बरेच महिने ब्लॉग विश्वापासून फरारी असल्याबद्दल क्षमस्व. मॅक वर मराठी टायपिंगचे लोचे, घराच्या छतावर उभे राहिलं तरी गळ्यापर्यंत येणारं काम अशी अनेक कारणं देता येतील, पण कधी कधी वेळ असूनही काही न लिहिण्यामागे आळशीपणा हेच एकमेव कारण आहे :( माझा हा लेख मायबोलीच्या २०१० हितगुज दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता. २०११ मध्ये कमीत कमी एक तरी लेख असावा म्हणून इकडेही पेस्टतो आहे. :)
********************************************************************************************************************************
ऑगस्ट महिन्यात अजून एक ट्रीप झाली नाही तर नॅशनल पार्क चा पास एक्स्पायर होतोय आणि ८० डॉलर वसूल होत नाहीयत, उन्हाळा संपत आला तरी कुठेच भटकंती झाली नाहीय, मोटरसायकल पार्किंग मध्ये धूळ खातेय, ऑफिस/घर/ऑफिस करून करून गाढवाचं जीणं नशीबी येतय, .... एवढी कारणं माझ्यातला भटका भगत जागवायला पुरेशी होती. बुधवारी रात्री निर्णय घेतला की येत्या विकांताला योसेमिटे-मोनो लेक ला मोटरसायकल दामटायची. कोणी कंपनी द्यायला येतय का म्हणून विचारायला चार बाईकर्स आणि १५-२० कारवाल्या मित्रांना मेल केला. अर्थात इतक्या शॉर्ट नोटीसवर कोणीही यायला तयार झाले नाही. पण आपला विचार एकदा झाला कि झाला. शेवटी एकट्यानेच जायचं ठरवलं. होम मिनिस्टरांची इतक्या लांब मोटरसायकल वर बसण्याची शक्यता अजिबात नव्हती. शेवटी होम मिनिस्टरांकडून हो ना करत मला एकट्याला जाण्याची परवानगी पदरात पाडण्यात मी यशस्वी झालो.
मोटरसायकलवर रपेट करायची तर सुरक्षितता सर्वात महत्वाची. भारतात असताना मोटरसायकलवर अगदी ब्रेड आणायचा झाला तरी मी हेलमेट वापरत असे. हेलमेट हवं की नको हे वाद फक्त भारतातच नाही तर अगदी अमेरिकेतही होतात, पण म्हणतात ना सर सलामत तो राईड पचास. त्यातल्या त्यात भारतात मोटरसायकलचा वेग आणि वजन पाहता हेलमेट आणि थोडं जाड जॅकेट असले कि चालून जातं पण इकडे मात्र हेल्मेट सोबत राईडीन्ग जॅकेट , पॅंट, बूट आणि ग्लोव्ज वापरलेलं चांगलं असतं. ३०० किलो च्या मोटारसायकलवरून १२० kmph च्या वेगाने पडलो तर जगायला एवढं सगळं लागणारच ना :) त्याचबरोबर मोटरसायकल चालवायला सुरक्षित आहे की नाही हे देखील वेळोवेळी पाहणं योग्य असतं. टायर थ्रेड चेक करणे, तेल हवा पाणी योग्य आहे की नाही ते पाहणे, लादलेले सर्व सामान व्यवस्थित लादले गेलेय कि नाही ते पाहणे, कुठून खड खड आवाज येत असेल तर त्याचा योग्य तो बंदोबस्त करणे इतक्या गोष्टी तर नेहमीच केल्या गेल्या पाहिजेत. कार च्या तुलनेत मोटरसायकल ट्रिपसाठी जरा जास्त काळजी घ्यावी लागते पण एकदा का मोटरसायकल रपेटीचं व्यसन जडलं की ते मग उतरताना कठीण असतं. या सर्व गोष्टी आदल्या रात्रीच करून झाल्या होत्या. सकाळी बेसिक चेक करून लगेच निघायचा बेत होता. पण एरवी चटकन संपणारा शुक्रवार आज रेंगाळत होता. सगळी पॅकिंग संपवूनही बराच वेळ शिल्ल्क होता. लवकर उठायचं म्हणून लवकर झोपायला गेलो तर झोपही येत नव्ह्ती. अखेरीस रात्रभर ५० वेळा घड्याळ पाहून झाल्यावर एकदाची शनिवारची पहाट उजाडली. पावणे सातला मोटरसायकलला कॅमेरा बॅग, सॅडल बॅग, टॅंक बॅग आणि ट्रायपॉड बांधून मी तयार झालो. ६५ मैल/तास(१०५ kmph) च्या वर मोटरसायकल न्यायची नाही, सांभाळून जायचं, झोप आली तर मोटरसायकल बाजूला लावून तोंड धुवायचं अशा १००० सुचना ऐकता ऐकता ७ वाजले आणि एकदाचा मी मार्गाला लागलो. जीपीएस योसेमिटे ३.५ तासाच्या अंतरावर दाखवत होता, एखाद-दूसरा फोटो ब्रेक आणि फ्युएल ब्रेक घेऊन माझ्या अंदाजाप्रमाणे साधारण ११-११:३० पर्यंत पोहोचायला काही हरकत नव्हती. पहाटे हवेत गारठा होता. मूठी ग्लोव्ह्ज असूनही गारठत होत्या पण त्या गारठ्यामुळे निसर्गाच्या एकदम कुशीत शिरल्यासारखं वाटत होतं. मला वाटतं असला अनुभव घेण्यासाठी बाईकच हवी, कार नामक पिंजऱ्यात तो कधीच मिळणं शक्य नाही. शहरातल्या गर्दीत मोटरसायकल चालवणे आणि शहराबाहेरच्या मोकळ्या निसर्गात मोटरसायकल चालवणे यात अल्ताफ राजाचं गाणं ऐकणे आणि रफी साहेबांच गाणं ऐकण्यातला जो फरक आहे तो आहे. ज्यांनी मोटरसायकल वर अजून शहराबाहेर एकाही रपेट केली नाहीय त्यांनी शहराबाहेर एखाद्या विकांताला ३-४ तासांची एक रपेट करून बघा. पुण्याचे लोकं महाबळेश्वरला जाऊ शकतात आणि मुंबईचे लोक लोणावळा खंडाळा वा माथेरान करू शकतात. कोकणातले रस्ते तर एकदम मस्तच आहेत, ख़ास करून NH17 पण हो, safety first बरं का :)
२ तासांनी योसेमिटेचा घाट सुरू व्ह्याय्चा आत एक ब्रेक घेतला. गुड डे बिस्कीटे खाऊन येण्या जाणाऱ्या मोटरसायकल वाल्यांना हात दाखवत त्यांना गुड डे विश करत होतो :)फक्त ४५ मैल अंतर बाकी राहिले होते. पण आता उरलेले अंतर घाटात होते. जस जसा वर चढत होतो तस तसे दरीचे रूप मोहक होत होते. प्रत्येक हेअर पिन बेंडला उभं राहून फोटो काढावासा वाटत होता. दरीत फॉल कलर्स ऑगस्ट मध्येच यायला सुरुवात झाली होती, पहा तुम्हाला दिसतायत का ते.
योसेमिटे हा पार्क जवळपास १२०० चौ.मैलांवर पसरलेला आहे. नयनरम्य धबधबे, श्वास रोखून धरायला लावणारी सिनरी, जंगली जनावरं आणि रोज भेट देणारी माझ्यासारखी असंख्य टाळकी यासाठी प्रसिद्ध आहे. हायकिंगची मजा लुटण्यासाठी फार चांगले ठिकाण आहे. मर्क रिव्हर व्हाईट वॉटर राफ्टींगसाठी प्रसिद्ध आहे. पाचव्या स्तरापर्यंत तेथे राफ्टींग करता येते.
११:१५ च्या सुमाराला योसेमिटेच्या गेटवर पोहोचलो. तिथे वाहनांची भली मोठी रांग लागली होती. माझा नंबर येईपर्यंत १५-२० मिनिटे गेली. माझ्याकडे पास आहे असं सांगितल्यावर तो न पाहताच मला आत सोडण्यात आलं. आत गेल्यावर पावला पावलावर फोटो काढावेसे वाटत होते. मोटरसायकल असल्यामुळे पार्किंगचा जास्त प्रॉब्लेम नव्हता. योसेमिटेत काढलेले हे थोडे फार फोटो. त्या रिफ्लेक्श्न लेकचा एक फोटो काढल्यावर कुणीतरी उपद्व्यापी कार्ट्याने त्या पाण्यात एक दगड मारला, त्याच्यापाठोपाठ त्याच्या बापाने एक मारला. मला त्या दोघांनाही मारून पाण्यात फेकावेसे वाटत होते पण इंग्रजीतला एक चार अक्षरी शब्द उच्चारण्यापलीकडे काहीच करता आलं नाही.
दिवसभर साफ असणारे आकाश आता भरून यायला लागले होते. मग मी ते पाणी स्थिर होण्याची वाट न पाहता तिथून काढता पाय घेतला. मला सूर्यास्तापूर्वी मोनो लेकला पोचायचे होते. आकाश आता पूर्ण अंधारून आले होते. वाटेत टेनाया लेकच्या इथे हे विलोभनीय दृश्य दिसले आणि थांबलो.
एका छोट्याश्या सरीनंतर आता आकाशातील मळभ सरू लागलं होतं, पण कॅलिफोर्नियातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या टिओगा पासच्या घाटात अत्यंत वेडीवाकडी हवा वाहत होती. ६५० पौंडाच्या मोटरसायकलीला त्याच्यावरच्या १५० पौंडाच्या स्वारासहीत दरीत ढकलायला बघत होती. त्या घाटात दरीच्या दिशेला संरक्षक कठडेही नव्हते.
उन्हाळा संपायला आला तरी जागोजाग बर्फाच्छादित टेकड्या दिसत होत्या. थांबून फोटो काढावेशे वाटत होते, पण न जाणो ह्या हवेने १५० पोंडाच्या मला दरीत भिरकावले तर या भीतीपायी मी न थांबता चालत राहिलो. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास मोटेल मध्ये चेक इन केले. जाऊन पाहतो तर काय, रूम मध्ये फक्त बेसिन आणि बेड होता. फोनवर बुक करताना त्यांनी मला बेसिन आणि बाथरूम शेपरेट असतील म्हणून सांगितलं होतं. मला वाटलं की एकाच रूम मध्ये बेसिन बाथरूमच्या बाहेर असेल, पण ते एवढे शेपरेट असतील असं वाटलं नव्ह्तं :) सुर्यास्ताला अजून अवकाश होता. एक कॉफी मारून जरा ताजातवाना झालो. साऊथ टुफा तिथून ७ मैलांवर होती. म्हटलं लवकर जाऊन थोडी मोक्याची जागा पटकवावी. जाऊन पाहतो तर मोक्याच्या जागा अगोदरच पटकवल्या गेल्या होत्या. त्यातल्या त्यात एका बऱ्या जागेवर मी माझ्या ट्रायपॉडचा संसार मांडला. थोडेफार प्री-सनसेट फोटो काढून झाल्यावर सूर्यास्ताची वाट पाहू लागलो. पण नशीबात बहुते सूर्यास्ताचे रंग नव्हते. तासाभरापूर्वी निरभ्र असणारी पश्चिम दिशा अचानक ढगांनी भरून गेली. सूर्यास्त नशीबी नाही म्हटल्यावर सगळे फोटोग्राफर काढता पाय घेऊ लागले. काही वेळापूर्वी असणारी शेकडा माणसे निघून गेली आणि हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच टाळकी तिथे शिल्लक राहिली. निसर्गाला बहुतेक उरलेल्यांची दया आली असावी, त्यामुळे सूर्यास्ताचे नारिंगी केशरी नसले तरी आसमंत एका गूढ निळ्या रंगाने त्याने भरून टाकला.
अंधार पडल्यावर मी परत निघालो, वाटेत एक नेव्ही बीच १ मैल दर्शवणारी पाटी दिसली. म्हटलं एवढं आलोय तर अजून एक मैल जाऊन येऊ आणि वळवली मोटरसायकल तिकडे. मोठ्ठी चूक. तो रस्ता एकतर निर्मनुष्य होता आणि कच्चा होता. शेवटी होऊ नये ते झालं. माझ्या बाईकचं मागील चाक मातीत रुतून बसलं.
ते ३०० किलोचं धूड माझ्या एकट्याने हलणं तर शक्यच नव्हतं. इमर्जन्सी सर्विस वाले म्हणाले की आम्ही नाय बा कच्च्या रस्त्यावर येत. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं आणि रात्रीचे ९ वाजले होते. मला दूरवर एक दिवा लुकलुकताना दिसला. जाऊन पाहतो तर एका आर.व्ही मध्ये एक गोरे कपल व्हेकेशन वर आलं होतं. त्यांना मोटरसायकल हलवण्याबाबत विनंती केली. नशीबाने ते तयार झाले. त्यांच्या मदतीने कशी तरी ती मोटरसायकल बाहेर काढली आणि नशीबाने त्याच्या नंतर मुख्य रस्त्यावर येईपर्यंत ती कुठे अडकली नाही.
मोटेलवर परत आलो तेव्हा दिवसभरात २८१ मैल रपेट करून झाली होती. त्या छोट्याश्या गावात रात्री मी पोहोचेपर्यंत खायचे सगळे पर्याय बंद झाले होते, पण बराच थकल्यामुळे भुकेल्या पोटीही मस्त झोप लागली.
रात्रीच्या प्रकारामुळे होम मिनिस्टरांकडून रविवारी सकाळी उजाडलं की गपगुमान घरी यायचं अशी सक्त ताकीद मिळाली होती. पण घरच्या वाटेत बोडीचं स्टेट पार्क आहे म्हटल्यावर माझ्यातला फोटोग्राफर चाळवला. म्हटलं फक्त बोडीसाठी पुन्हा एक ट्रिप होईल की नाही कोणास ठाऊक. बोडी हे कॅलिफोर्नियाच्या गोल्ड रश साठी उभारलेलं आणि एकेकाळी १०००० लोकसंख्या असणारं एक छोटसं गाव. पण त्या गावात गोल्ड रश मुळे रोजच एक दोन मुडदे पडायला लागले. अस होता होता साधारण ५०-६० वर्षापूर्वी तिथला शेवटचा माणूस सोडून गेल्यावर ज्या स्थितीत गाव आहे त्याच स्थितीत त्याचं जतन करण्यात आलं. फोटोग्राफर्स पॅराडाईस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागांपैकी ही एक जागा आहे. होम मिनिस्टरच्या धमकीमुळे तिथे केवळ एक तास घालवून मी परतलो. ही त्या भुताटकीने झपाटल्यासारखी दिसणाऱ्या गावाची काही चित्रे.
परतताना सोनोरा पास नावाच्या घाटातून गेलो. हा माझ्या आत्तापर्यंतच्या रपेटीतला सर्वात सुंदर मार्ग होता, पण घरी लवकर पोहोचायचं असल्यामुळे मी तिथे थांबलो नाही. तेवढंच पुन्हा राईड करण्यासाठी निमित्त :) ६ तासांच्या राईडनंतर आणि ५६२ मैलांच्या रपेटीनंतर जेव्हा संध्याकाळी घरी पोहोचलो तेव्हा शरीर थकलं होतं, होम मिनिस्टर रागावले होते पण मन मात्र एकदम ताजंतवानं झालं होतं...
Wednesday, February 9, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
मस्त रपेट झाली. शेवटचे तिन फोटो अप्रतीम आले आहेत. एखाद्या कॉंपीटिशनला पाठवण्यासारखे..
महेंद्रजी धन्यवाद.
तुम्ही म्हणताय तर पाहतो कुठल्यातरी competitionla पाठवून :)
Post a Comment