Tuesday, May 10, 2011

जय बजरंगा हुप्पा हुय्या !!!!

"काय रे तुका आव्स बापूस खाव्क घालित नाय काय"

"ह्येची हाडाची काडा नी **चा तुनतुना"

"अर्रे बाबा, जास्त धावूबिवू नुको, वाऱ्यान उडान जाशी..."


घरी येणाऱ्या अतिथी देवोभवांकडून अशी अनेक मुक्ताफळे ऐकल्यावर आपण लाईट्वेट चॅम्पियन असल्याबद्दल स्व:ताचा खूप राग येई. भरपूर पेट्रोल पिऊनही १५ च्या स्पीडने जाणाऱ्या गाडीसारखी आमची बॉडी. कितीही खा पण अंगावर चरबी चढायची नाही म्हणजे नाही. व्यायामाच्या नावाने आनंदच होता. एक तर आमच्या खानदानाची हाताच्या बोटावर मोजण्याइतकी संपत्ती असल्यामुळे जिम परवडायची नाही आणि दुसरं म्हणजे पायावर डंबल पडला तर काय घ्या त्यामुळे जिमच्या वाट्याला गेलोच नाही. नाही म्हणायला उन्हाळ्याच्या सुट्टीत लवकर उठून जॉगिंगला जाणं हा व्यायाम दरवर्षी व्हायचा. पण कडका असलो तरी कोणी माझ्याशी मारामारी करायच्या भानगडीत पडायचा नाही. समोरचा माझ्यापेक्षा चारपटींनी असला तरी मी त्याला बुकलून काढायचो. कडका आहे पण काय सॉल्लिड मारामारी करतो असं जेव्हा मित्र म्हणायचे तेव्हाच काय ते अंगावर मूठभर मांस चढायचं.

कोणी सांगितलं कि कराटे केले की समोरच्याला मारता पण येतं आणि ऑटोमॅटिकली बॉडी पण बनते. शाळेत कराटे स्वस्त दरात शिकवायचे म्हणून कराटे मध्ये नाव घालायचं ठरवलं तर आमच्या मातोश्रीनी "कराटे करशी नी आमकाच तंगडी घालून पाडशी" म्हणून परवानगी नाकारली. शेवटी हो ना करता एकदा कराटेला जायची परवानगी मिळाली. २ वर्षे हू हा करून अर्ध्या फूटाने उंची, ५-६ किलोमीटर पळण्याचा स्टॅमिना आणि एक नारंगी पट्टा एवढी कमाई केली पण अंगावरची चरबी जैसे थे. कराटे डोक्यात जायला लागले होते. शेवटी १० वीचं वर्ष म्हणून कराटे बंद करण्यात आले.

दहावीच वर्ष बाकीच्या १०वीच्या विद्यार्थ्यांचं जितक्या रोमॅण्टिकली जातं तितकच आमचही गेलं. नंतर महाविद्यालयात गेलो तर तिथे आमचा काटकपणा आमच्याच डोळ्यात खुपायला लागला. महाविद्यालयात जिमखाना होता. ४ टी टी टेबल्स, ८-९ कॅरम आणि १०-१० पौंडाचे दोन डंबल असं त्या जिमखान्याचं रूपडं होतं. कॅरम किंवा टी टी साठी वाट बघताना कधी त्या डंबेल्स्ना उचललं तेवढच. ते पण धड उचलता यायचे नाहीत. शेवटी ठरवलं कि आता जिम लावलीच पाहिजे. घराजवळची जिम महिन्याला ५० रूपये घेत होती. ते घरात परवडत नव्हतं. त्यामुळे चालत ४५ मिनिटे दूर असलेल्या आणि महिना १५ रुपये घेणाऱ्या जिममध्ये नाव नोंदवणी करण्यात आली. माझ्यासारखी अजून ५ टाळकी तयार झाली. सकाळी पाच वाजता उठून ४५ मिनीटं एकमेकांशी गप्पा मारत (आणि शिव्या देत) जिमला जायचं, सहा ते सात असा एक तास व्यायाम करायचा असा प्लॅन ठरला. पण एक गोची होती. जिमच्या बाजूला एक महाविद्यालय होतं. सकाळची बॅच सातची असायची, त्यामुळे साडे सहा पासून महाविद्यालयीन कन्यांचे झुंडच्या झंड जिमच्या बाजूच्या रस्त्याने जायचे. या अर्ध्या तासात जिममधील सगळी उपकरणं वापरण्यासाठी उपलब्ध असत कारण सगळे पैलवान तेवढ्या वेळात जिमच्या बाहेर असलेल्या पुल अप रॉडवर तरी असायचे नाही तर उगाच स्ट्रेचिंग करत उभे राहायचे. आम्हीही त्याला अपवाद कसे असणार :) तरी आपलं एक तास नाही तर अर्धा तास व्यायाम व्हायचा. चार पाच दिवस व्यायाम करून आल्यावर अंगावर किती मांस चढलय ते उगाच आरशासमोर बघत राहायचो. महिना व्यवस्थित गेला. मग हळूहळू सहा टाळक्यांची पाच, पाचाची चार, चाराचे तीन झाले. दिड महिन्यानंतर पहाटे पाचला झापडं उघडेनाशी झाली. त्यात पावसाळा सुरू झाला आणि झापडांना न उघडण्यासाठी सबळ कारण मिळालं. शेवटी उरलेली ३ टाळकीही घरी झोपा काढू लागली. हाडाची काडं तशीच राहिली आणि वरून घरातून जिमवर घातलेले पैसे फुकट घालवले म्हणून पावलो पावली उद्धार होत राहिला तो वेगळाच.

त्यानंतर पुढची चार वर्षे जिमचं तोंडदेखील पाहिलं नाही. कॉलेज संपताच बंगलोरला (हो बंगलोरच, मी गेलो तेव्हा ते बेंगलूरू झालं नव्हतं) नोकरी मिळाली. तिथे इतर लोकांच्या मानाने मी १२ वीतला मुलगाच वाटायचो. माझा एक रूममेट जिमला जायचा. शेवटी त्याच्याबरोबर जायला लागलो. अगदी इन्स्ट्रक्टर सुद्धा लावला. त्याने सांगितलं कि भात आणि डाळ भरपूर खा. त्याला बिचाऱ्याला माहित नव्हतं की मी जितका डाळ भात दिवसाला खायचो बहुधा त्याच कुटूंब तेवढा आठवड्याला खात नसेल. त्याला माझ्या खाण्याबद्दल सांगितलं तेव्हा फक्त त्याचे डोळे पांढरे व्हायचे बाकी होते. त्यानंतर प्रोजेक्ट प्रेशरच्या नावाखाली ती जिमदेखील कधी बंद झाली ते कळलं नाही.

शेवटी ते जिमचं भूत मी माझ्या मानगुटीवरून काढून टाकलं. आपल्याला बॉडी बनवून कुठे मारामारी करायला जायचं नाहीय हे स्व:ताला समजावलं. बॉडी बिल्डींगपेक्षा फिटनेस महत्वाचा आहे हे मनाला पटवलं. आज रोज बऱ्यापैकी अंतर चालणं, लिफ्ट न घेता जिन्याने चढणं, बऱ्याच लॉंग डिस्टन्स मोटर सायकल राईड्स करणं, अधून मधून क्रिकेट खेळणं असं करून मी आजपर्यंत माझा फिटनेस टिकवून आहे, पण अंगावर मांस कधी चढलं नाही ते नाहीच.

2 comments:

Pankaj - भटकंती Unlimited said...

मीही अगदी असाच आहे. पण सलग बारा-चौदा तास ट्रेक, क्लाईंब, पाच-पंचवीस किलोमीटर चालणं, दोन-तीन वर्षे आजारपणच न पाहणं यासारखी दुसरी आरोग्यसंपत्ती आपण बाळगून असतो. त्यामुळे वजन कमी असले तरी आपल्या वाटेला सहसा कुणी जात नाही.

Photographer Pappu!!! said...

धन्यवाद पंकज, हो अशीच आरोग्य धनसंपदा हवी. भारतात आल्यावर तुझ्या बरोबर भटकंतीला येण्याचा प्लान आहे माझा :)