Friday, October 9, 2009

काटकसर की उधळपटटी??

बरेच दिवस या विषयावर लिहायचा विचार होता, पण या ना त्या कारणाने ते राहून जात होतं. काही दिवसांपूर्वी भारताची चांद्रयान मोहिम अकाली संपृष्टात आली, परंतु जाता जाता चंद्रावर पाणी असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळाले आहेत. सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे. पण.......

......पण याची दुसरी बाजू म्हणजे अशा मोहिमांवर खर्च होणारा वेळ आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावर खर्च होणारा पैसा. अशा एका मोहिमेसाठी अब्जावधी डॉलर्सहून अधिक खर्च येतो म्हणे. रुपयांत हा खर्च मोजायचा झाला तर एकावर किती शून्य पडतील याचा विचारच माझ्या मेंदूला झेपत नाहीय. बरं केवळ या मोहिमेपुरतं बोलायचं झालं तर इतक खर्च करुन महत्वाचा निष्कर्ष काय तर चंद्रावर पाणी आहे याचे संकेत. असेल खरचं पाणी तर आपण काय चंद्रावर राहायला जाणार आहोत की चंद्रावरचं पाणी पृथ्वीवर आणून विहार तलावात ओतणार आहोत? आणि खरचं तसं करायचं ठरवलं तर अंटार्क्टिकेला जो पाण्याचा जवळपास अमर्याद साठा आहे तो आणून ओतणं जास्त स्वस्त पडणार नाही का?

कुठल्याही व्यवसायात मनुष्य रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट (ROI) चा विचार केल्याशिवाय शक्यतोवर पडत नाही. फार कशाला, रुपयाला घेतलेली मेथीची जुडी दिड रुपयाने विकली जावी हा विचार रस्त्यावर भाजी विकणाऱ्या मावशी करतात. पण या अवकाश मोहिमांचे ROI कुणालाच नक्की माहीत नसते. म्हणजे इन्वेस्ट्मेंट अब्जावधी डॉलर्स आणि ROI काय तर चंद्रावर पाण्याचे संकेत आणि इतर संशोधनयोग्य माहिती? बरं हे अब्जावधी डॉलर्स येतात कुठून. सरकारच्या तिजोरीत डॉलर्स ठेवायला जागा नाही म्हणून सरकार अशा मोहिमांवर ते उधळताहेत अशातलाही काही भाग नाहीय. तुमच्या आमच्या सारख्यांचे टॅक्स चे पैसे अन बहुतेक कधीही न फेडता येणारं जागतिक बॅंकेकडचं कर्ज या पैशांवर या मोहिमा चालवल्या जात आहेत.

अशा मोहिमांमधून काढण्यात येणारे निष्कर्ष हाही एक संशोधनाचा विषय आहे. सर्व राष्ट्रांनी इतकी वर्षे केलेल्या अवकाश संशोधनानंतरही आज आपण येत्या काही दिवसांचे हवामान नक्की वर्तवू शकत नाही. आजही आपण येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल असे न म्हणता मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे म्हणतो. गेली ३ वर्षे मी अमेरिकेची weather.com follow करतोय. त्यातही ते बऱ्याचदा चुकतात. चला एखादे वेळेस हवामानाच्या संशोधनासाठी अशा मोहिमांवर खर्च करणे मान्यही करू पण यांच्या संशोधनाचे विषय तर पहा, म्हणजे मंगळावर जीवसृष्टी आहे की नाही, पृथ्वी सारखा दुसरा ग्रह आहे का, aliens आहेत की नाही, दुसऱ्या ग्रहांवर खनिजांचा साठा आहे की नाही. असल्या नसत्या चांभार चौकशांसाठी खरच अब्जावधी डॉलर्स उधळणं योग्य आहे का? मंगळावर जीवसृष्टी असेल तर काय त्यांच्याबरोबर फोन-फोन खेळायचय की पृथ्वी सारखा ग्रह सापडला म्हणून लगेचच तिकडे राहायला जायचं? डिस्कवरी वर एकदा दाखवत होते की इकडचे संशोधनकर्ते गेली कित्येक वर्षे aliens साठी रोज येडचाप सारखे सांकेतिक संदेश पाठवताहेत पण आजपर्यंत एकही alien ने उत्तर पाठवले नाहीय. अरे असतील aliens तर त्यांना त्यांच्या ग्रहावर सुखाने जगू द्या की. इकडे बोलवून काय टी-२० च्या मॅचेस घ्यायच्या आहेत त्यांच्याबरोबर? या पैशाचा आहे त्या पृथ्वीवर नंदनवन फुलवण्यासाठी वापर करता येणार नाही का?

एक वेळ अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांनी अशा मोहिमा राबवण्यात काही गैर नाही. एक तर या मंदीच्या काळातही ते इतरांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या देशात उपाशी आणि बेघर नागरिकांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. नागरी सुविधा मुबलक आहेत. पण भारतासारख्या देशाने अशी उधळपटटी करणं कितपत योग्य आहे. त्या पैशांतून भारताला अगोदर ’प्रगतीशील’ अवस्थेतून ’प्रगत’ अवस्थेत नेणे शक्य होणार नाही का? एका चांद्रमोहिमेच्या खर्चात माझ्यामते शेकडो गावे सहज वसवता येऊ शकतील. जास्त नाही, फक्त अगदी मूलभूत गरजा; अन्न, वस्त्र आणि निवारा. एकदा का सामान्यातल्या सामान्य माणसाला दोन वेळचं जेवण, राहायला निवारा अन ल्यायला कपडे मिळाले की मग विचार नाही का करता येणार अशा मोहिमांचा?

फार दूर कशाला? अरबी समुद्रात शिवरायांचा ४०० करोड रुपये खर्च करून statue of liberty हून उंच पुतळा बसवण्यात येणार आहे. तसा तो गेल्या विधानसभा निवडणूकीपासून बसवण्यात येतोय आणि बहुतेक पुढच्याही निवडणूकीत बसवण्यात येइल, फक्त त्याचा खर्च कागदोपत्री १००० कोटींवर गेलेला असेल. तर सांगायचा मुद्दा असा की त्या करोडो रुपयांत हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही का?

अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात काटकसर करता येऊ शकते. एका मित्राशी चर्चा करताना तो म्हणाला होता की तू कुठे काटकसरीनं जगतोयस तुझं जीवन, घेतलास की लाखभर घालून एक SLR. मी नाही म्हणत नाहीय पण मी काही सरकारचा पैसा खर्च करत नाहीय. तो पैसा मी कष्ट करून कमावला आहे आणि मला पूर्ण अधिकार आहे तो खर्च करण्याचा. पण जेव्हा हजारो law abiding citizens पोटाला चिमटा काढून टॅक्स भरतात तेव्हा तो नीट वापरला जावा अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

मला कल्पना आहे की हा लेख लिहून परिस्थितीत काही फरक पडणार नाहीय. अवकाशयाने तशीच उडत राहतील अन भविष्यात कधीतरी शिवाजी महाराज अरबी समुद्रात घोडयावर स्वार होतील, पण मनातील घुसमट कमी व्हायला याचा नक्कीच उपयोग होईल :)

7 comments:

Neal said...

" मी नाही म्हणत नाहीय पण मी काही सरकारचा पैसा खर्च करत नाहीय. तो पैसा मी कष्ट करून कमावला आहे आणि मला पूर्ण अधिकार आहे तो खर्च करण्याचा. पण जेव्हा हजारो law abiding citizens पोटाला चिमटा काढून टॅक्स भरतात तेव्हा तो नीट वापरला जावा अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?"

agdi barobor bolalat ..... kharech khup khant vatate manala ki Bharata madhe kiti tari priorities sodun ashya nirarthak gosti la pradhyana dile jaate.

Nilesh

Mahendra said...

इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत,तेंव्हा तिकडे खर्च करायचा हे विनाकारण खर्च थांबवले पाहिजे. आता पाणि आहे, पण त्याचा उपयोग काय?? एखाद्या प्रगत राष्ट्राने, ज्याच्या पुढे इतर कुठल्याही समस्या नाहित त्याने असं केलं तर ठिक आहे.. पण भारताने इतका खर्च करणं कितपत योग्य आहे?

कांचन कराई said...

१००% टक्के सहमत. चंद्रावर पाणी सापडलं तर तिथून इथपर्यंत पाईपलाईन टाकायचा खर्च करायला पण तयार होतील. पण तेच इथे केलं तर स्वस्तात काम होणार नाही का? शिवाय ह्या मोहिमांमुळे ग्लोबल वॉर्मिंगला किती भर पडत असेल. शिवरायांच्या पुतळ्याबाबतीत उद्धव ठाकरेंनी जे म्हटलं त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला पाहिजेत. पुतळ्याच्या खर्चासाठी जनतेला वेठीस पकडण्यात काहीच अर्थ नाही. अवकाशयानं सोडण्यापेक्षा सर्वच राष्ट्रांनी ’जमिनीवर राहून’ विचार केला तर खूप बरं होईल, असं मला पण वाटतं.

Anonymous said...

अगदी बरोबर. माझा आणि तुमचा लेख एकाच विषयावर आणि तो देखील एकाच मताचा. खूपच छान योगायोग घडला. काय बोलू तुमच्या लेखाबद्दल माझ्या मनातल तुम्ही बोललात.

Photographer Pappu!!! said...

नील,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. खरच आपल्या राज्यकर्यांना प्राइयारिटी सेट करता आल्या असत्या तर अजून काय हवय :)

महेंद्रजी,
अगदी बरोबर बोललात. हे म्हणजे लेंग्याला नाही नाडी, अन हवीय मला मर्सिडीज गाडी

कांचन,
अगदी खरं, पाईपलाईन टाकायला ही कमी करणार नाहीत हे लोक

हेमंत,
तुमच्या पोस्ट्मधला दगड धोंड्यांचा अभ्यास करण्याचा मुद्दा पटला आपल्याला. अरे चंद्रावर नसतील इतके दगड माझ्या गावच्या नदीत आहेत, या म्हणाव अभ्यास करायला, रेल्वेच तिकिट फक्त ९० रुपये आहे :)

Shirish said...

jidnysa hi manvachi naisargik mansikta ahe tiche mojmap apurna buddhivadane hou shakat nahi matra shodhkarya gulamgirit rahun karne vait ahe agodar swatachya payavar ubhe rahave mag pani shodhave !

Mukul said...

100% correct.
but there are lot of such nonsense spending.
few days back Mr Chidambaram announced help of more 50 crore Rs to Srilanka.
what about hungry people in india?

mukul