Saturday, September 5, 2009

हे करून पहा.. मज्जाच मज्जा!!!

कधी कधी रस्त्यावर चालताना वा गाडी चालवताना विषय सुचतात, वाटतं आत्ता घरी गेल्यावर यावर पोस्ट लिहून टाकू. पण घरी येइपर्यंत ते काय होतं तेच आठवत नाही. तर कधी कधी काही विषय, काही घटना इतक्या छोट्या असतात की त्यावर (माझ्या कुवतीच्या लेखकाला) एक लेख शक्य होत नाही. म्हटलं की आज अशाच छोट्या छोट्या गोष्टींना एकत्र करुन काही लिहिता येतय का ते पाहू. यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या वेंधळेपणाच्या आहेत, तेव्हा हासू नका बरं आम्हास्नी :)

१. अकरावीला माझं कॉलेज घरापासून चालत २५ मिनिटांवर होतं. रोज चालत जायचो अन चालत यायचो. शायनींग मारायला माझी सायकल कधी येतेय याची वाट बघत होतो. म्हणजे घरच्यांनी सायकल घेऊन द्यायचं प्रॉमिस केलं होतं. दहावीला ८१% मिळाले होते ना (असं काय बघताय फडतूसासारख, १९९२ साली ते भरपूर होते बरं का). शेवटी एकदाची सायकल आली. दुपारी सायकलवरून गेलो कॉलेजला. संध्याकाळी निघताना रोजच्या गँगबरोबर बाहेर पडलो. अर्ध अंतर चालल्यावर लक्षात आलं.. आयला आपली सायकल कुठाय?? ती बिचारी तशीच कॉलेजच्या पार्किंग लॉट मध्ये आपल्या धन्याची पाट बघत होती.

२. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यासारखं कंटाळवाणं काम कुठलं नसेल. पण जन रीत म्हणून करावं लागतं. अशाच एका सकाळी मी ब्रश करायला सुरुवात केली. बश करताना मी जवळ जवळ अर्ध्या झोपेतच असतो. तसाच त्या दिवशीही होतो. ब्रश करताना काहीतरी वेगळं वेगळं जाणवत होतं. जरा डोळे उघडून नीट बघितलं.... त्या दिवशी वापरली गेलेली टूथपेस्ट होती.... पामोलिव्ह शेविंग क्रिम.... पामोलिव्ह दा जवाब नही...

३. मुंबईत नाल्याच्या बाजूला भैय्याच्या बरबटलेल्या हातांनी बनवलेली पाणीपुरी खाणारा मी इकडे अमेरिकेत आल्यापासून पाणी मात्र विकत आणून पितो (माज चढलाय, दुसरं काय). पाच गॅलन ची ३ कॅन्स भरून आणतो. पुरतात २-३ आठवडे. एकदा भरलं पाणी आणि मग लक्षात आलं कि पैशाचे पाकीट घरीच विसरलो. मग काय, ट्रॉली लावली कोपऱ्यात, गेलो घरी, आणलं पाकीट .. बरं एकदा करून शिकायचं की नाही? ही गोष्ट मी ३-४ वेळा केलीय. शेवटी मी गाडीतच थोडे पैसे ठेवायला सुरुवात केली.

४. हे मी केलेलं नाहीय (हुश्श्श, बरं वाटलं बाबा). शाळेत असताना आम्हाला भूगोलात कस्तुरी मृगावर एक धडा होता. कस्तुरीमृगाच्या बेंबीत कस्तुरी असते म्हणे. परिक्षेत कस्तुरीमृगावर टीप लिहा म्हणून प्रश्न होता. त्यात माझ्या एका वर्ग मित्राने लिहिलं होतं.... कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरीची डबी असते... आणि तो पेपर आमच्या मॅडम नी वर्गात वाचून दाखवला होता :) मी पण असला करामाती प्रकार केलाय पण सर्वांसमोर नाही :) कुठल्या तरी शिक्षक दिनी मी गणितातली समीकरणे शिकवणार होतो. त्याची आदल्या दिवशी प्रॅक्टिस करत होतो. आई, वडील आणि मुलाचं समीकरणे वापरून वय काढायचं होतं. माझ्या समीकरणाने मला मुलाचं वय २५ वर्षे, आईचं वय १३ वर्षे आणि वडीलांचं वय ६-७ वर्षे असं काहीतरी दिलं होतं :)

बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आता आवरतं घेतो :) आहे का मला कॉम्पिटिशन देणारा कुणी???

4 comments:

Mahendra Kulkarni said...

सायकल म्हणजे प्राईड पझेशन असायचं.. प्रत्येकाकडे एक तर ऍटलस किंवा हिरो ची सायकल असायची. एखादा खुपच शौकिन असला तर बी एस ए.. छान लेख आहे. जुन्या खुप गोष्टी नजरेसमोर तरळून गेल्या.
आणि बेंबीत कस्तुरिची डबी... :)

Photographer Pappu!!! said...

Thanks Mahendra ji :),

I had hero hawk racing cycle, and remembered that equation incident because of your shikshak din post :)

Ajay Sonawane said...

are brush cha anubhav chan vatala , majhahi ekda same asach jhala hota,
BTW, band kara ha option tu kadhun ka takat nahi, evdhe chagale post lihun sudha to count bhagana mala avdat nahi

सिद्धार्थ said...

"दहावीला ८१% मिळाले होते ना (असं काय बघताय फडतूसासारख, १९९२ साली ते भरपूर होते बरं का)"...
एकदम मान्य अहो १९९२लाच नव्हे पण १९९७ पर्यंत पण ८१% फार होते. कारण १९९७ साली देखील मला नाही ८१% मिळाले. हल्लीचे मार्क बघून मी ईसवी सन २००० पूर्वीच दहावीची वेस ओलांडली ह्याबद्दल स्वत:चा आभारी आहे. बाकी पोस्ट मस्त आहे.