Friday, November 20, 2009

अल्केमिस्ट्री

राजू परूळेकर याने सचिनबद्दल लिहिलेल्या अल्केमिस्ट्री मधील सचिनचा उल्लेख मला योग्य वाटला नाही, त्याबद्दल त्याला मी एक इ-पत्र लिहिले. तेच इ-पत्र जसेच्या तसे.


राजू परुळेकर यास,

तुझी सचिन बद्दलची अल्केमिस्ट्री वाचली. माझ्या छोट्या मेंदूला तुला त्यात नक्की काय म्हणायचय ते झेपलं नाही. मला समजलेलं थोडक्यात सांगतो, १. तुला सचिनबद्दल कसल्याही भावना (आदर, प्रेम, तिरस्कार वगैरे) नाहीत. २ सचिनने कितीही धावा केल्यात तरी भारताचे महत्वाचे प्रश्न ( उदा. शेतकरी आत्म्हत्या) सुटणार नाहीत. ३. हिम्मतरावांसारखे लोक जे मानवजमाती साठी उपयुक्त काम करतात त्याबद्द्ल लोकांना माहितीही नसते. ४. मराठीतल्या अनेक प्रतिष्ठित लोकांनी त्याच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीबद्दल भरभरून लिहिलं आहे ते दुसरं तिसरं काही नसून वैचारिक दिवाळखोरी आहे. ५. सचिनने केलेलं मुंबई सर्वांची हे विधान त्याच्याकडून केलं जायला नको होतं.

सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला आणि पाचवा मुद्दा वगळता बाकिच्या साऱ्या मुद्द्यांसाठी सचिनला या लेखात आणण्याची खरचं काही गरज नव्ह्ती. पहिला मुद्दा तुझा तुझ्यापाशी राहिला असता तरी चाललं असतं (जसं तुझ्या मते प्रतिष्ठित लोकांनी सचिनच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीबद्दल जे भरभरून लिहिलं ते नाही लिहिलं तरी चाललं असतं). पाचव्या मुद्द्याबद्दल मी शेवटी बोलतो.

मला कळत नाही की सचिनचा क्रिकेट खेळण्याचा आणि महाराष्ट्रातील समस्यांचा संबंधच काय? त्यातल्या त्यात तुमच्या पत्रकारितेचा आणि महाराष्ट्रातील समस्यांचा थोडाफार तरी संबंध आहे, म्हणून तू तुझ्या दोन वेळच्या जेवणाऐवजी एकच वेळ जेवण घेऊन एक वेळचे जेवण उपाशीपोटी लोकांसाठी दान करतोस असे काही ऐकिवात नाही (खरंच करत असशील तर गोष्ट वेगळी). या मुद्यासाठी सचिनला लेखात गोवणं नक्कीच योग्य नव्हे.

दुसरा मुद्दा हिम्मत राव आणि इस्रो चे संशोधक यांच्याबद्दल सामान्यांना जास्त माहिती नसते. आमटे, बंग यासारखे लोकांच्या कारकिर्दी माध्यमांनी सेलिब्रेट केल्या नाहीत. यात सचिनची काही चूक आहे असं मला वाटत नाही. बरं हा ही मुद्दा सचिनला न आणता मांडता आला असता. जे विकतं ते पिकतं हा नियम तुझ्यासारख्या पत्रकाराला नक्कीच माहित असेल. म्हणूनच तर तू हे मुद्दे मांडायला सचिन सोडून इतर कोणालाही घेतलं नाहीस असं माझं प्रामाणिक मत आहे. हे मुद्दे बॉलिवूडच्या कोणत्याही अभिनेत्याला घेऊनही तू मांडू शकला असतास. एका गोष्टीची नोंद घ्यावी, तू उल्लेख केलेल्या अनसंग हिरोंबद्दल मलाही अतीव आदर आहे.

सचिन च्या २० वर्षाच्या कारकिर्दीबद्दल अनेक प्रतिष्ठीत लोकांनी त्याच्या बद्दलच्या आठवणी सांगितल्या ज्या तुझ्या मते वैचारिक दिवाळखोऱ्या आहेत (का ते समजले नाही). आमटे वा तत्सम लोकांवर लिहून आलेल्या लेखांना, त्यांच्याविषयीच्या आठवणींना कुणी वैचारिक दिवाळखोरी म्हणत नाही, कारण ते त्यांच्या क्षेत्रात सर्वोत्तम आहेत. त्याच प्रमाणे सचिन त्याच्या क्षेत्रात सर्वोत्तम आहे. त्यामुळे त्याच्या बद्दलच्या मतांना वैचारिक दिवाळखोरी म्हणण्याचं वास्तविक पाहता काहीच कारण नाहीय. बरं तू क्रिकेटचा पंडीत असतास आणि मग सचिनबद्दलच्या लेखांचा असा उल्लेख असतास तरी गोष्ट वेगळी होती, पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे क्रिकेट मध्ये तुला रस नाही. त्यामुळे हे लेख कदाचित तुला दिवाळखोरी वाटले असतील. त्यामुळे मला नाही वाटत कि सचिनचा उल्लेख इथेही फिट बसतो.दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे टी.व्ही. वरील एखादा कार्यक्रम पाहायचा नसेल तर रिमोटने चॅनेल बदलता येतं त्याचप्रमाणे एखादी बातमी वाचायची नसली तर सोडून देता येते की? पण तू त्या सर्व आठवणी (उर्फ तुझ्या मते वैचारिक दिवाळखोऱ्या) वाचल्यास. सोडून का दिल्या नाहीस? बरं तुझ्या मते सचिनच्या बद्दल जे लिहून आलंय त्यामुळे मानवजातीला कोणतही वरदान प्राप्त झालं नाहीय. अगदी खरी गोष्ट, पण त्याने काही वरदान प्राप्त व्हावे अशी कोणाची अपेक्षाही नाही. पुढच्या वर्षी तुझ्या कारकिर्दीला वीस वर्षे पूर्ण होतायत. माझ्यामते तू पत्रकार असल्याने कुठेतरी ते लिहून येईल (अर्थात सचिन च्या बद्दल लिहून आलंय तितकं नाही), त्यामुळेही मानवजातीला काही वरदान प्राप्त होईल असं काही वाटत नाही. मानवजातीला वरदान प्राप्त करून देण्याची क्षेत्रे वेगळी आहेत. उदा. अवकाश संशोधन, भारताने ३८४ करोड खर्चून चंद्रावर पाणी असण्याच्या (फक्त) संभावनेचा शोध लावला. त्याचाही बराच बोलबाला झाला, पण त्याने मानवजातीला काय मिळालं? पुढेमागे चंद्रावरून एखादी पाईपलाईन टाकून ते पाणी इथे आणूही कदाचित, पण आजच्या घडीला तरी ते संशोधन काही फायद्याचं नाही. त्याबद्दल लिहून जर का तू मानवजातीला कोणतं वरदान प्राप्त झाला हा प्रश्न विचारला असतास तर ते समजण्यासारखं होतं. जर का सचिनबद्दल मिडियामध्ये लिहिण्या-बोलण्याने मानवजातीला कोणतेही वरदान प्राप्त होत नसेल तर बहुतेक तुझ्या मताप्रमाणे कोणत्याही ’सिंथेटिक’ गोष्टींना कोणत्याही प्रकारच्या मिडियामध्ये स्थानच मिळायला नको कारण कोणत्याही सिंथेटिक(अनैसर्गिक) गोष्टीमुळे मानवजातीला कधीच वरदान मिळणार नाहीय. जरा विचार करून बघ कि असं करणं कितपत शक्य आहे ते.

तुझ्या लेखातले इतर छोटे-मोठे मुद्देही वरील मुद्द्यांप्रमाणे सचिनला न आणता मांडता आले असते. राहता राहिला मी उल्लेखला पाचवा मुद्दा. सचिनने म्हटले कि मुंबई सर्वांची. ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. बरं त्याच्या स्टेटमेंट मध्ये चुकीचं काहीचं नाही, असलीच तर राष्ट्रीय एकता आहे. तुझ्या मताप्रमाणे त्याने क्रिकेटची खेळपटटी सोडून राजकीय खेळपटटीवर खेळायला नको होतं, त्यासाठी तू ते काय ते स्वादूपिंडाच्या ऑपरेशनचे उदाहरणही दिलंयस. अगदी बरोबर जेणू काम तेणू ठाय, बिजा करे गोता खायं, पण एक गोष्ट लक्षात घे, सचिनने स्वत: प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे स्टेटमेंट दिलेलं नाहीय. तुझ्यासारख्याचं कुणातरी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना हे उदगार आलेले आहेत. आता त्या पत्रकाराला एखाद्या खेळाडूला राजकारणासंबधी प्रश्न विचारायची काही गरज होती का? खेळाडूला खेळासंबंधीचे प्रश्न विचारावेत असा पत्रकारिकेत रूल नाहीय का? तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर पत्रकारिता सोडून तो पत्रकार ऑपरेशन करत होता. स्वादूपिंडाच्या ऑपरेशनची सुरुवात कुणी केली असेल तर ती त्या पत्रकाराने, सचिनने नव्हे.

तू सचिन आणि गांगुलीची देखील तुलना केली आहेस. गांगुली बंगाली पत्रकारांना धरून राहतो, तर सचिन नाही. कुणाचे पॉलिटिकल व्ह्यूज काय असावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही का? अन मला वाटतं की जोपर्यंत ते समाजाला कोणती हानी पोहोचवत नाहीत तो वर त्यांच्यावर टीका करणं योग्य नव्हे.

थोडक्यात तू तुझ्या लेखामध्ये सचिनचा उल्लेख न करता तुझे मुद्दे मांडले असतेस तर त्यांना मी आक्षेप घेतला नसता. माझा तुझ्या मुद्द्यांना अजूनही आक्षेप नाहीय, ते त्यांच्या जागी एकदम बरोबर आहेत. माझा आक्षेप आहे तो सचिनला विनाकारण या लेखात गोवण्याचा.

माझा तुझ्यावर वैयक्तिक आक्षेप नाहीय (लिहायची गरज नाहीय तरीही). तुझ्या लेखातला सचिनचा उल्लेख मला पटला नाही, म्हणून हा पत्रप्रपंच. वाटल्यास उत्तर दे, वाटल्यास नको देऊस.

प्रवीण

5 comments:

सुधीर निखार्गे said...

नमस्कार प्रवीण...

पत्रप्रंपच नक्कीच आवडला. मराठी ब्लॉगनेट वर प्रसिद्ध झालेली सर्व मते राजू परूळेकरांपर्यत पोहचवायला हवीत. कारण सद्ध्या सगळेजण मराठी लोकांना गृहीत धरताहेत मग ते राजकारणी असोत वा पत्रकार असोत. ह्या सगळ्यांना ठणकावून सांगायला पाहीजे की इथे सगळे नंदीबैल नाहीयेत यांची असली बडबड ऐकायला आणि वाचायला.

पत्राचे उत्तर आल्यास नक्की कळवा. मी पण राजू परूळेकरांना पत्र पाठवून देतो...

सुधीर

Anonymous said...

लोकप्रभा व सकाळ ही साप्ताहिके या जळाऊ लाकडांच्या वखारी आहेत.

Heramb Oak (हेरंब ओक) said...

अतिशय सुरेख लेख. मी पण ती अल्केमिस्त्री वाचली आणि डोक च फिरलं आणि त्याच तिरीमिरीत मी पण परुळेकर आणि लोकप्रभा दोघांनाही इ-पत्र टाकल आणि तेच माझ्या blog वर पण टाकल. गम्मत म्हणजे आपल्या दोघांच्या हि blogs मधले बरेचसे मुद्दे आणि उदाहरण अगदी सारखी आहेत. फरक इतकाच कि आपला लेख खूप च मुद्देसूद झाला आहे आणि माझा खूप विस्कळीत :)

मीनल said...

tula Tag kele aahe..

सिद्धार्थ said...

तुम्हाला टॅगलय