Sunday, February 13, 2011

आगीचा धबधबा!!!!


नुकतच पाहिलं की माझी गेली २-३ पोस्ट्स मोटरसायकलिंग वरच आधारित होती. थोडासा चेंज म्हणून हे पोस्ट मोटरसायकलिंग वर नाहीय (पण भटकंतीवरच आहे :)). योसेमिटे नॅशनल पार्क मध्ये होर्स टेल नावाचा अगदी दुर्बीण घेऊन बघावा लागणारा एक धबधबा आहे. फक्त उंचीवरून खाली कोसळतो म्हणून त्याला धबधबा म्हणायचं इतकाच. नाहीतर त्यातले पाण्याचे प्रमाण पुरुष वर्गाने मारलेल्या धारे इतपतच असते. वर्षातले जवळपास ३५५ दिवस या धबधब्याला कोणीही भाव देत नाही. कोणी त्याचे फोटोही काढत नसेल या ३५५ दिवसात. पण फेब्रुवारी मधल्या ८-१० दिवसात मात्र योसेमिटे मधल्या इतर कोणत्याही धबधब्याकडे फोटोग्राफर्स चे इतके लक्ष जात नाही. हे ८-१० दिवस या धबधब्याच्या आसपासच्या पार्किंगस्पॉट वर सूर्यास्ताच्या वेळी एकाही जागा मिळत नाही. याचे कारण म्हणजे या ८-१० दिवसात सूर्यास्ताच्यावेळी असलेला सूर्याचा कोन. त्या कोनामुळे सूर्यास्ताच्या वेळी जवळपास १५-२० मिनिटे ह्या धबधब्यातून अक्षरश आग कोसळते.


गेली २-३ वर्षे मला ही गोष्ट अनुभवायची होती, पण नेमके दिवस कळत नव्हते. शेवटी २०११ मध्ये तो योग आला. सूर्याचा हा कोन १० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत राहणार होता. याबद्दल माहिती मला ११ फेब्रुवारीला मिळाली. १९ फेब्रुवारीला विश्व चषक सुरु होत होता आणि त्याच दिवशी हिमवृष्टी आणि पाउस होणार होता. त्यामुळे १२/१३ फेब्रुवारीलाच जाणं भाग होतं. एकतर्फी अंतर फक्त ३.५ तास असूनही बायको मला एकट्याला पाठवायला तयार नव्हती. तिला भरपूर काम असल्यामुळे ती देखील येऊ शकत नव्हती. दुसरं कारण म्हणजे जो फिनोमिना फक्त १५-२० मिनिटे चालणार त्यासाठी ७ तास गाडीत बसायची तिची तयारी नव्हती :) शेवटी माझा एक मित्र पियुष यायला तयार झाला. त्याची कार manual transmission वाली होती आणि तो ती मला चालवायला द्यायला तयार झाला. मी अमेरिकेत आत्तापर्यंत एकदाही manual transmission वाली कार चालवली नव्हती त्यामुळे मी ती चालवायला उतावळा झालो होतो. योसेमिटेचे जवळपास सर्व कोनांतून फोटो काढून झाल्यामुळे आम्ही फक्त हा फिनोमिना कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी मस्तपैकी लंच करून निघायचं ठरवलं .

३.५ तास manual transmission वाली कार चालवण्याचा मस्त अनुभव घेत आम्ही योसेमिटेला पोहोचलो. पण आमच्या नशिबात पार्किंग नव्हती. सूर्यास्त जवळ येत चालला होता आणि पार्किंग मध्ये वेळ दवडायाचा नव्हता. शेवटी तिथेच रस्त्याच्या कडेला मी कार दाबून लावली. आमच्यासारख्या अनेकांनी तशीच पार्क केली होती. पियुषला सांगितलं कि पार्किंग तिकीट आलं तर मी भरेन म्हणून. कॅमेऱ्याचा लवाजमा घेऊन निघालो आणि पाहतो तर काय मोक्याच्या जागांवर गुढघाभर बर्फ साचला होता. तशाच बर्फात चालत त्यातल्या त्यात एका बर्फ नसलेल्या एका मोक्याच्या जागी आम्ही दोघांनी आमच्या ट्रायपॉडचा संसार थाटला आणि त्या १५-२० मिनिटांच्या काळात आम्ही त्या आगीच्या धबधब्याचे शेकड्याने फोटोज काढले. आमच्या नशीबाने आकाश पूर्णत: निरभ्र होते. जनरली या ८-१० दिवसात एक तर बर्फ तरी पडत असतो नाहीतर आकाशात ढग तर असतात. त्यामुळे फार थोडे छायाचित्रकार याचे फोटो काढू शकतात. त्या फार थोड्या छायाचित्रकारांमध्ये आता प्रवीण आणि पियुषचं नावसुद्धा आता जोडलं गेलंय :)

5 comments:

Mahendra said...

फोटो खूपच सुंदर आलेले आहेत.

सिद्धार्थ said...

वा वा पप्पूशेट. तुम्हाला पुन्हा ब्लॉगरवर पाहून आनंद झाला. आणि परत आलात ते एकदम रच्याक फोटू घेऊन. झकास. खरचं छान फोटो आहेत. हा धबधबा या आधी FWD मेलमध्ये पाहिला होता पण तो वर्षातील ठराविक काळच दिसतो आणि असा का दिसतो त्या मागील कारण माहीत नव्हते. त्या माहितीबद्दल धन्यवाद आणि अशा हटके देखाव्याचा याची देही याची डोळा अनुभव घेतल्याबद्दल अभिनंदन.

बाकी गाववाल्यांनू येत जावा अधून मधून. मराठी ब्लॉग विश्वपण आपलाच असा.

प्रशांत दा.रेडकर said...

तुमचा ब्लॉग आवडला
:-)
माझ्या ब्लॉगचा पत्ता:
http://prashantredkarsobat.blogspot.com/

अभिजीत said...

मस्त फोटो आहेत. कुठे आहे का धबधबा ? Actually मी १२ फेब्रुवारीला योसेमिटे ला आलो होतो. पण दुर्दैवाने मला त्यावेळी याची माहिती नव्हती. मी एका पुलावरून सूर्यास्त बघितला. तिकडे पण गर्दी होती बरीच.

Photographer Pappu!!! said...

महेंद्र जी धन्यवाद. २०११ मध्ये ब्लॉग विश्वात नियमित वावरायचं ठरवलंय. पाहू कितपत जमतंय ते :)
सिद्धार्थ शेठ, बरा वाटला तुमचो प्रतिसाद वाचून. आता ह्याच आस्तलय मी :) वाय्च चाय पाण्याचा व्हता काय ता बघा :) नशीबाने मला ती माहिती जस्ट इन टाईम मिळाली आणि ते अनुभवता आलं. या गुरुवारी शुक्रवारी बहुतेक हा देखावा त्याच्या पिक ला असेल.
प्रशांत प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
अभिजित, अरे आपण एकाच दिवशी तिथे होतो तर. बहुतेक तुम्ही हाल्फ डोम ला किंवा ग्लेसिअर point ला असाल. हा देखावा आम्ही el - capitan पिकनिक एरिया मधून पाहिला. तुम्ही जर का बे एरियात राहत असाल आणि भटकंतीची आवड असेल तर कधीही मला मेल करा. १०० तले ९० टक्के मी बरोबर असेन :)