Tuesday, November 22, 2011

झोप!!!!!

शनिवारी रविवारी वा एखाद्या लाँग विकेंडला जर का कुठे भटकंतीचा बेत नसेल तर जास्तीत जास्त कसं काय झोपता येईल याचाच विचार मनात असतो. तशी माझी झोप म्हणजे कुठेही खुट्ट झालं कि डोळे खाडकन उघडणारी त्यामुळे गाढ झोप येणारयांची मला जरा असुयाच वाटते. पण तरीही झोपणे हा माझा फेवरेट टाईमपास आहे :) तसंच एकदा झोपल्यावर पुढच्या दिवशी मी अलार्म न लावताही उठू शकतो. म्हणजे तसा मी अलार्म लावतोच आणि अलार्म वाजायच्या २ मिनिटं अगोदर उठून तो वाजल्यावर स्नूझ करून पुन्हा १०-10 मिनिटं झोपतो. असं जवळपास ४-५ वेळेला झाल्यावर एकदाचा उठतो. गरज पडल्यास रात्री कितीही वेळ मी जागू शकतो पण सकाळी उठण्यासाठी तितकंच सॉलिड आमिष असल्याशिवाय उठणं शक्यच नाही. लहान असताना सुद्धा घरचे परीक्षेचा अभ्यास करायला भल्या पहाटे उठवायचे पण पुस्तकातले काही दिसले असेल तर शप्पथ. एक वाक्य वाचता वाचता मन ब्रम्हांडाच्या चार फेऱ्या मारून यायचं पण पुस्तकातले ते एक वाक्य काही डोक्यात घुसायचे नाही. नशिबाने शाळा घराच्या जवळच होती. धावत जास्तीत जास्त २ मिनिटांत मी शाळेत पोहोचायचो. ७ ला शाळा भरून प्रार्थना वगैरे होऊन ७:३० ला सुरु व्हायची आणि मी ६:३५ ला उठून अंघोळ करून तयार होऊन चहा पिऊन ७ च्या जरा अगोदरच शाळेत पोचायचो.

कामानिमित्त बंगलोरला असताना एक रूम आम्ही तिघांनी मिळून शेअर केला होता. तिघंही एकाच ऑफिस मध्ये असल्यामुळे एकत्रच निघायचो. त्यामुळे आम्ही रोज पहिलं, दुसरं कोण उठणार याचे दिवसच ठरवून ठेवले होते. एखाद्याच्या पहिलं उठायच्या दिवशी सुट्टी आली तर तो लकी. मी व्यवस्थित उठून तयार व्हायचो पण हे दोघं #$#@ कधीच XX वर लाथा खाल्याशिवाय उठायचेच नाहीत. त्यांना रोज उठवून ते तयार होईपर्यंत मी पुन्हा झोपायचो :) शुक्रवारी रात्री ऑफिस नंतर सिनेमे बघून डीनर करून कमीत कमी ४०-५० किमी मोटरसायकल वर चढवल्यावर कधीतरी पहाटे ३-४ वाजता आम्ही झोपायचो. शनिवारी दुपारी १-२ च्या सुमारास कधीतरी पोटातल्या कावळ्यांनी चोची मारून उठवल्यावर उठायचो. सुखसागर मध्ये जाऊन मस्त पैकी एक थाळी आणि एक लस्सी मारून परत यायचो. दुवायचे कपडे सर्फ एक्सेल मध्ये गरम पाण्यात बुडवायचो आणि पुन्हा तंगड्या वर करून ताणून द्यायचो ते पुन्हा सात आठ वाजल्याशिवाय उठायचो नाही. मग भिजत टाकलेले कपडे साफ पाण्यातून खंगाळून काढून सुकत टाकायचे आणि पुन्हा रात्रीचे भटकायला मोकळे. रविवारी शक्यतोवर दुपारी न झोपण्याचा प्रयत्न करायचो, पण डोळे हे जुलमी गडे, ते ऐकायचेच नाहीत.

अमेरिकेत आल्यावर सुद्धा शक्यतोवर मी झोपायचा प्रयत्न करतो परंतू लग्नानंतर वाढलेल्या प्रापंचिक जबाबदारीमुळे वाटेल तेवढे झोपता येत नाही. त्याचा साइड इफेक्ट म्हणून ६ वर्षानंतर सुद्धा माझा जेटलॅग कायम आहे. दुपारी असली झोप येते म्हणून सांगू. पण पापी पेट का सवाल असल्यामुळे जुलमी डोळ्यांच्या पापण्यांना एकमेकांना भेटू न देण्याची कसरत करावी लागते. या झोपेचा अजून एक पैलू म्हणजे झोपल्यावर पडणारी स्वप्नं. सुरुवातीची काही वर्ष माझ्या मेलच्या सिग्नेचर Your future depends on your dream वा झोप आहे तर होप आहे अशा असायच्या:) मागे कुणाचा तरी झोपेवराचा लेख वाचत होतो. त्यात लेखिकेच्या भावाला त्याचे वडील उठवत होते तर तो पठ्ठ्या वडीलांना म्हणतो कसा, " बाबा अजून पाचच मिनिटं, स्वप्न पडतंय.." :) तर अशी स्वप्न मला रोज रात्री न चुकता पडतात आणि शेंडा ना बुडखा असलेल्या या स्वप्नांचा सिनेमा मी मस्त एन्जॉय करतो. ४-५ दिवसांपूर्वीच मला एक सॉलिड स्वप्न पडलं होतं. भगतसिंग, सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, अण्णा हजारे आणि मी एकाच तुरुंगात आहोत. तुरुंगात गप्पागोष्टी करताना भगतसिंग त्यांची hat तर सुभाष बाबू त्यांचा चष्मा मला भेट म्हणून देतात आणि या दोन्ही गोष्टी मी ebay वर विकतो :)

काही वर्षापूर्वी मला सगळी स्वप्नं जशीच्या तशी लक्षात राहत. अगदी मध्येच डोळे उघडले आणि मी ते पुन्हा मिटले तर तेच स्वप्न पुढे कंटिन्यू पण होई. पण आजकाल (बहुतेक वय वाढत चालल्याने) ती लक्षात राहत नाहीत. पण तरीही माझा जोपायाचा उत्साह काही कमी झालेला नाही. आता ४ दिवसांचा thanksgiving चा विकेंड आहे. चार दिवसांपैकी कमीत कमी ३ दिवस झोपायचा बेत आहे. बघुया कितपत शक्य होतंय ते :)

Tuesday, May 10, 2011

जय बजरंगा हुप्पा हुय्या !!!!

"काय रे तुका आव्स बापूस खाव्क घालित नाय काय"

"ह्येची हाडाची काडा नी **चा तुनतुना"

"अर्रे बाबा, जास्त धावूबिवू नुको, वाऱ्यान उडान जाशी..."


घरी येणाऱ्या अतिथी देवोभवांकडून अशी अनेक मुक्ताफळे ऐकल्यावर आपण लाईट्वेट चॅम्पियन असल्याबद्दल स्व:ताचा खूप राग येई. भरपूर पेट्रोल पिऊनही १५ च्या स्पीडने जाणाऱ्या गाडीसारखी आमची बॉडी. कितीही खा पण अंगावर चरबी चढायची नाही म्हणजे नाही. व्यायामाच्या नावाने आनंदच होता. एक तर आमच्या खानदानाची हाताच्या बोटावर मोजण्याइतकी संपत्ती असल्यामुळे जिम परवडायची नाही आणि दुसरं म्हणजे पायावर डंबल पडला तर काय घ्या त्यामुळे जिमच्या वाट्याला गेलोच नाही. नाही म्हणायला उन्हाळ्याच्या सुट्टीत लवकर उठून जॉगिंगला जाणं हा व्यायाम दरवर्षी व्हायचा. पण कडका असलो तरी कोणी माझ्याशी मारामारी करायच्या भानगडीत पडायचा नाही. समोरचा माझ्यापेक्षा चारपटींनी असला तरी मी त्याला बुकलून काढायचो. कडका आहे पण काय सॉल्लिड मारामारी करतो असं जेव्हा मित्र म्हणायचे तेव्हाच काय ते अंगावर मूठभर मांस चढायचं.

कोणी सांगितलं कि कराटे केले की समोरच्याला मारता पण येतं आणि ऑटोमॅटिकली बॉडी पण बनते. शाळेत कराटे स्वस्त दरात शिकवायचे म्हणून कराटे मध्ये नाव घालायचं ठरवलं तर आमच्या मातोश्रीनी "कराटे करशी नी आमकाच तंगडी घालून पाडशी" म्हणून परवानगी नाकारली. शेवटी हो ना करता एकदा कराटेला जायची परवानगी मिळाली. २ वर्षे हू हा करून अर्ध्या फूटाने उंची, ५-६ किलोमीटर पळण्याचा स्टॅमिना आणि एक नारंगी पट्टा एवढी कमाई केली पण अंगावरची चरबी जैसे थे. कराटे डोक्यात जायला लागले होते. शेवटी १० वीचं वर्ष म्हणून कराटे बंद करण्यात आले.

दहावीच वर्ष बाकीच्या १०वीच्या विद्यार्थ्यांचं जितक्या रोमॅण्टिकली जातं तितकच आमचही गेलं. नंतर महाविद्यालयात गेलो तर तिथे आमचा काटकपणा आमच्याच डोळ्यात खुपायला लागला. महाविद्यालयात जिमखाना होता. ४ टी टी टेबल्स, ८-९ कॅरम आणि १०-१० पौंडाचे दोन डंबल असं त्या जिमखान्याचं रूपडं होतं. कॅरम किंवा टी टी साठी वाट बघताना कधी त्या डंबेल्स्ना उचललं तेवढच. ते पण धड उचलता यायचे नाहीत. शेवटी ठरवलं कि आता जिम लावलीच पाहिजे. घराजवळची जिम महिन्याला ५० रूपये घेत होती. ते घरात परवडत नव्हतं. त्यामुळे चालत ४५ मिनिटे दूर असलेल्या आणि महिना १५ रुपये घेणाऱ्या जिममध्ये नाव नोंदवणी करण्यात आली. माझ्यासारखी अजून ५ टाळकी तयार झाली. सकाळी पाच वाजता उठून ४५ मिनीटं एकमेकांशी गप्पा मारत (आणि शिव्या देत) जिमला जायचं, सहा ते सात असा एक तास व्यायाम करायचा असा प्लॅन ठरला. पण एक गोची होती. जिमच्या बाजूला एक महाविद्यालय होतं. सकाळची बॅच सातची असायची, त्यामुळे साडे सहा पासून महाविद्यालयीन कन्यांचे झुंडच्या झंड जिमच्या बाजूच्या रस्त्याने जायचे. या अर्ध्या तासात जिममधील सगळी उपकरणं वापरण्यासाठी उपलब्ध असत कारण सगळे पैलवान तेवढ्या वेळात जिमच्या बाहेर असलेल्या पुल अप रॉडवर तरी असायचे नाही तर उगाच स्ट्रेचिंग करत उभे राहायचे. आम्हीही त्याला अपवाद कसे असणार :) तरी आपलं एक तास नाही तर अर्धा तास व्यायाम व्हायचा. चार पाच दिवस व्यायाम करून आल्यावर अंगावर किती मांस चढलय ते उगाच आरशासमोर बघत राहायचो. महिना व्यवस्थित गेला. मग हळूहळू सहा टाळक्यांची पाच, पाचाची चार, चाराचे तीन झाले. दिड महिन्यानंतर पहाटे पाचला झापडं उघडेनाशी झाली. त्यात पावसाळा सुरू झाला आणि झापडांना न उघडण्यासाठी सबळ कारण मिळालं. शेवटी उरलेली ३ टाळकीही घरी झोपा काढू लागली. हाडाची काडं तशीच राहिली आणि वरून घरातून जिमवर घातलेले पैसे फुकट घालवले म्हणून पावलो पावली उद्धार होत राहिला तो वेगळाच.

त्यानंतर पुढची चार वर्षे जिमचं तोंडदेखील पाहिलं नाही. कॉलेज संपताच बंगलोरला (हो बंगलोरच, मी गेलो तेव्हा ते बेंगलूरू झालं नव्हतं) नोकरी मिळाली. तिथे इतर लोकांच्या मानाने मी १२ वीतला मुलगाच वाटायचो. माझा एक रूममेट जिमला जायचा. शेवटी त्याच्याबरोबर जायला लागलो. अगदी इन्स्ट्रक्टर सुद्धा लावला. त्याने सांगितलं कि भात आणि डाळ भरपूर खा. त्याला बिचाऱ्याला माहित नव्हतं की मी जितका डाळ भात दिवसाला खायचो बहुधा त्याच कुटूंब तेवढा आठवड्याला खात नसेल. त्याला माझ्या खाण्याबद्दल सांगितलं तेव्हा फक्त त्याचे डोळे पांढरे व्हायचे बाकी होते. त्यानंतर प्रोजेक्ट प्रेशरच्या नावाखाली ती जिमदेखील कधी बंद झाली ते कळलं नाही.

शेवटी ते जिमचं भूत मी माझ्या मानगुटीवरून काढून टाकलं. आपल्याला बॉडी बनवून कुठे मारामारी करायला जायचं नाहीय हे स्व:ताला समजावलं. बॉडी बिल्डींगपेक्षा फिटनेस महत्वाचा आहे हे मनाला पटवलं. आज रोज बऱ्यापैकी अंतर चालणं, लिफ्ट न घेता जिन्याने चढणं, बऱ्याच लॉंग डिस्टन्स मोटर सायकल राईड्स करणं, अधून मधून क्रिकेट खेळणं असं करून मी आजपर्यंत माझा फिटनेस टिकवून आहे, पण अंगावर मांस कधी चढलं नाही ते नाहीच.

Sunday, February 13, 2011

आगीचा धबधबा!!!!


नुकतच पाहिलं की माझी गेली २-३ पोस्ट्स मोटरसायकलिंग वरच आधारित होती. थोडासा चेंज म्हणून हे पोस्ट मोटरसायकलिंग वर नाहीय (पण भटकंतीवरच आहे :)). योसेमिटे नॅशनल पार्क मध्ये होर्स टेल नावाचा अगदी दुर्बीण घेऊन बघावा लागणारा एक धबधबा आहे. फक्त उंचीवरून खाली कोसळतो म्हणून त्याला धबधबा म्हणायचं इतकाच. नाहीतर त्यातले पाण्याचे प्रमाण पुरुष वर्गाने मारलेल्या धारे इतपतच असते. वर्षातले जवळपास ३५५ दिवस या धबधब्याला कोणीही भाव देत नाही. कोणी त्याचे फोटोही काढत नसेल या ३५५ दिवसात. पण फेब्रुवारी मधल्या ८-१० दिवसात मात्र योसेमिटे मधल्या इतर कोणत्याही धबधब्याकडे फोटोग्राफर्स चे इतके लक्ष जात नाही. हे ८-१० दिवस या धबधब्याच्या आसपासच्या पार्किंगस्पॉट वर सूर्यास्ताच्या वेळी एकाही जागा मिळत नाही. याचे कारण म्हणजे या ८-१० दिवसात सूर्यास्ताच्यावेळी असलेला सूर्याचा कोन. त्या कोनामुळे सूर्यास्ताच्या वेळी जवळपास १५-२० मिनिटे ह्या धबधब्यातून अक्षरश आग कोसळते.


गेली २-३ वर्षे मला ही गोष्ट अनुभवायची होती, पण नेमके दिवस कळत नव्हते. शेवटी २०११ मध्ये तो योग आला. सूर्याचा हा कोन १० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत राहणार होता. याबद्दल माहिती मला ११ फेब्रुवारीला मिळाली. १९ फेब्रुवारीला विश्व चषक सुरु होत होता आणि त्याच दिवशी हिमवृष्टी आणि पाउस होणार होता. त्यामुळे १२/१३ फेब्रुवारीलाच जाणं भाग होतं. एकतर्फी अंतर फक्त ३.५ तास असूनही बायको मला एकट्याला पाठवायला तयार नव्हती. तिला भरपूर काम असल्यामुळे ती देखील येऊ शकत नव्हती. दुसरं कारण म्हणजे जो फिनोमिना फक्त १५-२० मिनिटे चालणार त्यासाठी ७ तास गाडीत बसायची तिची तयारी नव्हती :) शेवटी माझा एक मित्र पियुष यायला तयार झाला. त्याची कार manual transmission वाली होती आणि तो ती मला चालवायला द्यायला तयार झाला. मी अमेरिकेत आत्तापर्यंत एकदाही manual transmission वाली कार चालवली नव्हती त्यामुळे मी ती चालवायला उतावळा झालो होतो. योसेमिटेचे जवळपास सर्व कोनांतून फोटो काढून झाल्यामुळे आम्ही फक्त हा फिनोमिना कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी मस्तपैकी लंच करून निघायचं ठरवलं .

३.५ तास manual transmission वाली कार चालवण्याचा मस्त अनुभव घेत आम्ही योसेमिटेला पोहोचलो. पण आमच्या नशिबात पार्किंग नव्हती. सूर्यास्त जवळ येत चालला होता आणि पार्किंग मध्ये वेळ दवडायाचा नव्हता. शेवटी तिथेच रस्त्याच्या कडेला मी कार दाबून लावली. आमच्यासारख्या अनेकांनी तशीच पार्क केली होती. पियुषला सांगितलं कि पार्किंग तिकीट आलं तर मी भरेन म्हणून. कॅमेऱ्याचा लवाजमा घेऊन निघालो आणि पाहतो तर काय मोक्याच्या जागांवर गुढघाभर बर्फ साचला होता. तशाच बर्फात चालत त्यातल्या त्यात एका बर्फ नसलेल्या एका मोक्याच्या जागी आम्ही दोघांनी आमच्या ट्रायपॉडचा संसार थाटला आणि त्या १५-२० मिनिटांच्या काळात आम्ही त्या आगीच्या धबधब्याचे शेकड्याने फोटोज काढले. आमच्या नशीबाने आकाश पूर्णत: निरभ्र होते. जनरली या ८-१० दिवसात एक तर बर्फ तरी पडत असतो नाहीतर आकाशात ढग तर असतात. त्यामुळे फार थोडे छायाचित्रकार याचे फोटो काढू शकतात. त्या फार थोड्या छायाचित्रकारांमध्ये आता प्रवीण आणि पियुषचं नावसुद्धा आता जोडलं गेलंय :)

Wednesday, February 9, 2011

मुसाफिर हूँ यारों

बरेच महिने ब्लॉग विश्वापासून फरारी असल्याबद्दल क्षमस्व. मॅक वर मराठी टायपिंगचे लोचे, घराच्या छतावर उभे राहिलं तरी गळ्यापर्यंत येणारं काम अशी अनेक कारणं देता येतील, पण कधी कधी वेळ असूनही काही न लिहिण्यामागे आळशीपणा हेच एकमेव कारण आहे :( माझा हा लेख मायबोलीच्या २०१० हितगुज दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता. २०११ मध्ये कमीत कमी एक तरी लेख असावा म्हणून इकडेही पेस्टतो आहे. :)

********************************************************************************************************************************

ऑगस्ट महिन्यात अजून एक ट्रीप झाली नाही तर नॅशनल पार्क चा पास एक्स्पायर होतोय आणि ८० डॉलर वसूल होत नाहीयत, उन्हाळा संपत आला तरी कुठेच भटकंती झाली नाहीय, मोटरसायकल पार्किंग मध्ये धूळ खातेय, ऑफिस/घर/ऑफिस करून करून गाढवाचं जीणं नशीबी येतय, .... एवढी कारणं माझ्यातला भटका भगत जागवायला पुरेशी होती. बुधवारी रात्री निर्णय घेतला की येत्या विकांताला योसेमिटे-मोनो लेक ला मोटरसायकल दामटायची. कोणी कंपनी द्यायला येतय का म्हणून विचारायला चार बाईकर्स आणि १५-२० कारवाल्या मित्रांना मेल केला. अर्थात इतक्या शॉर्ट नोटीसवर कोणीही यायला तयार झाले नाही. पण आपला विचार एकदा झाला कि झाला. शेवटी एकट्यानेच जायचं ठरवलं. होम मिनिस्टरांची इतक्या लांब मोटरसायकल वर बसण्याची शक्यता अजिबात नव्हती. शेवटी होम मिनिस्टरांकडून हो ना करत मला एकट्याला जाण्याची परवानगी पदरात पाडण्यात मी यशस्वी झालो.

मोटरसायकलवर रपेट करायची तर सुरक्षितता सर्वात महत्वाची. भारतात असताना मोटरसायकलवर अगदी ब्रेड आणायचा झाला तरी मी हेलमेट वापरत असे. हेलमेट हवं की नको हे वाद फक्त भारतातच नाही तर अगदी अमेरिकेतही होतात, पण म्हणतात ना सर सलामत तो राईड पचास. त्यातल्या त्यात भारतात मोटरसायकलचा वेग आणि वजन पाहता हेलमेट आणि थोडं जाड जॅकेट असले कि चालून जातं पण इकडे मात्र हेल्मेट सोबत राईडीन्ग जॅकेट , पॅंट, बूट आणि ग्लोव्ज वापरलेलं चांगलं असतं. ३०० किलो च्या मोटारसायकलवरून १२० kmph च्या वेगाने पडलो तर जगायला एवढं सगळं लागणारच ना :) त्याचबरोबर मोटरसायकल चालवायला सुरक्षित आहे की नाही हे देखील वेळोवेळी पाहणं योग्य असतं. टायर थ्रेड चेक करणे, तेल हवा पाणी योग्य आहे की नाही ते पाहणे, लादलेले सर्व सामान व्यवस्थित लादले गेलेय कि नाही ते पाहणे, कुठून खड खड आवाज येत असेल तर त्याचा योग्य तो बंदोबस्त करणे इतक्या गोष्टी तर नेहमीच केल्या गेल्या पाहिजेत. कार च्या तुलनेत मोटरसायकल ट्रिपसाठी जरा जास्त काळजी घ्यावी लागते पण एकदा का मोटरसायकल रपेटीचं व्यसन जडलं की ते मग उतरताना कठीण असतं. या सर्व गोष्टी आदल्या रात्रीच करून झाल्या होत्या. सकाळी बेसिक चेक करून लगेच निघायचा बेत होता. पण एरवी चटकन संपणारा शुक्रवार आज रेंगाळत होता. सगळी पॅकिंग संपवूनही बराच वेळ शिल्ल्क होता. लवकर उठायचं म्हणून लवकर झोपायला गेलो तर झोपही येत नव्ह्ती. अखेरीस रात्रभर ५० वेळा घड्याळ पाहून झाल्यावर एकदाची शनिवारची पहाट उजाडली. पावणे सातला मोटरसायकलला कॅमेरा बॅग, सॅडल बॅग, टॅंक बॅग आणि ट्रायपॉड बांधून मी तयार झालो. ६५ मैल/तास(१०५ kmph) च्या वर मोटरसायकल न्यायची नाही, सांभाळून जायचं, झोप आली तर मोटरसायकल बाजूला लावून तोंड धुवायचं अशा १००० सुचना ऐकता ऐकता ७ वाजले आणि एकदाचा मी मार्गाला लागलो. जीपीएस योसेमिटे ३.५ तासाच्या अंतरावर दाखवत होता, एखाद-दूसरा फोटो ब्रेक आणि फ्युएल ब्रेक घेऊन माझ्या अंदाजाप्रमाणे साधारण ११-११:३० पर्यंत पोहोचायला काही हरकत नव्हती. पहाटे हवेत गारठा होता. मूठी ग्लोव्ह्ज असूनही गारठत होत्या पण त्या गारठ्यामुळे निसर्गाच्या एकदम कुशीत शिरल्यासारखं वाटत होतं. मला वाटतं असला अनुभव घेण्यासाठी बाईकच हवी, कार नामक पिंजऱ्यात तो कधीच मिळणं शक्य नाही. शहरातल्या गर्दीत मोटरसायकल चालवणे आणि शहराबाहेरच्या मोकळ्या निसर्गात मोटरसायकल चालवणे यात अल्ताफ राजाचं गाणं ऐकणे आणि रफी साहेबांच गाणं ऐकण्यातला जो फरक आहे तो आहे. ज्यांनी मोटरसायकल वर अजून शहराबाहेर एकाही रपेट केली नाहीय त्यांनी शहराबाहेर एखाद्या विकांताला ३-४ तासांची एक रपेट करून बघा. पुण्याचे लोकं महाबळेश्वरला जाऊ शकतात आणि मुंबईचे लोक लोणावळा खंडाळा वा माथेरान करू शकतात. कोकणातले रस्ते तर एकदम मस्तच आहेत, ख़ास करून NH17 पण हो, safety first बरं का :)

२ तासांनी योसेमिटेचा घाट सुरू व्ह्याय्चा आत एक ब्रेक घेतला. गुड डे बिस्कीटे खाऊन येण्या जाणाऱ्या मोटरसायकल वाल्यांना हात दाखवत त्यांना गुड डे विश करत होतो :)फक्त ४५ मैल अंतर बाकी राहिले होते. पण आता उरलेले अंतर घाटात होते. जस जसा वर चढत होतो तस तसे दरीचे रूप मोहक होत होते. प्रत्येक हेअर पिन बेंडला उभं राहून फोटो काढावासा वाटत होता. दरीत फॉल कलर्स ऑगस्ट मध्येच यायला सुरुवात झाली होती, पहा तुम्हाला दिसतायत का ते.योसेमिटे हा पार्क जवळपास १२०० चौ.मैलांवर पसरलेला आहे. नयनरम्य धबधबे, श्वास रोखून धरायला लावणारी सिनरी, जंगली जनावरं आणि रोज भेट देणारी माझ्यासारखी असंख्य टाळकी यासाठी प्रसिद्ध आहे. हायकिंगची मजा लुटण्यासाठी फार चांगले ठिकाण आहे. मर्क रिव्हर व्हाईट वॉटर राफ्टींगसाठी प्रसिद्ध आहे. पाचव्या स्तरापर्यंत तेथे राफ्टींग करता येते.

११:१५ च्या सुमाराला योसेमिटेच्या गेटवर पोहोचलो. तिथे वाहनांची भली मोठी रांग लागली होती. माझा नंबर येईपर्यंत १५-२० मिनिटे गेली. माझ्याकडे पास आहे असं सांगितल्यावर तो न पाहताच मला आत सोडण्यात आलं. आत गेल्यावर पावला पावलावर फोटो काढावेसे वाटत होते. मोटरसायकल असल्यामुळे पार्किंगचा जास्त प्रॉब्लेम नव्हता. योसेमिटेत काढलेले हे थोडे फार फोटो. त्या रिफ्लेक्श्न लेकचा एक फोटो काढल्यावर कुणीतरी उपद्व्यापी कार्ट्याने त्या पाण्यात एक दगड मारला, त्याच्यापाठोपाठ त्याच्या बापाने एक मारला. मला त्या दोघांनाही मारून पाण्यात फेकावेसे वाटत होते पण इंग्रजीतला एक चार अक्षरी शब्द उच्चारण्यापलीकडे काहीच करता आलं नाही.


दिवसभर साफ असणारे आकाश आता भरून यायला लागले होते. मग मी ते पाणी स्थिर होण्याची वाट न पाहता तिथून काढता पाय घेतला. मला सूर्यास्तापूर्वी मोनो लेकला पोचायचे होते. आकाश आता पूर्ण अंधारून आले होते. वाटेत टेनाया लेकच्या इथे हे विलोभनीय दृश्य दिसले आणि थांबलो.एका छोट्याश्या सरीनंतर आता आकाशातील मळभ सरू लागलं होतं, पण कॅलिफोर्नियातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या टिओगा पासच्या घाटात अत्यंत वेडीवाकडी हवा वाहत होती. ६५० पौंडाच्या मोटरसायकलीला त्याच्यावरच्या १५० पौंडाच्या स्वारासहीत दरीत ढकलायला बघत होती. त्या घाटात दरीच्या दिशेला संरक्षक कठडेही नव्हते.उन्हाळा संपायला आला तरी जागोजाग बर्फाच्छादित टेकड्या दिसत होत्या. थांबून फोटो काढावेशे वाटत होते, पण न जाणो ह्या हवेने १५० पोंडाच्या मला दरीत भिरकावले तर या भीतीपायी मी न थांबता चालत राहिलो. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास मोटेल मध्ये चेक इन केले. जाऊन पाहतो तर काय, रूम मध्ये फक्त बेसिन आणि बेड होता. फोनवर बुक करताना त्यांनी मला बेसिन आणि बाथरूम शेपरेट असतील म्हणून सांगितलं होतं. मला वाटलं की एकाच रूम मध्ये बेसिन बाथरूमच्या बाहेर असेल, पण ते एवढे शेपरेट असतील असं वाटलं नव्ह्तं :) सुर्यास्ताला अजून अवकाश होता. एक कॉफी मारून जरा ताजातवाना झालो. साऊथ टुफा तिथून ७ मैलांवर होती. म्हटलं लवकर जाऊन थोडी मोक्याची जागा पटकवावी. जाऊन पाहतो तर मोक्याच्या जागा अगोदरच पटकवल्या गेल्या होत्या. त्यातल्या त्यात एका बऱ्या जागेवर मी माझ्या ट्रायपॉडचा संसार मांडला. थोडेफार प्री-सनसेट फोटो काढून झाल्यावर सूर्यास्ताची वाट पाहू लागलो. पण नशीबात बहुते सूर्यास्ताचे रंग नव्हते. तासाभरापूर्वी निरभ्र असणारी पश्चिम दिशा अचानक ढगांनी भरून गेली. सूर्यास्त नशीबी नाही म्हटल्यावर सगळे फोटोग्राफर काढता पाय घेऊ लागले. काही वेळापूर्वी असणारी शेकडा माणसे निघून गेली आणि हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच टाळकी तिथे शिल्लक राहिली. निसर्गाला बहुतेक उरलेल्यांची दया आली असावी, त्यामुळे सूर्यास्ताचे नारिंगी केशरी नसले तरी आसमंत एका गूढ निळ्या रंगाने त्याने भरून टाकला.अंधार पडल्यावर मी परत निघालो, वाटेत एक नेव्ही बीच १ मैल दर्शवणारी पाटी दिसली. म्हटलं एवढं आलोय तर अजून एक मैल जाऊन येऊ आणि वळवली मोटरसायकल तिकडे. मोठ्ठी चूक. तो रस्ता एकतर निर्मनुष्य होता आणि कच्चा होता. शेवटी होऊ नये ते झालं. माझ्या बाईकचं मागील चाक मातीत रुतून बसलं.


ते ३०० किलोचं धूड माझ्या एकट्याने हलणं तर शक्यच नव्हतं. इमर्जन्सी सर्विस वाले म्हणाले की आम्ही नाय बा कच्च्या रस्त्यावर येत. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं आणि रात्रीचे ९ वाजले होते. मला दूरवर एक दिवा लुकलुकताना दिसला. जाऊन पाहतो तर एका आर.व्ही मध्ये एक गोरे कपल व्हेकेशन वर आलं होतं. त्यांना मोटरसायकल हलवण्याबाबत विनंती केली. नशीबाने ते तयार झाले. त्यांच्या मदतीने कशी तरी ती मोटरसायकल बाहेर काढली आणि नशीबाने त्याच्या नंतर मुख्य रस्त्यावर येईपर्यंत ती कुठे अडकली नाही.

मोटेलवर परत आलो तेव्हा दिवसभरात २८१ मैल रपेट करून झाली होती. त्या छोट्याश्या गावात रात्री मी पोहोचेपर्यंत खायचे सगळे पर्याय बंद झाले होते, पण बराच थकल्यामुळे भुकेल्या पोटीही मस्त झोप लागली.

रात्रीच्या प्रकारामुळे होम मिनिस्टरांकडून रविवारी सकाळी उजाडलं की गपगुमान घरी यायचं अशी सक्त ताकीद मिळाली होती. पण घरच्या वाटेत बोडीचं स्टेट पार्क आहे म्हटल्यावर माझ्यातला फोटोग्राफर चाळवला. म्हटलं फक्त बोडीसाठी पुन्हा एक ट्रिप होईल की नाही कोणास ठाऊक. बोडी हे कॅलिफोर्नियाच्या गोल्ड रश साठी उभारलेलं आणि एकेकाळी १०००० लोकसंख्या असणारं एक छोटसं गाव. पण त्या गावात गोल्ड रश मुळे रोजच एक दोन मुडदे पडायला लागले. अस होता होता साधारण ५०-६० वर्षापूर्वी तिथला शेवटचा माणूस सोडून गेल्यावर ज्या स्थितीत गाव आहे त्याच स्थितीत त्याचं जतन करण्यात आलं. फोटोग्राफर्स पॅराडाईस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागांपैकी ही एक जागा आहे. होम मिनिस्टरच्या धमकीमुळे तिथे केवळ एक तास घालवून मी परतलो. ही त्या भुताटकीने झपाटल्यासारखी दिसणाऱ्या गावाची काही चित्रे.


परतताना सोनोरा पास नावाच्या घाटातून गेलो. हा माझ्या आत्तापर्यंतच्या रपेटीतला सर्वात सुंदर मार्ग होता, पण घरी लवकर पोहोचायचं असल्यामुळे मी तिथे थांबलो नाही. तेवढंच पुन्हा राईड करण्यासाठी निमित्त :) ६ तासांच्या राईडनंतर आणि ५६२ मैलांच्या रपेटीनंतर जेव्हा संध्याकाळी घरी पोहोचलो तेव्हा शरीर थकलं होतं, होम मिनिस्टर रागावले होते पण मन मात्र एकदम ताजंतवानं झालं होतं...