू, अगदी समोर गावच उभा राहिला.

सिद्धार्थ said...

पप्पूशेट, तुमी लिवलाय ता सगळ्या कोकणात सारखाच असा. आंब्याबरोबर काजू, करवंद आणि जांभळ पण असायची. साला मुंबई पुण्यात ह्या गोष्टी विकत मिळतात हे बघून विचित्र वाटतं. असो चालायचेच. आणि मे महिना अखेरीस आम्हा मुलांच्या बॉड्या आंबा काजूचे डाग पडून बाजारात मिळणार्‍या निरमा, सर्फ आणि तत्सम गोष्टींच्या आवाक्याबाहेर गेलेल्या असत. त्यांचा घरात फार फार तर पायपूसण म्हणून वापर होई.

davbindu said...

लहान पणी केलेल्या बरयाच गमती जमती आठवल्या तुमचे पोस्ट वाचताना ..धन्यवाद
आपल्या बरयाचश्या करामती मिळत्या जुळत्या आहेत.बाकी पोस्ट एकदम मस्त झाल आहे.