Saturday, November 14, 2009

सचिन रमेश तेंडुलकर

२० वर्षे एक असामान्य व्यक्तिमत्व पहिल्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून विसाव्या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत* एकच गोष्ट करत आलाय पण तरीसुद्धा आपल्याला जराही कंटाळा आला नाहीय किंबहुना हेच तो येती काही वर्षे करत राहो हिच मनोमन प्रार्थना करतोय यातच त्या व्यक्तिचं मोठेपण सामावलय. एव्हाना वरचा * म्हणजे Conditions Apply नसून नाबाद चिन्ह आहे अन मी कोणाबद्दल बोलतोय हे ही चाणाक्ष क्रिडाप्रेमींच्या लक्षात आलं असेल.

सचिन रमेश तेंडुलकर. बऱ्याच भारतीयांसाठी क्रिकेटमधील देव आणि इतरांसाठी नंबर वन बॅट्समन. वीस वर्षे सतत खेळून अन करोडो रुपये कमवूनही ज्याच्या डोक्यात हवा गेली नाही असा माणूस. वीस वर्षात ज्याच्या नावाला कुठला वाद नावालाही चिकटला नाही असा तुमचा आमचा सचिन. याबाबत मला इच्छा नसतानाही विनोदचं उदाहरण घ्यावं लागतय. आचरेकर सरांच्या मते विनोद गुणवत्तेत सचिनहून थोडा उजवा होता पण तो यश टिकवू शकला नाही. वीस वर्षे कोणत्याही विवादापासून दूर राहणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. असे खेळाडू एका हाताच्या बोटावर सोडण्याइतकेच सापडतील.

सचिन तंत्रशुद्ध फलंदाज आहे याबाबत वादच नाही, त्याच बरोबर आक्रमकही आहे. बचाव आणि आक्रमण यांचा सुरेख मिश्रण त्याच्या खेळात पाहायला मिळतं. त्याचे चाहते तर अगणित आहेत पण त्याचबरोबर तो स्वत:साठी खेळतो, दबावाखाली खेळत नाही, तो चांगला finisher नाही असे म्हणणे असणारे देखील अगणित आहेत. त्याचाच एके काळचा सहकारी संजय मांजरेकर यात आघाडीवर आहे.

या लेखाचा हेतू हा हे मुद्दे खोडून काढणं हा आहे. जी लोकं शतकाच्या जवळ आल्यावर एकेरी धावा घेऊन शतक पूर्ण करणे याला स्वार्थीपण म्हणतात त्यांना क्रिकेट कळत नाही असं माझं म्हणणं आहे. भारत सचिन वेगात खेळला तर जिंकला असता पण सचिनने स्वार्थीपणे हळू खेळून आपले शतक/अर्धशतक पूर्ण केलं अशी एकही मॅच दाखवा, दाखवणाऱ्याच्या ढेंगाखालून जायला तयार आहे मी. वीस वर्षांत ८५ हून अधिक स्ट्राईक रेट असलेला फलंदाज स्वार्थी कसा असेल (अन हा स्ट्राईक रेट तेव्हा पासून आहे जेव्हा ५० षटकांत २२०-२३० धावा पुरेशा असत. २५० धावा म्हणजे डोक्यावरून पाणी)

दुसरी गोष्ट म्हणजे तो चांगला finisher नाहीय, हा आरोप. तो ५-६ व्या क्रमांकाचा खेळाडू नाहीय. तो सलामीचा फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक फळीच्या ठराविक जबाबदाऱ्या असतात. ५-६ व्या क्रमांकाच्या खेळाडूवर फ़िनिशेर असण्याची जबाबदारी असते. बरं तो जेव्हा जेव्हा बाद झालाय तेव्हा तेव्हा विजय आवक्याबाहेर नव्हता अन विकेटही हातात होते (आठवा चेन्नई ची कसोटी, परवाची १७५ धावांची खेळी), पण इतर फलंदाजांनी नेहमीच कच खाल्लीय, पण हात धुऊन सगळे सचिनच्याच मागे पडतात.

तो दबावाखाली खेळत नाही या आरोपासाठी हा पुढील लेखाजोखा

सचिनने कमावलेल्या ५४ सामनावीर किताबांपैकी ३१ सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करताना मिळवली आहेत तर २३ पहिल्यांदा.

त्याव्यतिरिक्त भारत हरलेल्या सामन्यात सचिनची कामगिरी खालीलप्रमाणे

ऑस्ट्रेलियाविरुद्ध
हरलेल्या ४१ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ९ अर्धशतके आणि २ शतके

इंग्लंडविरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक

न्यूझिलंड विरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक

पाकिस्तानविरुद्ध
हरलेल्या ३६ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ अर्धशतके, ३ शतके तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ३ अर्धशतके आणि १ शतक. ३ अर्धशतकांपैकी दोनदा ९०+ धावा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
हरलेल्या ३३ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक, १ शतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ३ अर्धशतके. ३ अर्धशतकांपैकी एक्दा ९०+ धावा

श्रीलंकेविरुद्ध
हरलेल्या २९ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतके, ३ शतके तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ५ अर्धशतके.

वेस्ट इंडिज विरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतके तर १ शतक

झिम्बाब्वेविरुद्ध
हरलेल्या ५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना १ शतक

थोडक्यात हरलेल्या सामन्यांतही ३८ अर्धशतके आणि १२ शतके ((बांग्लादेश केनियासारख्या देशांची आकडेवारी धरलेली नाही). मग हा मांजरेकर आणि तत्सम टीकाकार कसे म्हणू शकतात की सचिन दडपणाखाली खेळत नाही?

वीस वर्षे खेळणे हाच एक विक्रम आहे पण वीस वर्षे खेळून ४४.५० चा ऍव्हरेज राखणे हे देखील येरागबाळ्याचे काम नाही. वीस वर्षे खेळलेले इतर खेळाडूही आहेत पण त्यांच्या काळात दर दिवसाआड सामने होत नसत. कसोटीत सुटीचा दिवस असे. क्रिकेट इतके थकवणारे नव्हते. यातच सचिनचे वेगळेपण दिसून येते. पाठदुखी आणि टेनिस एल्बोच्या दुखापतीचा सामना त्यालाही करावा लागला, पण तरीही वीस वर्षे हा फिटनेस त्याने टिकवला. मला नाही वाटत यापुढे वीस वर्षांची अजून कुणाची कारकिर्द असेल. अशा क्रिकेटच्या देवाला हा लेख भक्तिभावे अर्पण.

थोडसं अवांतर: आई, बघ जरा लहानपणी व्यवस्थित क्रिकेट खेळायला दिलं असतस तर हा लेख दुसऱ्या कुणीतरी माझ्यासाठी लिहिला असता.

वरील सर्व आकडेवारी cricinfo च्या statsguru वरून मिळवली आहे.

6 comments:

Ajay Sonawane said...

टीकाकारांना गप्प बसविणे तेंडुलकरल बरोबर माहीत आहे. तो कधीही कुणाला तोंडाने उत्तर देत नाही. आणि टीका कुणाला चुकली आहे. अमिताभ बच्चन सारखा माणुस ही एकेकाळी टीकेच लक्ष्य झाला होता. जो त्यातुन ही उभारी घेतो त्यात सचिन चा क्रमांक अव्वल आहे.

-अजय

सिद्धार्थ said...

पप्पूशेट सगळ्या मुद्द्यांना अनुमोदन. तुम्ही दिलेली आकडेवारी एकदम हटके आहे. मस्त. अहो सचिनबद्दल काय बोलायचे. तो खेळलेला प्रत्येक सामना आणि प्रत्येक रन्स म्हणजे विक्रम. आत्ता त्याचे कोण कोणते विक्रम नोंद करीत राहायचे. चांदणे मोजायचे नसते, त्याचा आनंद घ्यायचा असतो.
मांजरेकर म्हणा किंवा आणखी कोणी म्हणा. टीकाकार खोर्‍याने भेटतील. उणीवा काढणे कठीण काम नाही. कोणीही करेल. मला फक्त सगळ्या टीकाकारांना एकच प्रश्न विचारायचा आहे "फक्त एका खेळाडूचे नाव सांगा जो सचिनला बाजूला सारून ते म्हणतात तशी डावाची सुरूवात आणि शेवट करेल. Go and get him who can replace Sachin but till then just keep quite "

आज मी देखील सचिनवरच मानाचा मुजरा लिहलाय.

Mahendra said...

थोडसं अवांतर: आई, बघ जरा लहानपणी व्यवस्थित क्रिकेट खेळायला दिलं असतस तर हा लेख दुसऱ्या कुणीतरी माझ्यासाठी लिहिला असता.

पप्पु शेट
ही पंच लाइन एकदम झकास.... !!

Photographer Pappu!!! said...

अजय, सचिन आपल्य बॅटनेच बोलतो ते एक बरं आहे. वीस वर्षांत अनेकदा आपल्या टीकाकारांना त्याने बॅटनेच उत्तर दिलं आहे. तरीसुद्धा या टीकाकारांना नेहमी आपले दात घशात घालून घ्यायला आवडत असावं, म्हणूनच ते पुन्हा पुन्हा त्याच त्याच टीका करत बसतात.

सिद्धार्थ, प्रतिक्रियेबद्दल आभार. तुमचा लेख एकदम मस्तच झाला आहे.

महेंद्र जी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मी विनोद कांबळीच्या एरियात राहायचो. अजून एक दोघे आचरेकर सरांचे शिष्य होते. मी आईच्या मागे लागलेलो कि मला पण पाठवा म्हणून. पण ते काही शक्य झालं नाही :(

हेरंब said...

Pravin, apratim lekh, muddesud mandani aani suyogya aakadevari.. zakkas... aapan doghe hi eka chviththala che maLkari aahot tar :)

Ameya Girolla said...
This comment has been removed by the author.