मी पोचलो आणि १५-२० १८०० सीसी गोल्डविंग बाईकच्या मध्ये माझी VTX १३०० सी सी उभी केली. त्या दैत्यांसमोर माझी मोटरसायकल एकदम कुक्कुलं बाळ वाटत होती.

जॉय आणि प्रिति अगोदरच तिथे पोचले होते. सगळ्यांशी ओळख झाली. सगळे कमीत कमी ५० च्या वरचे म्हातारे म्हाताऱ्या होत्या पण बाईक चालवायचा उत्साह एकदम दांडगा. अर्ध्याहून अधिक लोकांकडे मोटरसायकल चालवताना एकमेकांशी बोलण्यासाठी हेल्मेटमध्ये इंटिग्रेट केलेले रेडिओ सेट होते. जवळपास प्रत्येक गोल्डविंगमध्ये सीडी प्लयेअर आणि जीपीएस होता. एका सुजान नावाच्या म्हातारीकडे बहुतेक या जगातली सर्वात रंगीबेरंगी गोल्डविंग होती. हा पहा तिचा तिच्या मोटरसायकलसहीत फोटो. किरण, ही बाईक म्हणजे a car on two wheels आहे.

मीटिंग नंतर माऊंट हॅमिल्टन येथे जायचे ठरले. साधारण ८० मैलांचा घाटात रस्ता होता. १०-१५ मैल, हायवेवर १८०० सीसी गोल्डविंग्सशी बरोबरी करताना नाकीनऊ येत होते. ते सर्वजण १००+ मैल/तास (१६० किमी/तास) ने चालवत होते. मी माझ्या लिमिटमध्ये(९५ मैल/तास) राहूनच त्यांना फॉलो करायचे ठरवले. फ़्री वेवर १० मोटरसायकल्स स्टॅगर्ड फॉर्मेशन मध्ये एका लेन मध्ये धावताहेत हे दॄष्यचं मोठं विलोभनीय होतं. तो आवाज ऐकून आमच्या लेनमधील मोटारी एक एक करत बाजूला होऊन आमच्यासाठी लेन मोकळी करून देत होत्या. १० मैलांनंतर घाटातला रस्ता सुरू झाला आणि मला माझ्या पुणे-मुंबई-गोवा राईडची आठवण झाली. कशेडी, परशूराम घाटात जशी नागमोडी वळणे होती अगदी तशीच इथेही होती पण जवळपास ८० मैल तसेच चालवायचे होते. त्या वळणांवर ३१५ किलो ची बाईक चालवताना भारीच मजा येत होती.
२५-३० मैलानंतर आमच्या लीडरने थांबायची खूण केली. त्यांना रॅन्च मध्ये घोडे दिसले. मग एक फोटो ब्रेक झाला. सगळे म्हातारे म्हाताऱ्या घोड्यांना काही ना काही खायला देऊ लागले.

१२० हॉर्सपावर असलेल्या गोल्डविंग्चे मालक मालकीणी ४ हॉर्स ना चणे खायला देताहेत हे पाहून १ हॉर्सपावर अशी दात काढून हसली.

तिथून निघालो आणि पुन्हा मार्गी लागलो. रस्ता आता अजूनच अरुंद होत चालला होता. मधली येलो लाईन नाहीशी झाली होती आणि रस्ताभर माती पसरली होती. फ्रीवेवर १०० च्या स्पीडने चालणारे आता २५-३० च्या स्पीडवर आले होते. रस्त्यात असणाऱ्या ऑब्स्टॅकल्स ची एकमेकांना जाणीव करून देत होते. एकदम शिस्तीत एकामागून एक चालले होते. ५० एक मैलानंतर एका रेस्टॉरंट जवळ एक ब्रेक घेतला. निसर्गसानिध्यात आत्तापर्यंत ३ तासांची राईड झाली होती, पण तरीही निसर्ग हाक देतच होता. रायडिंग जॅकेट आणि जीन्स वर रायडिंग पॅण्ट घालून निसर्गाच्या हाकेला ओ देण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. रायडिंग पॅण्ट्ची झिप अनझिप करून मी ’ते’ शोधायला लागलो आणि मग लक्षात आलं की अजून एक लेयर अनझिप करावी लागणार :)

तिथून जॉय आणि मी लवकर निघालो आणि बाकिच्या लोकांचा फोटो काढण्यासाठी एक मोक्याची जागा पाहून थांबलो. मग येणाऱ्या बाईकर्स चे असे फोटो काढले.
शेवटी माऊंट हॅमिल्टन च्या माथ्यावर पोचलो. एक ग्रुप शॉट घेतला, थोड्या गप्पा मारल्या आणि पांगलो. जॉय आणि मी थोडी फोटोग्राफी करत थांबायचं ठरवलं आणि बाकीच्या ग्रुप ला बाय बाय केलं. ते पुढे निघून गेले आणि मग आम्ही ब्रेक घेत घेत फोटोग्राफी करत परत आलो.

ट्रिपचे सगळे फोटो पाहण्यासाठी खाली टिचकी मारा.
http://www.flickr.com/photos/pappupp/sets/72157623660591012/