Friday, November 20, 2009

अल्केमिस्ट्री

राजू परूळेकर याने सचिनबद्दल लिहिलेल्या अल्केमिस्ट्री मधील सचिनचा उल्लेख मला योग्य वाटला नाही, त्याबद्दल त्याला मी एक इ-पत्र लिहिले. तेच इ-पत्र जसेच्या तसे.


राजू परुळेकर यास,

तुझी सचिन बद्दलची अल्केमिस्ट्री वाचली. माझ्या छोट्या मेंदूला तुला त्यात नक्की काय म्हणायचय ते झेपलं नाही. मला समजलेलं थोडक्यात सांगतो, १. तुला सचिनबद्दल कसल्याही भावना (आदर, प्रेम, तिरस्कार वगैरे) नाहीत. २ सचिनने कितीही धावा केल्यात तरी भारताचे महत्वाचे प्रश्न ( उदा. शेतकरी आत्म्हत्या) सुटणार नाहीत. ३. हिम्मतरावांसारखे लोक जे मानवजमाती साठी उपयुक्त काम करतात त्याबद्द्ल लोकांना माहितीही नसते. ४. मराठीतल्या अनेक प्रतिष्ठित लोकांनी त्याच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीबद्दल भरभरून लिहिलं आहे ते दुसरं तिसरं काही नसून वैचारिक दिवाळखोरी आहे. ५. सचिनने केलेलं मुंबई सर्वांची हे विधान त्याच्याकडून केलं जायला नको होतं.

सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला आणि पाचवा मुद्दा वगळता बाकिच्या साऱ्या मुद्द्यांसाठी सचिनला या लेखात आणण्याची खरचं काही गरज नव्ह्ती. पहिला मुद्दा तुझा तुझ्यापाशी राहिला असता तरी चाललं असतं (जसं तुझ्या मते प्रतिष्ठित लोकांनी सचिनच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीबद्दल जे भरभरून लिहिलं ते नाही लिहिलं तरी चाललं असतं). पाचव्या मुद्द्याबद्दल मी शेवटी बोलतो.

मला कळत नाही की सचिनचा क्रिकेट खेळण्याचा आणि महाराष्ट्रातील समस्यांचा संबंधच काय? त्यातल्या त्यात तुमच्या पत्रकारितेचा आणि महाराष्ट्रातील समस्यांचा थोडाफार तरी संबंध आहे, म्हणून तू तुझ्या दोन वेळच्या जेवणाऐवजी एकच वेळ जेवण घेऊन एक वेळचे जेवण उपाशीपोटी लोकांसाठी दान करतोस असे काही ऐकिवात नाही (खरंच करत असशील तर गोष्ट वेगळी). या मुद्यासाठी सचिनला लेखात गोवणं नक्कीच योग्य नव्हे.

दुसरा मुद्दा हिम्मत राव आणि इस्रो चे संशोधक यांच्याबद्दल सामान्यांना जास्त माहिती नसते. आमटे, बंग यासारखे लोकांच्या कारकिर्दी माध्यमांनी सेलिब्रेट केल्या नाहीत. यात सचिनची काही चूक आहे असं मला वाटत नाही. बरं हा ही मुद्दा सचिनला न आणता मांडता आला असता. जे विकतं ते पिकतं हा नियम तुझ्यासारख्या पत्रकाराला नक्कीच माहित असेल. म्हणूनच तर तू हे मुद्दे मांडायला सचिन सोडून इतर कोणालाही घेतलं नाहीस असं माझं प्रामाणिक मत आहे. हे मुद्दे बॉलिवूडच्या कोणत्याही अभिनेत्याला घेऊनही तू मांडू शकला असतास. एका गोष्टीची नोंद घ्यावी, तू उल्लेख केलेल्या अनसंग हिरोंबद्दल मलाही अतीव आदर आहे.

सचिन च्या २० वर्षाच्या कारकिर्दीबद्दल अनेक प्रतिष्ठीत लोकांनी त्याच्या बद्दलच्या आठवणी सांगितल्या ज्या तुझ्या मते वैचारिक दिवाळखोऱ्या आहेत (का ते समजले नाही). आमटे वा तत्सम लोकांवर लिहून आलेल्या लेखांना, त्यांच्याविषयीच्या आठवणींना कुणी वैचारिक दिवाळखोरी म्हणत नाही, कारण ते त्यांच्या क्षेत्रात सर्वोत्तम आहेत. त्याच प्रमाणे सचिन त्याच्या क्षेत्रात सर्वोत्तम आहे. त्यामुळे त्याच्या बद्दलच्या मतांना वैचारिक दिवाळखोरी म्हणण्याचं वास्तविक पाहता काहीच कारण नाहीय. बरं तू क्रिकेटचा पंडीत असतास आणि मग सचिनबद्दलच्या लेखांचा असा उल्लेख असतास तरी गोष्ट वेगळी होती, पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे क्रिकेट मध्ये तुला रस नाही. त्यामुळे हे लेख कदाचित तुला दिवाळखोरी वाटले असतील. त्यामुळे मला नाही वाटत कि सचिनचा उल्लेख इथेही फिट बसतो.दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे टी.व्ही. वरील एखादा कार्यक्रम पाहायचा नसेल तर रिमोटने चॅनेल बदलता येतं त्याचप्रमाणे एखादी बातमी वाचायची नसली तर सोडून देता येते की? पण तू त्या सर्व आठवणी (उर्फ तुझ्या मते वैचारिक दिवाळखोऱ्या) वाचल्यास. सोडून का दिल्या नाहीस? बरं तुझ्या मते सचिनच्या बद्दल जे लिहून आलंय त्यामुळे मानवजातीला कोणतही वरदान प्राप्त झालं नाहीय. अगदी खरी गोष्ट, पण त्याने काही वरदान प्राप्त व्हावे अशी कोणाची अपेक्षाही नाही. पुढच्या वर्षी तुझ्या कारकिर्दीला वीस वर्षे पूर्ण होतायत. माझ्यामते तू पत्रकार असल्याने कुठेतरी ते लिहून येईल (अर्थात सचिन च्या बद्दल लिहून आलंय तितकं नाही), त्यामुळेही मानवजातीला काही वरदान प्राप्त होईल असं काही वाटत नाही. मानवजातीला वरदान प्राप्त करून देण्याची क्षेत्रे वेगळी आहेत. उदा. अवकाश संशोधन, भारताने ३८४ करोड खर्चून चंद्रावर पाणी असण्याच्या (फक्त) संभावनेचा शोध लावला. त्याचाही बराच बोलबाला झाला, पण त्याने मानवजातीला काय मिळालं? पुढेमागे चंद्रावरून एखादी पाईपलाईन टाकून ते पाणी इथे आणूही कदाचित, पण आजच्या घडीला तरी ते संशोधन काही फायद्याचं नाही. त्याबद्दल लिहून जर का तू मानवजातीला कोणतं वरदान प्राप्त झाला हा प्रश्न विचारला असतास तर ते समजण्यासारखं होतं. जर का सचिनबद्दल मिडियामध्ये लिहिण्या-बोलण्याने मानवजातीला कोणतेही वरदान प्राप्त होत नसेल तर बहुतेक तुझ्या मताप्रमाणे कोणत्याही ’सिंथेटिक’ गोष्टींना कोणत्याही प्रकारच्या मिडियामध्ये स्थानच मिळायला नको कारण कोणत्याही सिंथेटिक(अनैसर्गिक) गोष्टीमुळे मानवजातीला कधीच वरदान मिळणार नाहीय. जरा विचार करून बघ कि असं करणं कितपत शक्य आहे ते.

तुझ्या लेखातले इतर छोटे-मोठे मुद्देही वरील मुद्द्यांप्रमाणे सचिनला न आणता मांडता आले असते. राहता राहिला मी उल्लेखला पाचवा मुद्दा. सचिनने म्हटले कि मुंबई सर्वांची. ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. बरं त्याच्या स्टेटमेंट मध्ये चुकीचं काहीचं नाही, असलीच तर राष्ट्रीय एकता आहे. तुझ्या मताप्रमाणे त्याने क्रिकेटची खेळपटटी सोडून राजकीय खेळपटटीवर खेळायला नको होतं, त्यासाठी तू ते काय ते स्वादूपिंडाच्या ऑपरेशनचे उदाहरणही दिलंयस. अगदी बरोबर जेणू काम तेणू ठाय, बिजा करे गोता खायं, पण एक गोष्ट लक्षात घे, सचिनने स्वत: प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे स्टेटमेंट दिलेलं नाहीय. तुझ्यासारख्याचं कुणातरी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना हे उदगार आलेले आहेत. आता त्या पत्रकाराला एखाद्या खेळाडूला राजकारणासंबधी प्रश्न विचारायची काही गरज होती का? खेळाडूला खेळासंबंधीचे प्रश्न विचारावेत असा पत्रकारिकेत रूल नाहीय का? तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर पत्रकारिता सोडून तो पत्रकार ऑपरेशन करत होता. स्वादूपिंडाच्या ऑपरेशनची सुरुवात कुणी केली असेल तर ती त्या पत्रकाराने, सचिनने नव्हे.

तू सचिन आणि गांगुलीची देखील तुलना केली आहेस. गांगुली बंगाली पत्रकारांना धरून राहतो, तर सचिन नाही. कुणाचे पॉलिटिकल व्ह्यूज काय असावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही का? अन मला वाटतं की जोपर्यंत ते समाजाला कोणती हानी पोहोचवत नाहीत तो वर त्यांच्यावर टीका करणं योग्य नव्हे.

थोडक्यात तू तुझ्या लेखामध्ये सचिनचा उल्लेख न करता तुझे मुद्दे मांडले असतेस तर त्यांना मी आक्षेप घेतला नसता. माझा तुझ्या मुद्द्यांना अजूनही आक्षेप नाहीय, ते त्यांच्या जागी एकदम बरोबर आहेत. माझा आक्षेप आहे तो सचिनला विनाकारण या लेखात गोवण्याचा.

माझा तुझ्यावर वैयक्तिक आक्षेप नाहीय (लिहायची गरज नाहीय तरीही). तुझ्या लेखातला सचिनचा उल्लेख मला पटला नाही, म्हणून हा पत्रप्रपंच. वाटल्यास उत्तर दे, वाटल्यास नको देऊस.

प्रवीण

Saturday, November 14, 2009

सचिन रमेश तेंडुलकर

२० वर्षे एक असामान्य व्यक्तिमत्व पहिल्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून विसाव्या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत* एकच गोष्ट करत आलाय पण तरीसुद्धा आपल्याला जराही कंटाळा आला नाहीय किंबहुना हेच तो येती काही वर्षे करत राहो हिच मनोमन प्रार्थना करतोय यातच त्या व्यक्तिचं मोठेपण सामावलय. एव्हाना वरचा * म्हणजे Conditions Apply नसून नाबाद चिन्ह आहे अन मी कोणाबद्दल बोलतोय हे ही चाणाक्ष क्रिडाप्रेमींच्या लक्षात आलं असेल.

सचिन रमेश तेंडुलकर. बऱ्याच भारतीयांसाठी क्रिकेटमधील देव आणि इतरांसाठी नंबर वन बॅट्समन. वीस वर्षे सतत खेळून अन करोडो रुपये कमवूनही ज्याच्या डोक्यात हवा गेली नाही असा माणूस. वीस वर्षात ज्याच्या नावाला कुठला वाद नावालाही चिकटला नाही असा तुमचा आमचा सचिन. याबाबत मला इच्छा नसतानाही विनोदचं उदाहरण घ्यावं लागतय. आचरेकर सरांच्या मते विनोद गुणवत्तेत सचिनहून थोडा उजवा होता पण तो यश टिकवू शकला नाही. वीस वर्षे कोणत्याही विवादापासून दूर राहणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. असे खेळाडू एका हाताच्या बोटावर सोडण्याइतकेच सापडतील.

सचिन तंत्रशुद्ध फलंदाज आहे याबाबत वादच नाही, त्याच बरोबर आक्रमकही आहे. बचाव आणि आक्रमण यांचा सुरेख मिश्रण त्याच्या खेळात पाहायला मिळतं. त्याचे चाहते तर अगणित आहेत पण त्याचबरोबर तो स्वत:साठी खेळतो, दबावाखाली खेळत नाही, तो चांगला finisher नाही असे म्हणणे असणारे देखील अगणित आहेत. त्याचाच एके काळचा सहकारी संजय मांजरेकर यात आघाडीवर आहे.

या लेखाचा हेतू हा हे मुद्दे खोडून काढणं हा आहे. जी लोकं शतकाच्या जवळ आल्यावर एकेरी धावा घेऊन शतक पूर्ण करणे याला स्वार्थीपण म्हणतात त्यांना क्रिकेट कळत नाही असं माझं म्हणणं आहे. भारत सचिन वेगात खेळला तर जिंकला असता पण सचिनने स्वार्थीपणे हळू खेळून आपले शतक/अर्धशतक पूर्ण केलं अशी एकही मॅच दाखवा, दाखवणाऱ्याच्या ढेंगाखालून जायला तयार आहे मी. वीस वर्षांत ८५ हून अधिक स्ट्राईक रेट असलेला फलंदाज स्वार्थी कसा असेल (अन हा स्ट्राईक रेट तेव्हा पासून आहे जेव्हा ५० षटकांत २२०-२३० धावा पुरेशा असत. २५० धावा म्हणजे डोक्यावरून पाणी)

दुसरी गोष्ट म्हणजे तो चांगला finisher नाहीय, हा आरोप. तो ५-६ व्या क्रमांकाचा खेळाडू नाहीय. तो सलामीचा फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक फळीच्या ठराविक जबाबदाऱ्या असतात. ५-६ व्या क्रमांकाच्या खेळाडूवर फ़िनिशेर असण्याची जबाबदारी असते. बरं तो जेव्हा जेव्हा बाद झालाय तेव्हा तेव्हा विजय आवक्याबाहेर नव्हता अन विकेटही हातात होते (आठवा चेन्नई ची कसोटी, परवाची १७५ धावांची खेळी), पण इतर फलंदाजांनी नेहमीच कच खाल्लीय, पण हात धुऊन सगळे सचिनच्याच मागे पडतात.

तो दबावाखाली खेळत नाही या आरोपासाठी हा पुढील लेखाजोखा

सचिनने कमावलेल्या ५४ सामनावीर किताबांपैकी ३१ सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करताना मिळवली आहेत तर २३ पहिल्यांदा.

त्याव्यतिरिक्त भारत हरलेल्या सामन्यात सचिनची कामगिरी खालीलप्रमाणे

ऑस्ट्रेलियाविरुद्ध
हरलेल्या ४१ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ९ अर्धशतके आणि २ शतके

इंग्लंडविरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक

न्यूझिलंड विरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक

पाकिस्तानविरुद्ध
हरलेल्या ३६ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ अर्धशतके, ३ शतके तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ३ अर्धशतके आणि १ शतक. ३ अर्धशतकांपैकी दोनदा ९०+ धावा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
हरलेल्या ३३ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक, १ शतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ३ अर्धशतके. ३ अर्धशतकांपैकी एक्दा ९०+ धावा

श्रीलंकेविरुद्ध
हरलेल्या २९ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतके, ३ शतके तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ५ अर्धशतके.

वेस्ट इंडिज विरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतके तर १ शतक

झिम्बाब्वेविरुद्ध
हरलेल्या ५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना १ शतक

थोडक्यात हरलेल्या सामन्यांतही ३८ अर्धशतके आणि १२ शतके ((बांग्लादेश केनियासारख्या देशांची आकडेवारी धरलेली नाही). मग हा मांजरेकर आणि तत्सम टीकाकार कसे म्हणू शकतात की सचिन दडपणाखाली खेळत नाही?

वीस वर्षे खेळणे हाच एक विक्रम आहे पण वीस वर्षे खेळून ४४.५० चा ऍव्हरेज राखणे हे देखील येरागबाळ्याचे काम नाही. वीस वर्षे खेळलेले इतर खेळाडूही आहेत पण त्यांच्या काळात दर दिवसाआड सामने होत नसत. कसोटीत सुटीचा दिवस असे. क्रिकेट इतके थकवणारे नव्हते. यातच सचिनचे वेगळेपण दिसून येते. पाठदुखी आणि टेनिस एल्बोच्या दुखापतीचा सामना त्यालाही करावा लागला, पण तरीही वीस वर्षे हा फिटनेस त्याने टिकवला. मला नाही वाटत यापुढे वीस वर्षांची अजून कुणाची कारकिर्द असेल. अशा क्रिकेटच्या देवाला हा लेख भक्तिभावे अर्पण.

थोडसं अवांतर: आई, बघ जरा लहानपणी व्यवस्थित क्रिकेट खेळायला दिलं असतस तर हा लेख दुसऱ्या कुणीतरी माझ्यासाठी लिहिला असता.

वरील सर्व आकडेवारी cricinfo च्या statsguru वरून मिळवली आहे.

Monday, November 9, 2009

एक उनाड दिवस

१. टूथपेस्ट्चा गळा आवळल्यावर दात घासण्यापुरती पेस्ट बाहेर आली. आज संध्याकाळी नवीन टूथपेस्ट लाना ही पडेगा (असं मी गेले ४ दिवस ठरवतोय, पण रोज जरूरीपुरती पेस्ट निघतेय)
२. सकाळी सॉक्समध्ये रोजच्याप्रमाणे पॅण्ट अडकली नाही.
३. सॅन फ्रान्सिस्को ट्रेन असूनही आज माझ्या शेजारची सिट मी उतरेपर्यंत रिकामी होती (हे म्हणजे ठाणे-व्ही.टी. (चुकलो, सी.एस.टी.) स्लो ट्रेनमध्ये कांजूरमार्ग ला २०० ग्रॅम सिट (म्हणजे चौथी) मिळणे)
४. तिसरा मुद्दा कदाचित पहिल्या मुद्द्याचा साईड इफेक्ट असू शकतो हे आता लक्षात येतय.
५. ऑफिसात दरवाजाजवळ बसणारी सोनेरी केसांची भटकभवानी (पहाव तेव्हा ऑफिसभर भटकत असते) आजही हसली नाही.
६. ऑफिसात आज काहिच काम नव्हतं. तीन तीन वेळा सेंड/रिसिव वर क्लिक करून देखील एकही मेल आलं नाही.
७. मायबोली आणि मराठीब्लॉग्ज, फ्लिकर, जी-मेल साईट्स ऑफिसात ब्लॉक्ड असल्याने वेळही जात नव्हता. अगदी हातची सगळी नखं खाऊन संपली पण वेळ जात नव्हता (पायात बूट असल्याने आणि पाय तोंडापर्यंत पोचत नसल्याने पायाची नखं वाचली)
८. भटकभवानी टॉक टॉक सॅण्डल वाजवत क्युबिकलच्या बाजूने गेली. जाताना गोड हसली.
९. लंच नंतर परत येऊन सेंड/रिसिव वर क्लिक केलं आणि व्होय्ला, एक मेल आलं. ऑफिसात असणाऱ्या रक्तदान शिबिराबद्दल रिमाईंडर होतं. मेल मधला शब्द न शब्द वाचून काढला.
१०. टाईमपास साठी रक्तदान करायचा विचार केला, पण १ बाटली रक्त दिल्यावर शुद्धीवर येण्यासाठी ४ बाटल्या चढवाव्या लागतील म्हणून बेत रद्द केला.
११. चार पाच मित्रांनी मिळून मग दिड तास चकाट्या पिटल्या.अबु आझमीच्या अल्लामुखात भडकावणे, भारत ऑस्ट्रेलियाकडून हरणे ते भटकभवानीचे टॉक टॉक चालणे यापर्यंत सर्व विषय चघळून झाले.
१२. शेवटी ५:३० ला घरी निघालो. ट्रेनमध्ये बाजूची सिट रिकामी नव्हती.
१३. शेवटी नवीन टूथपेस्ट घेतली.
१४. घरी आलो तर बायको ’The Perfect Bride’ बघत होती. हि डेली सोप बाकी डेली सोपप्रमाणेच डोक्यात जाते.
१५. म्हणून मग ’हा उनाड दिवस’ ब्लॉगवर उतरवून तुम्हाला त्रास द्यायचं ठरवलं.

अजून वाचताय? तुमच्या पेशन्स ला सलाम :)

Friday, November 6, 2009

डबलढोलकी!!!

’मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला’ असे सामना ने कधीच म्हटले नाही (वाचा: http://saamana.com/2009/Nov/06/Index.htm पुन्हा भरती येईल). बहुतेक साहेबांची स्मरणशक्ती वयोमानानुसार खालावत चालली आहे. हा पहा त्याचा पुरावा (वाचा: http://saamana.com/2009/Oct/24/Index.htm अग्रलेख: बस्स झाले ते झाले). सर्व लेख वाचायचा कंटाळा आला असेल तर फ़क्त "...पण तरीही ज्या मराठी माणसासाठी शिवसेनेने ४४ वर्षे रान उठवले तो मराठी माणूसही निवडणूकीत शिवसेनेकडे पाठ फिरवील व पाठ फिरवतानाच आमच्या पाठीत खंजीर खुपसेल असे आम्हाला कधीही वाटले नव्हते.." एवढेच वाचा. एवढा ढळढळीत पुरावा, अन तोही सेनेच्याच मुखपत्रात असताना आम्ही असे म्हटलेच नाही असे माजी सेनाप्रमुख कसे म्हणू शकतात?

आता या स्टेट्मेंट्चा मोठा issue करण्याची काही गरज नाहीय पण बाळासाहेबांनी जे म्हटलय ते स्वीकारून गरज पडल्यास मराठी माणसाची माफ़ी मागायला हवी होती. अर्थात त्यांच्याकडून माफ़ीची अपेक्षा त्यांच्यावर प्रेम करणारा मराठी माणूस करत नाहीय, पण जे म्हटलय ते वाघाच्या काळजाने छातीठोकपणे स्वीकारले असतं तर त्यांच्याबद्दलचा आदर नक्कीच दुणावला असता.

बहुतेक शिवसेनेची, विशेषत: शिवसेनेच्या नेत्यांची पराभवानंतर खिलाडूवृत्तीने पराभव स्वीकारण्याची मानसिकताच जणू नाहीशी झालीय. उद्धव तर पराभवानंतर ३-४ दिवस अज्ञातवासात गेले. काय अर्थ काढायचा याचा शिवसेनेवर विश्वास ठेवणाऱ्या माणसाने? कमीत कमी मिडियासमोर येऊन आपण १-२ दिवसांत यावर आपले मत व्यक्त करू इतके तरी सांगावयास हवे होते. बरं येऊन मत मांडलं काय तर म्हणे आमचा पराभव झाल्लाच नाही. पराभवाचे मुख्य कारण काय तर मनसे. अरे लोकसभेला तेच सांगितलात ना? पुन्हा सगळ्या प्रचारात तोच राग आळवलात ना? मनसेचं अस्तित्व मान्य करून का नाही केलीत मोर्चेबांधणी? सेनेची मोर्चेबांधणी हा दुसराच विषय आहे. उत्तर भारतीय उमेदवार उभे करणे, जुन्या जाणत्या नेत्यांचा पत्ता कट करून नवनवीन ’आदेश’ देणं, लोकसभेत मनसेला मते देणारी लोक पुन्हा मनसेला मतदान करणार नाहीत या भ्रमात राहणं. अशी मोर्चेबांधणी झाल्यावर मोर्चा पडायला कितीसा वेळ लागणार. अर्थात म्या पामराने राजकारणाबद्दल शिवसेनेस काय शिकवावे, पण उघड्या डोळ्यांनी ज्या गोष्टी माझ्यासारख्या सामान्य माणसाला दिसल्या त्या सेनेच्या नेत्यांना दिसू नयेत याच आश्चर्य वाटतय.

अजूनही वेळ गेली नाहीय, म्हणजे तशी ती या विधानसभेत गेलीय निघून, पण पुढच्या निवडणूकीसाठी पूर्ण पाच वर्षे आहेत अजून. तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेली कामे वादातीत आहेत. मनसे पक्षामुळे मते विभागली गेली आहेत याबद्दल दुमत नाही, पण ती का विभागली गेलीत याच्याकडे लक्ष द्या. राज यांनी केलेल्या राजकीय टीकेकडे लक्ष द्या (रिलायन्स वर मोर्चा न्यायचा अन रिलायन्सच्याच जाहिराती सामनात छापायच्या, मराठी पाट्यांसाठी सेनेच्या काळात सेनेनं सक्ती न करणं वगैरे वगैरे). यापुढे मनसे पक्षाचे अस्तित्व मान्य करा अन त्यांच्यावर टीकाटिपण्णी करण्यात वेळ घालवू नका. मनसेने केवळ मराठी अस्मितेचा मुद्दा (जो कधीकाळी सेनेचा होता) लावून धरून एवढं यश संपादित केलय, तुम्ही मराठी अस्मितेबरोबर मराठी माणसाचे दैनंदिन जीवनातले मुद्देही लावून धरा.

४४ वर्षांचा पक्ष ४९ व्या वर्षात हाफ़ सेन्चुरीही पूर्ण न करता आऊट झालेला पाहायचा नाहीय आम्हाला.

Sunday, October 25, 2009

पवनचक्की

फ्रीमाँटहून लॉस अँजेलीस ला जाताना ५८० मुक्त मार्गाजवळ शेकडोंनी पवनचक्क्या पाहिल्या होत्या. तेव्हा निघायला उशीर झाला होता म्हणून तेव्हा न थांबता पुन्हा कधीतरी यांचे फोटो काढू असा विचार केला होता. तो योग काही गेल्य २.५ वर्षात आला नव्हता. गेल्या शुक्रवारी अचानक ते आठवलं अन दुसर्‍या दिवशी पहाटे निघायचा बेत केला.

शनिवारी भल्या पहाटे ५:३० ला उठून घोडं (म्हणजे गाडी) तिकडे दामटवली. ही पहा पहाटे ६:१५ ते ८:३० च्या दरम्यान काढलेली छायाचित्रे. कशी वाटली ते जरूर कळवा.
Thursday, October 22, 2009

आमची पण दिवाळीगेल्या ११ वर्षात केवळ दोन वेळा घरच्या लोकांबरोबर दिवाळी साजरी करता आली. या वर्षी देखील तो योग नव्हता, पण मन स्वस्थ बसू देत नव्हते. पूजा विधी कसे करायचे ते नीट्सं ठाऊक नव्हतं. पण तरी ठरवलं, तोडकी मोडकी का होईना या वर्षी दिवाळी साजरी करायचीच. गेली दोन वर्षे फ़राळ विकत आणून खाल्ला होता. या वर्षी सौ ना बेसन चे लाडू बनवायची हुक्की आली, पण अगदी दिवाळीच्या दिवसापर्यंत काही ते शक्य झालं नव्हतं. शेवटी आदल्या दिवशी सामान आणून घराची आवराआवर करेस्तोवर रात्रीचे दोन वाजले.भल्या पहाटे चार ला उठून अंघोळी उरकल्या. सकाळी मित्रमैत्रिणी घरी आले. मग त्यांच्या हातून विकत आणलेल्या पणत्यांवर नक्षीकाम केलं गेलं. तोवर दुपार उलटून गेली होती. आदल्या रात्री दोन तासाचीच झोप झाल्याने दुपारी सर्वांनाच झोप अनावर झाली. मग जी ताणून दिली ते थेट पाच वाजताच उठलो. मग बेसन चे लाडू बनवण्याचे ठरले. ते कसे बनवावे याचा अनुभव आजच्या आधुनिक नाऱ्यांपैकी कुणाकडेच नसल्याने अगोदर थोडेच लाडू बनवायचे ठरले, अन चांगले झाले तर सेकंड बॅच करायची ठरली. पण पहिल्याच बॅचला ३ तास लागले अन लाडू बनले अवघे ८. मग दुसऱ्या बॅचचा नाद सोडून दिला. नशीबाने प्रत्येकाच्या दाताला प्रत्येकी एक लाडू लाभला. त्याचे क्लोज अप फोटो काढेपर्यंत ते संपले देखील होते. जास्त लिहीत बसत नाही. पहा या दिवाळीत काढलेले काही फोटो.
Tuesday, October 13, 2009

ह्यांचा हसवण्याचा धंदा!!!

"क्या लग रहा है आपको राज ठाकरे कि बॉडी लॅंग्वेज को देखके..?" एक दाढीवाला स्टार न्यूज चा anchor सुटाबुटात त्याच्या संवाददात्याला प्रश्न विचारत होता. त्याची दाढी ही ’चैन से सोना है तो जाग जाओSSS’ असे ओरडणाऱ्या anchor पेक्षा शंभर एक ग्रॅमने कमी होती. बहुतेक विधानसभा निवडणूकीचं थेट प्रक्षेपण करायची जबाबदारी आपल्यावर येणार याची कल्पना असल्यामुळे महिन्याभरापूर्वी दाढी बनवून सूटबूट नीटनेटका बनून आला असावा. पण माकडाने वाघाची कातडी पांघरली तरी शेवटी माकड ते माकडच.

राज यांना मतदान झाल्यावर बहुतेक नव्यानच पत्रकार एका झालेल्या चिमणीनं प्रश्न विचारला होता कि या निवडणूकीत मनसे काही नवनिर्माण करू शकेल का अन त्याला राज यांनी २२ तारखेला सांगतो असं उत्तर दिलं होतं. तेच पकडून हा आपल्या संवाददात्याला प्रश्न विचारत होता.

" क्या लग रहा है आपको राज ठाकरे कि बॉडी लॅन्ग्वेज देखते हुए?"
"राज ठाकरे मे आत्मविश्वास की कमी नजर आ रही है. जो आक्रमकता उन्होने प्रचार करते समय दिखाई थी वो कही भी नजर नही आ रही है " - संवाददाता (त्याची दाढी होती की नाही ते दिसलं नाही).
" बिल्कुल बिल्कुल. मुझे भी उनमे आत्मविश्वास की कमी नजर आयी. शायद २२ तारिख को उनमे बात करने का भी आत्मविश्वास ना रहे" - तोच दाढीवाला.

अरे तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती? ’२२ ऑक्टोबरला सांगतो’ या तीन शब्दात तुम्हाला कळलं की राज ठाकरे मध्ये आक्रमकतेचा अभाव आहे? वा रे वा, बहुतेक स्त्रियांचं अंतर्मन ओळखण्याचं ब्रम्हदेवालाही न जमलेलं काम हा दाढीवाला अन त्याचा तो संवाददाता सहज पार पाडू शकतील (फक्त प्रश्न हा आहे की यांच्या जवळपास फिरकायला किती स्त्रिया तयार होतील).

२४ तास लाफ्टर चॅलेंज चालू असलेलं एकमेव न्यूज चॅनेल म्हणजे स्टार न्यूज. अगदी आजतक ही त्याला स्पर्धा देऊ शकत नाही. त्यांची presentation ची style अफलातून आहे, म्हणजे एका छोट्या विंडो मध्ये चित्रे दाखवायची अन बाजूला मोठ्ठ्या फॉण्ट मध्ये न्यूज(?) लिहायची अन घसा सुकेपर्यंत रेकून तीच वाचून दाखवायची. म्हणजे सचिन तेंडुलकर चा फोटो दाखवून बाजूला ’क्या सचिन सेकंड इनिंग मे दबाव मे आकर खेलते है?’ अस ६५ साईज च्या फॉन्ट मध्ये लिहायचं अन तेच वाचून दाखवायचं. त्यांची वाचून दाखवायची style इथे जशीच्या जशी दाखवता येणार नाही :( ह.ह.ग.लो. (’तो’ अर्थ घेऊ नका) असेल तर एकदा त्यांची न्यूज पाहाच, खास करून वाह क्रिकेट. आई शप्पथ सांगतो, सचिन ने जर का त्यांची न्यूज पाहिली तर उद्या रिटायर्ड होईल, मरू दे तो २०११ चा वर्ल्ड कप.

मी शक्यतोवर हे चॅनेल लावत नाही. डोकं जड झालं असेल तर घडीभर हसण्यासाठी म्हणून हे चॅनेल लावतो. कालही तसच झालं. बायको 'Notting Hill' हा रोमॅन्टिक चित्रपट बघत होती. इंग्रजी रोमॅन्टिक चित्रपट आणि मी म्हणजे ३६ चा आकडा. तशीच वेळ आली तर मी चंद्रचूड सिंग आणि किशन कुमार चे चित्रपट आनंदाने पाहिन. (किशन कुमार कोण?? आठवा बेवफा सनम मधला सोनू निगमच्या आवाजातील ’आज ही हमने बदले है कपडे आज ही हम नहाये हुए है’ वर नाचणारा ठोकळा). तसाच तो Notting Hill माझ्या डोक्यात जाऊन माझा मेंदू कुरतडत होता. त्या सिनेमातील एकमेव आवडलेली गोष्ट म्हणजे त्यातलं You say it best when you say nothing at all’ हे गाणं. किती मस्त शब्दात प्रियकर आपल्या प्रेयसीला सांगतो कि अगं बये, तू खूप म्हणजे खूप बडबड करतेस, आत्ता तरी गप्प बस’ :) असो, विषयांतर होतय. तर तो सिनेमा पाहून जड झालेलं डोकं हलकं करण्यासाठी टीवी वर काही आहे की नाही ते पाहताना हे संवाद कानी पडले. राज यांनी विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत शांतपणे उत्तरं दिली अन हा दाढीवाला नको त्या कल्पनांचा किस पाडत होता. आधी त्या दाढीचा किस पाड म्हणावं म्हणजे कमीत कमी त्याची स्वत:ची बायको (असली तर)गालावर किस घेण्याचा प्रयत्न करेल.

अजून एक केलेलं observation म्हणजे अमेरिकेत दाखवण्यात येणाऱ्या झी चॅनेलवरच्या रात्री ११:३० ला दाखवण्यात येणाऱ्या पंजाबी बातम्या. त्यात बातम्यांच्या दरम्यान दाखवण्यात येणाऱ्या चलतचित्रात फोकस हा फक्त सरदार लोकांवर करण्यात येतो, मग तो सरदार कुठल्या कोपऱ्यात लपलेला का असेना. विश्वास नसेल तर बघाच आजच्या बातम्या :) मुंबईत लोकल मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातही त्यांनी स्फोटावर कॅमेरा केंद्रित न करता एका सरदार असलेल्या पोलिसांवर केला होता.

हल्ली इकडे बे एरिया मध्ये ११७० वर एक २४ तास देसी रेडिओ स्टेशन सुरू झालेलं आहे. शुद्धलेखनाच्या नावाने खडे फोडणाऱ्यांनी कधी वेळ मिळाल्यास ते ऐकावं. हिंदी आणि इंग्रजी व्याकरणात जितके काळ, क्रियापद, कर्म, कर्ता, एकवचन, अनेकवचन वा जितकं काही आहे त्यांच्या माताभगिनींना एकत्र करून तयार झालेली भाषा म्हणजे या स्टेशनवरच्या निवेदकांची भाषा. ते निवेदक / निवेदिका समोर आल्यावर त्यांचा खून करावासा नाही वाटला तर नाव बदलून ठेवीन.

चला, यावर लिहू तितकं कमीच होईल. आवरतं घेतो. स्टार न्यूज तुमचं आवडीचं चॅनेल असेल अथवा Notting hill तुमचा आवडता सिनेमा असेल वा ११७० वर केलेली टिपण्णी तुम्हाला न आवडून तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला काही एक फरक पडत नाहीय :) कृपया निषेध नोंदवण्याचा प्रयत्न करू नये, अपमान होईल ;)

Friday, October 9, 2009

काटकसर की उधळपटटी??

बरेच दिवस या विषयावर लिहायचा विचार होता, पण या ना त्या कारणाने ते राहून जात होतं. काही दिवसांपूर्वी भारताची चांद्रयान मोहिम अकाली संपृष्टात आली, परंतु जाता जाता चंद्रावर पाणी असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळाले आहेत. सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे. पण.......

......पण याची दुसरी बाजू म्हणजे अशा मोहिमांवर खर्च होणारा वेळ आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावर खर्च होणारा पैसा. अशा एका मोहिमेसाठी अब्जावधी डॉलर्सहून अधिक खर्च येतो म्हणे. रुपयांत हा खर्च मोजायचा झाला तर एकावर किती शून्य पडतील याचा विचारच माझ्या मेंदूला झेपत नाहीय. बरं केवळ या मोहिमेपुरतं बोलायचं झालं तर इतक खर्च करुन महत्वाचा निष्कर्ष काय तर चंद्रावर पाणी आहे याचे संकेत. असेल खरचं पाणी तर आपण काय चंद्रावर राहायला जाणार आहोत की चंद्रावरचं पाणी पृथ्वीवर आणून विहार तलावात ओतणार आहोत? आणि खरचं तसं करायचं ठरवलं तर अंटार्क्टिकेला जो पाण्याचा जवळपास अमर्याद साठा आहे तो आणून ओतणं जास्त स्वस्त पडणार नाही का?

कुठल्याही व्यवसायात मनुष्य रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट (ROI) चा विचार केल्याशिवाय शक्यतोवर पडत नाही. फार कशाला, रुपयाला घेतलेली मेथीची जुडी दिड रुपयाने विकली जावी हा विचार रस्त्यावर भाजी विकणाऱ्या मावशी करतात. पण या अवकाश मोहिमांचे ROI कुणालाच नक्की माहीत नसते. म्हणजे इन्वेस्ट्मेंट अब्जावधी डॉलर्स आणि ROI काय तर चंद्रावर पाण्याचे संकेत आणि इतर संशोधनयोग्य माहिती? बरं हे अब्जावधी डॉलर्स येतात कुठून. सरकारच्या तिजोरीत डॉलर्स ठेवायला जागा नाही म्हणून सरकार अशा मोहिमांवर ते उधळताहेत अशातलाही काही भाग नाहीय. तुमच्या आमच्या सारख्यांचे टॅक्स चे पैसे अन बहुतेक कधीही न फेडता येणारं जागतिक बॅंकेकडचं कर्ज या पैशांवर या मोहिमा चालवल्या जात आहेत.

अशा मोहिमांमधून काढण्यात येणारे निष्कर्ष हाही एक संशोधनाचा विषय आहे. सर्व राष्ट्रांनी इतकी वर्षे केलेल्या अवकाश संशोधनानंतरही आज आपण येत्या काही दिवसांचे हवामान नक्की वर्तवू शकत नाही. आजही आपण येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल असे न म्हणता मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे म्हणतो. गेली ३ वर्षे मी अमेरिकेची weather.com follow करतोय. त्यातही ते बऱ्याचदा चुकतात. चला एखादे वेळेस हवामानाच्या संशोधनासाठी अशा मोहिमांवर खर्च करणे मान्यही करू पण यांच्या संशोधनाचे विषय तर पहा, म्हणजे मंगळावर जीवसृष्टी आहे की नाही, पृथ्वी सारखा दुसरा ग्रह आहे का, aliens आहेत की नाही, दुसऱ्या ग्रहांवर खनिजांचा साठा आहे की नाही. असल्या नसत्या चांभार चौकशांसाठी खरच अब्जावधी डॉलर्स उधळणं योग्य आहे का? मंगळावर जीवसृष्टी असेल तर काय त्यांच्याबरोबर फोन-फोन खेळायचय की पृथ्वी सारखा ग्रह सापडला म्हणून लगेचच तिकडे राहायला जायचं? डिस्कवरी वर एकदा दाखवत होते की इकडचे संशोधनकर्ते गेली कित्येक वर्षे aliens साठी रोज येडचाप सारखे सांकेतिक संदेश पाठवताहेत पण आजपर्यंत एकही alien ने उत्तर पाठवले नाहीय. अरे असतील aliens तर त्यांना त्यांच्या ग्रहावर सुखाने जगू द्या की. इकडे बोलवून काय टी-२० च्या मॅचेस घ्यायच्या आहेत त्यांच्याबरोबर? या पैशाचा आहे त्या पृथ्वीवर नंदनवन फुलवण्यासाठी वापर करता येणार नाही का?

एक वेळ अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांनी अशा मोहिमा राबवण्यात काही गैर नाही. एक तर या मंदीच्या काळातही ते इतरांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या देशात उपाशी आणि बेघर नागरिकांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. नागरी सुविधा मुबलक आहेत. पण भारतासारख्या देशाने अशी उधळपटटी करणं कितपत योग्य आहे. त्या पैशांतून भारताला अगोदर ’प्रगतीशील’ अवस्थेतून ’प्रगत’ अवस्थेत नेणे शक्य होणार नाही का? एका चांद्रमोहिमेच्या खर्चात माझ्यामते शेकडो गावे सहज वसवता येऊ शकतील. जास्त नाही, फक्त अगदी मूलभूत गरजा; अन्न, वस्त्र आणि निवारा. एकदा का सामान्यातल्या सामान्य माणसाला दोन वेळचं जेवण, राहायला निवारा अन ल्यायला कपडे मिळाले की मग विचार नाही का करता येणार अशा मोहिमांचा?

फार दूर कशाला? अरबी समुद्रात शिवरायांचा ४०० करोड रुपये खर्च करून statue of liberty हून उंच पुतळा बसवण्यात येणार आहे. तसा तो गेल्या विधानसभा निवडणूकीपासून बसवण्यात येतोय आणि बहुतेक पुढच्याही निवडणूकीत बसवण्यात येइल, फक्त त्याचा खर्च कागदोपत्री १००० कोटींवर गेलेला असेल. तर सांगायचा मुद्दा असा की त्या करोडो रुपयांत हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही का?

अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात काटकसर करता येऊ शकते. एका मित्राशी चर्चा करताना तो म्हणाला होता की तू कुठे काटकसरीनं जगतोयस तुझं जीवन, घेतलास की लाखभर घालून एक SLR. मी नाही म्हणत नाहीय पण मी काही सरकारचा पैसा खर्च करत नाहीय. तो पैसा मी कष्ट करून कमावला आहे आणि मला पूर्ण अधिकार आहे तो खर्च करण्याचा. पण जेव्हा हजारो law abiding citizens पोटाला चिमटा काढून टॅक्स भरतात तेव्हा तो नीट वापरला जावा अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

मला कल्पना आहे की हा लेख लिहून परिस्थितीत काही फरक पडणार नाहीय. अवकाशयाने तशीच उडत राहतील अन भविष्यात कधीतरी शिवाजी महाराज अरबी समुद्रात घोडयावर स्वार होतील, पण मनातील घुसमट कमी व्हायला याचा नक्कीच उपयोग होईल :)

Saturday, September 19, 2009

कुणी सांगेल का?

१. अमेरिकेतून परत आलेल्या जवळपास प्रत्येकाच्या प्रत्येक वाक्यात ’अमेरिका’ एकदा तरी का डोकावते?
२. कुत्र्या मांजरांवर प्रेम करणारे चिकन/मटण बिर्याणी एकदम आवडीने कसे खातात?
३. ABCD (a.k.a. low waist) जीन्स घालणाऱ्या मुली बसल्यावर सारख्या सारख्या मागून टी-शर्ट का खाली खेचत असतात?
४. बाजू बाजूच्या क्युबिकल मध्ये बसणारे एकमेकांशी डायरेक्ट न बोलता messenger किंवा e-mail द्वारे का बोलतात?
५. समोर उघडेबंब गणराय दिसत असताना दर्शनाच्या रांगेतील एक माणूस स्वत: घातलेला शर्ट दुसऱ्याला दाखवत "हा शर्ट गणपतीला शिवला" असं का सांगत होता?
६. विषाच्या बाटलीवर expiry date असते का?
७. पुण्यात दुचाकीवरील ९९% मुली संपूर्ण तोंडाला स्कार्फ बांधून अतिरेकी का बनलेल्या असतात? प्रदूषण हे उत्तर असेल तर त्याचा त्रास पुरुष वर्गाला होत नाही का?
८. काही माणसं आपल्याला मोबाईलवर फोन करून कोण बोलतय असं का विचारतात?
९. (कविता करणाऱ्या सर्वांची माफी मागून) ब्लॉगवर ९०% हून अधिक लोक ओढून ताणून यमक जुळवून वा मुक्तछंद वापरूनच कविता का करतात?
१०. कुठल्याही मुलीला propose केल्यावर तिचं पहिलं उत्तर ’मी तुला त्या नजरेने कधी पाहिलच नाही’ हेच का असतं?

तुर्तास इतकेच.... अजून प्रश्न पडले की याचा भाग-२ लिहेन :)

Monday, September 7, 2009

हे भलते अवघड असते..

दरवाजाचं लॅच उघडून अरुण आत आला. डिश वॉशरचा आवाज येत होता. म्हणजे वैशाली घरी आलेली असणार. बूट काढून सोफ्यावर बसेपर्यंत वैशाली किचनमधून पाणी घेऊन आली.
" ए वैशू, चहा टाकतेस? डोकं बघ कसं जड जड झालय"
" हो अगोदरच टाकलाय. होईलच इतक्यात, तोपर्यंत फ्रेश होऊन ये"

अरुण उठला अन बाथरूम मध्ये गेला. वैशू किचन मध्ये गेली. अरुण फ्रेश होऊन यॆईस्तोवर वैशू ने गरमागरम चहा आणि त्याच्या आवडीची पारले-जी ची बिस्किटं मांडून ठेवली होती.

"अर्रे व्वा!! कुठे मिळाली ग ही बिस्किटं. येत नव्हती ना आजकाल इंडियन स्टोर मध्ये ?" - अरूण एकदम चार बिस्किटं उचलत म्हणाला
" अरे दूध आणायला गेली तेव्हा दिसली शेल्फ वर. उचलली आणि आणली. आणि ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये."
" बरं बरं, सकाळी सकाळी उपदेश नको देऊस " ती चार बिस्किटं एकदम चहात बुडवत अरूण म्हणाला.

अगदी रात्री बारा वाजताही सकाळी सकाळी ने सुरुवात करण्याची अरूणची सवयच होती. बिस्किटं संपल्यावर अरुण चहा बशीत ओतून भुरके मारून पिऊ लागला. त्याला तसच चहा प्यायला आवडायचं, पण बाहेर लोकलज्जेस्त्व ते करता येत नसे.

" ए अरु.."
" हम्म्म्म.. काय ग?"
" काही विचार केलायस का?"
" कशाबद्दल??
" अरे असं काय करतोयस? आपली फॅमिली सुरु करण्याबद्दल. लग्न होऊन साडे पाच वर्षे होतील आता. घरी फोन केला तर हेच ऐकाव लागत. तुझं बरं आहे, तुला कोणी बोलत नाहीत. सगळे उपदेशाचे डोस मलाच. हल्ली तर मी फोन करणच सोडून दिलय" वैशू त्राग्याने बोलू लागली.
" हे बघ वैशू, फॅमिली सुरू करायला माझी ना नाहीय. पण सध्यातरी ते शक्य नाहीय. लग्न झाल्यावर सांगत होतो, पण तेव्हा तुझं करियर तुला महत्वाचं होतं. सध्या अशा..." - अरुण उत्तरला
" जुन्या गोष्टी नको उकरून काढूस रे. आत्ताच्या परिस्थित काय करायचं त्यावर विचार केलायस का?"

अरूण उर्फ अरु आणि वैशाली उर्फ वैशू. दोघही एकाच मल्टीनॅशनल कंपनीत कामाला. गेली ३ वर्षे अमेरिकेत वेगवेगळ्या क्लायंटसाठी काम करणार एक भारतीय जोडप. तस त्यांचं अरेंज्ड मॅरेजच होत, पण त्यांच्याकडे पाहिल्यावर ते कोणी खरं मानणार नाही इतक प्रेम त्या दोघांत होतं. अरु सातारचा तर वैशू पुण्याची. अरुचे जीवनाबद्दलचे विचार एकदम स्पष्ट तर वैशू तिला काय पाहिजे याबद्दल थोडीसी कन्फ्युज्ड. अरु आणि वैशूचे घरवाले तर आता त्यांच्या हाती छोटं खेळणं कधी येतय याचीच आस लावून बसले होते. लग्नानंतर जेव्हा अरुने लगेचच फॅमिली सुरू करण्याबद्दल वैशूचं मत विचारलं तेव्हा वैशू थोडी गोंधळलेली होती. फॅमिली आणि करिअर यापैकी कशाला प्राधान्य द्यायचं हे ती निश्चित करू शकत नव्हती. शेवटी मित्रमैत्रिणींच्या सांगण्यावरून तिने करिअरला प्राधान्य द्यायचं ठरवलं. अरुनेही तिच्या मताचा आदर राखत दोघांच्याही घरच्यांना समजावलं.

लग्न झालं होतं खर पण एकत्र राहण त्या दोघांच्याही नशीबी जणू काही नव्हतच. अरुच्या कामाच्या स्वरूपामुळे त्याला भारतातल्या भारतात बरेच फिरवे लागत असे. आठवडा आठवडाभर तो या ना त्या शहरात फिरत असे. त्यात त्याला अनिश्चित काळासाठी अमेरिकेला जाण्यास सांगण्यात आलं. खरं तर अरुला जायचं नव्हतं पण वैशूच्या सांगण्यामुळे तो अमेरिकेत आला. वैशूचाही एच-१ झाला होता. एकाच कंपनीत असल्यामुळे तीही त्याला लवकरच जॉईन करणार होती. पण तिची assingment या ना त्या कारणाने पुढे ढकलली जात होती. होता होता दिड वर्ष निघून गेल. रोज याहू वर वेबकॅम वर एकमेकांना पाहून दिवस ढकलत होते, पण प्रत्यक्षात पाहण्यासाठी डोळे आसुसलेले होते. नाही म्हणायला महिन्याभराच्या सुटटीवर अरु एकदा भारतात येऊन गेला पण सर्व नातेवाईकांना आणि घरच्या मंडळींना भेटण्यात तो वेळ कसा निघून गेला हे त्या दोघांना कळलही नव्हतं. शेवटी एकदाची वैशूला assignment मिळाली अन ती अमेरिकेला रवाना झाली. पण तरीही एकत्र राहण काही त्यांच्या नशीबी नव्हतच. आता अरुची नोकरी स्थिर तर वैशूच्या पायाला भिंगऱ्या लागल्या होत्या. तिला तिच्या नवीन क्लायंटच्या अमेरिकाभर असलेल्या लोकेशन्स वर फिरावे लागे. महिन्याचे कमीत कमी २ विकेंड्स तरी ती घराच्या बाहेर असे. त्यांच्याबरोबरच्या जोडप्यांना एक दोन मुलही झाली होती. प्ले ग्राऊंडवर खेळणाऱ्या त्या लहान मुलांना पाहून आपण करिअरला प्राधान्य देऊन काही चूक तर केले नाही ना अस वैशूला राहून राहून वाटे. आता वैशूलाही आई बनावसं वाटत होत, त्यामुळे ती जवळपास रोज अरुकडे त्याचा लकडा लावत होती. पण अरूचे मुलाला वाढवण्याबाबत काही स्पष्ट विचार होते.

" विचार तर मी केलाय आणि तुला तो सांगितलाही आहे" - अरु म्हणाला.
" अरे पण हे सर्व सांभाळून काहीच का करता येणार नाहीय?" - वैशू
" हे बघ, मुल झाल्यावर आई-वडील किंवा त्याचे आजी आजोबा यांचा पुर्णवेळ त्या मुलाला मिळालाच पाहिजे या मताचा मी आहे. त्याला इथे डे केअर मध्ये मी अजिबात टाकणार नाही. "
" मग बोलावून घेऊ ना आई दादांना नाहीतर माझ्या आई बाबांना"
" नाही मला ते पटत नाही" - अरु चहाचा कप सिंक मध्ये ठेवत म्हणाला
" ते मला ही माहीत आहे पण का ते तू कधीच सांगितल नाहीयस" - वैशू म्हणाली.
" बरं आज सांगतो. तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर आई दादांना बोलवायचं झालं तर ते येणार नाहीत. अगं माझी आई सातारच्या बाहेर एस.टी. ने कधी गेली नाही, ती विमानात बसून साता समुद्रापलीकडे कशी येइल? आणि ...."
" मग माझ्या आईबाबांना बोलावून घेऊ ना, ते नक्की येतील." - त्याचं बोलणं मध्येच तोडत वैशू म्हणाली
" हे बघ त्यांना इकडे हवापालट करण्यासाठी बोलावण्यासाठी माझी काहीही हरकत नाहीय. पण फक्त आपली मुल सांभाळायला बोलावण मला पटत नाही. भारतात असतो तर गोष्ट वेगळी होती. एक तर तू १५-१५ दिवस घराच्या बाहेर असतेस, माझी ही घरी परत यायची अशी निश्चित वेळ नाहीय. आजूबाजूलाही मिसळ्यासाठी कुणी नाही. घरातल्या घरात तरी किती दिवस काढणार ते?" - अरु एका दमात उत्तरला
" अरे माझे आईबाबा करतील माझ्यासाठी तेवढं "
" मला माहित आहे ते, एखादा आठवडा वगैरे ठीक आहे पण ३-४ महिने त्यांना इकडे बोलावून त्यांची घुसमट करण्याइतका स्वार्थी मी नक्कीच नाही. आणि समज जर का ते आले, त्यांनी ३-४ महिने त्यांनी काढले कसे तरी, तर ते परत गेल्यावर काय?"
" मग यावर काहीच उपाय नाही का?" - वैशूने जवळ जवळ रडवेल्या सुरात विचारलं.
" आहे. आपल्यापैकी एकाने मुलाला पूर्ण वेळ द्यायचा. कमीत कमी तो सजाण होईपर्यंत तरी"
" आणि मग माझं करिअर??" - वैशू
" तूच पुर्ण वेळ द्यावास अस मी म्हणत नाहीय. तुला करिअर वर लक्ष द्यायचं असेल तर मी नोकरी सोडतो. मी घराची संपूर्ण जबाबदारी पाहीन. हाऊस हसबंड म्हण हव तर "
" अरे काही काय बोलतोयस. लोक काय म्हणतील. बायको कमावतेय अन नवरा बसून खातोय. " - वैशू
" हे बघ वैशू, लोक काय म्हणतील याचा विचार मी कधीच केला नाही. "
" दोघांचं करियर सांभाळून काहीच का करता येणं शक्य नाहीय" - वैशू
" आहे, त्यासाठी आपण भारतात परत जायचं" - अरु म्हणाला
" अरे पण ते आपल्याला परवडणार आहे का? आजकाल मुलांची शिक्षणे किती महाग झालीत ठावूक नाही का तुला? वर्षाला दिड दोन लाख कुठेच गेले नाहीत. पैसे कमवायला म्हणून आलो ना आपण इथे. माझ्या विसा ची ३ तर तुझी २ वर्षे बाकी आहेत. अजून आपली पाहिजे तशी सेव्हिंगसुद्दा झालेली नाहीय" - वैशू
" हे बघ कितीही सेव्हिंग झाली तरी ती आपल्याला अपुरीच वाटणार. पैसा वाढतो तशा गरजा वाढतात माणसाच्या. आणि कोणी सांगितलय की महागड्या शाळेतच घालायला हव मुलांना. मी म्युन्सिपाल्टी च्या शाळेत शिकून आणि तू समर्थ विद्यामंदीर मध्ये शिकून आज आपण चांगल्या पोजिशनला नाही आहोत का? लक्षात ठेव बदकाला राजहंसाच्या बाजूला बसवलं तरी बदक ते बदकच आणि हिऱ्याला काचेच्या गोट्यांमध्ये ठेवलं तरी हिरा तो हिराच. फक्त या हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी आपल्याला पूर्ण वेळ देता आला पाहिजे" - अरू उत्तरला.
"भारतात गेल्यावर त्याला आपल्याला पूर्ण वेळ देता येइल?" - वैशू
" इकडच्या पेक्षा नक्कीच जास्त वेळ देता येइल. आपला पूर्ण वेळ जरी नाही मिळाला तरी आजी आजोबांचा वेळ त्याला नक्की मिळेल. इकडे डे केअरला टाकण्यापेक्षा ते नक्कीच चांगलं. इकडे म्हणे शाळेतच मुलांना त्यांचे आईवडील त्यांच्यावर ओरडले तर ९११ डायल करायला शिकवतात म्हणे. इकडे मूल हाताबाहेर जायला जास्त वेळ लागणार नाही. to be very frank मला या संस्कृतीत आपलं मूल वाढवायचं नाहीय. बुरसटलेल्या विचाराचा म्हण हवं तर मला, पण याबाबत मी माझी मतं तुला अगोदरच सांगितली होती. आज तुला त्यांची कारणही सांगितली. लग्नानंतर लगेच मूल न होऊ देण्याच्या तुझं मत मी स्वीकारलं होतं. आशा करतो की माझी मतेही तुला पटतील"
" इतकं फॉर्मल बोलायची काही गरज नाहीय.." असं म्हणून वैशूनं तो विषय तिथच संपवला.

रात्रभर वैशूच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. अरुचे विचार तिला कळत होते पण वळत नव्ह्ते. बराचं विचार केल्यावर तिचं मत पक्क झालं. पहाटे पहाटे कुठे तिचा डोळा लागला.

सकाळी डोळे उघडले तर आठ वाजून गेले होते. तितक्यात किचनमधून खडखडाट ऐकू आला म्हणून उठून ती किचन मध्ये गेली. अरू चहा करण्यात गुंतला होता.

" अरू "
" अरे उठलात राणी सरकार. मला वाटलं आज कामाला बुटटी मारताय की काय " - अरू आलं किसत म्हणाला
" बुटटीच मारणार होते, पण माझा विचार पक्का झालाय, तो मॅनेजरला सांगायला मी आज जाणार आहे" - वैशू उत्तरली.
" कसला विचार ग"
" नोकरी सोडायची किंवा भारतात परत जायचं यापैकी जे प्रथम होईल ते करायचं आणि लवकरात लवकर पाळणा हलवायचा " वैशू लाजत उत्तरली.
" अरे व्वा. काल सांगितलं असतस तर कालच सुरुवात केली नसती का, चल मारच दांडी तू. मी ही मारतो " डोळे मिचकावत अरु म्हणाला.
" चल चावट कुठचा " वैशू लाजत त्याच्या मिठीत शिरत म्हणाली
" चला राणीसरकार, जा दात घासा, चहा तयारच आहे "
" ही ही.. घासते रे बाबा. मी माझ्या मॅनेजरशी बोलते आणि तुला फोन करते. भारतात जायचं ठरलं तर तूही तुझ्या मॅनेजरशी बोलून घे"
" जशी आज्ञा राणी सरकार"

ऑफिसला येऊन सर्वप्रथम वैशू ने मॅनेजरला गाठले आणि तिचा निर्णय सांगितला

" वैशाली मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो. पण तुम्ही तुमचा निर्णय चार महिने पुढे ढकला. या नव्या assignment बद्दल मी तुम्हाला सांगणारच होतो आज. तुम्हाला या विकेंडलाच निघायचय न्यू यॉर्कला जायला. दोन महिने असणार आहात तुम्ही तिथं. बाकीच तुम्ही परत आल्यावर बघू " - मॅनेजर उत्तरला.

वैशूला हसावं की रडावं तेच कळेना.

Saturday, September 5, 2009

हे करून पहा.. मज्जाच मज्जा!!!

कधी कधी रस्त्यावर चालताना वा गाडी चालवताना विषय सुचतात, वाटतं आत्ता घरी गेल्यावर यावर पोस्ट लिहून टाकू. पण घरी येइपर्यंत ते काय होतं तेच आठवत नाही. तर कधी कधी काही विषय, काही घटना इतक्या छोट्या असतात की त्यावर (माझ्या कुवतीच्या लेखकाला) एक लेख शक्य होत नाही. म्हटलं की आज अशाच छोट्या छोट्या गोष्टींना एकत्र करुन काही लिहिता येतय का ते पाहू. यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या वेंधळेपणाच्या आहेत, तेव्हा हासू नका बरं आम्हास्नी :)

१. अकरावीला माझं कॉलेज घरापासून चालत २५ मिनिटांवर होतं. रोज चालत जायचो अन चालत यायचो. शायनींग मारायला माझी सायकल कधी येतेय याची वाट बघत होतो. म्हणजे घरच्यांनी सायकल घेऊन द्यायचं प्रॉमिस केलं होतं. दहावीला ८१% मिळाले होते ना (असं काय बघताय फडतूसासारख, १९९२ साली ते भरपूर होते बरं का). शेवटी एकदाची सायकल आली. दुपारी सायकलवरून गेलो कॉलेजला. संध्याकाळी निघताना रोजच्या गँगबरोबर बाहेर पडलो. अर्ध अंतर चालल्यावर लक्षात आलं.. आयला आपली सायकल कुठाय?? ती बिचारी तशीच कॉलेजच्या पार्किंग लॉट मध्ये आपल्या धन्याची पाट बघत होती.

२. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यासारखं कंटाळवाणं काम कुठलं नसेल. पण जन रीत म्हणून करावं लागतं. अशाच एका सकाळी मी ब्रश करायला सुरुवात केली. बश करताना मी जवळ जवळ अर्ध्या झोपेतच असतो. तसाच त्या दिवशीही होतो. ब्रश करताना काहीतरी वेगळं वेगळं जाणवत होतं. जरा डोळे उघडून नीट बघितलं.... त्या दिवशी वापरली गेलेली टूथपेस्ट होती.... पामोलिव्ह शेविंग क्रिम.... पामोलिव्ह दा जवाब नही...

३. मुंबईत नाल्याच्या बाजूला भैय्याच्या बरबटलेल्या हातांनी बनवलेली पाणीपुरी खाणारा मी इकडे अमेरिकेत आल्यापासून पाणी मात्र विकत आणून पितो (माज चढलाय, दुसरं काय). पाच गॅलन ची ३ कॅन्स भरून आणतो. पुरतात २-३ आठवडे. एकदा भरलं पाणी आणि मग लक्षात आलं कि पैशाचे पाकीट घरीच विसरलो. मग काय, ट्रॉली लावली कोपऱ्यात, गेलो घरी, आणलं पाकीट .. बरं एकदा करून शिकायचं की नाही? ही गोष्ट मी ३-४ वेळा केलीय. शेवटी मी गाडीतच थोडे पैसे ठेवायला सुरुवात केली.

४. हे मी केलेलं नाहीय (हुश्श्श, बरं वाटलं बाबा). शाळेत असताना आम्हाला भूगोलात कस्तुरी मृगावर एक धडा होता. कस्तुरीमृगाच्या बेंबीत कस्तुरी असते म्हणे. परिक्षेत कस्तुरीमृगावर टीप लिहा म्हणून प्रश्न होता. त्यात माझ्या एका वर्ग मित्राने लिहिलं होतं.... कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरीची डबी असते... आणि तो पेपर आमच्या मॅडम नी वर्गात वाचून दाखवला होता :) मी पण असला करामाती प्रकार केलाय पण सर्वांसमोर नाही :) कुठल्या तरी शिक्षक दिनी मी गणितातली समीकरणे शिकवणार होतो. त्याची आदल्या दिवशी प्रॅक्टिस करत होतो. आई, वडील आणि मुलाचं समीकरणे वापरून वय काढायचं होतं. माझ्या समीकरणाने मला मुलाचं वय २५ वर्षे, आईचं वय १३ वर्षे आणि वडीलांचं वय ६-७ वर्षे असं काहीतरी दिलं होतं :)

बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आता आवरतं घेतो :) आहे का मला कॉम्पिटिशन देणारा कुणी???

Thursday, September 3, 2009

इट्स माय कप ऑफ टी!!!!!!

दिड आठवड्याच्या सुटटीत सगळ्यात जास्त कोणती गोष्ट मिस केली असेल तर ती म्हणजे सकाळ आणि संध्याकाळचा चहा. इकडे बे एरियात फुटा फुटाला देसी रेस्टॉरंट्स आहेत पण ज्या अमेरिकन खेड्यात गेलो होतो तिकडे एकही नव्हतं. एखाद्या अटटल दारुड्याला आठवडाभर दारु न मिळाल्यास त्याची जी अवस्था होईल त्याहीपेक्षा वाईट अवस्था माझी झाली होती. नाही म्हणायला चहाच्या वेळेला कॉफी ढकलत होतो गळ्याखाली, पण सकाळ संध्याकाळ चहा ढोसण्यात जी मजा आहे ती कॉफी ढोसण्यात नाही. तुलनाच करायची झाली तर ते विलायती दारुची तहान हातभटटीच्या दारूवर भागवण्यासारखे होते.

प्रवीण पाताडे उर्फ मी म्हणजे अटटल चहाबाज. १९९८ ते २००१ च्या दरम्यान दिवसाला जवळपास १६-१७ कप चहा सहज रिचवणारा माणूस. आयुष्यात सुपारीच्या खांडाचही व्यसन नाही, पण चहा म्हणजे जीव की प्राण. १९९८ च्या अगोदरही मला चहा आवडायचा पण दिवसाला दोन कप, घरी जेव्हा बनत असे तेव्हाच. १९९८ ला घरापासून दूर बंगलोरला सॉफ्ट्वेअर इंजिनीअर म्हणून विप्रो कंपनीत रुजू झालो. कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांसाठी २४ तास चहाची सोय करून ठेवली होती (हो, तेव्हा विप्रो आतासारखी चिंधीगिरी करत नव्हती ). सकाळी ९ ते ६ कँटीन मध्ये चहा मिळायचा आणि रात्री २ मोठे थर्मास प्रत्येक फ्लोअरवर ठेवायचे. त्यापैकी सकाळी ९ चा आणि दुपारी २ चा चहा कँटीन वाला नायर जागेवर आणून द्यायचा. माझ्या मते तो मी माझ्या आजवरच्या आयुष्यातील प्यालेला सर्वोत्तम चहा होता. त्यामुळे रात्री कितीही उशीर झालेला असला तरी तो चहा पिण्यासाठी मी ९ च्या आत ऑफीसला टच होत असे. काम करता करता मी पार्ट टाईम एम.एस. सुद्दा करत होतो. दिवस कामात (आणि टी ब्रेकमध्ये) कसा निघुन जायचा ते कळायचं नाही, त्यामुळे रोज रात्रभर जागून अभ्यास करणे भाग असायचे. मग संध्याकाळी सहा ते रात्री दोन अडीज पर्यंत जवळपास तासाला दोन या हिशेबाने मी चहाचे कप रेटायचो.

मग जणू ते व्यसनच जडलं. पहिला प्रॉब्लेम २००१ मध्ये जेव्हा मी कॅनडाला गेलो तेव्हा आला. जाताना मी चहा पावडर वगैरे घेऊन गेलो होतो. सकाळ संध्याकाळ घरी चहा व्हायचा पण ऑफीसमध्ये पंचाईत व्हायची. मग तिकडे लिप्टनची डिप चहा प्यायचो, पण त्याने तलफ काही जायची नाही. हळू हळू घरातली पावडरही संपली. देसी स्टोर १०-१५ मैलांवर होतं आणि माझ्याकडे गाडी नव्हती. टी टाईम मध्ये मी लिटरली फ्रस्ट्रेट होत असे. मी तिकडच्या एक गोऱ्याला मस्करीत म्हटलही होत की कसला देश आहे तुमचा, साधी चहा मिळत नाही इथे. त्या माणसाने देसी स्टोर शोधून माझ्या वाढदिवसाला रेड लेबल चहाचा मोठा पॅक आणून दिला होता. माझ्या मते ते आजवरचं सर्वात बेस्ट बर्थ डे गिफ्ट आहे.

कॅनडाच्या ट्रिपमुळे माझं चहाचं प्रमाण ४-५ कप वर आलं होतं, पण चहा पिणं मला अतिशय आवडू लागलं होतं. कोणीही दिवसाच्या कुठल्याही वेळेला चहाचं आमंत्रण दिलं तर मी ते आनंदाने स्वीकारत होतो. माझ्या बायकोने जेव्हा ती माझी गर्ल्फ्रेंड होती तेव्हा विचारलं होतं कि तुझ्या आयुष्याच्या प्रायोरिटिज काय आहेत. मी म्हटलं की चहा, बाईक, फोटोग्राफी फ्रेंड्स/फॅमिली आणि काम.
"मग माझा नंबर कुठे लागतो" - आमच्या (तेव्हा नसलेल्या) सौ.
मी म्हटलं, " बाईक नंतर... "
नंतर काय झालं ते तुम्ही ओळखलं असेलच :) आमच्या घरात किचनमधली मी उचललेली एकमेव जबाबदारी म्हणजे चहा बनवणं :) सध्या चहाचं प्रमाण दिवसाला २-३ कपांवर आलय, पण आजही चहा माझा जीव की प्राण आहे आणि कोणी ऑफर केला तर मी आजही नाही म्हणत नाही. कुठल्याही लॉन्ग ड्राईव्ह ची मजा टपरीवर चहा प्याल्याशिवाय येत नाही, पण दुर्दैवाने इकडे चहाच्या टपऱ्याच नाहीत. त्यामुळे दिड आठवडा मी चहासाठी वखवखलेला होतो (वखवखलेला शब्द प्रयोग चालेल ना?) कोणी सांगितलं असतं की याचा खून कर मी तुला चहा देतो तर मी खूनही केला असता (भावना लक्षात घ्या, मी काही खून वगैरे करणार नाहीय:)). त्यामुळे दिड आठवड्यानंतर आल्यावर घरात पहिली गोष्ट कोणती झाली असेल तर ती म्हणजे चहा टाकणं, आणि हो, हा चहा माझ्या बायकोनं टाकला होता :)

Wednesday, September 2, 2009

साक्षरता निर्मूलन

दिड आठवड्याच्या मस्तपैकी सुटटीमुळे काही पोस्ट करता आलं नव्हतं, त्यामुळे क्षमस्व ( वाचक माझ्या पोस्ट्स ची आतुरतेने वाट बघतात अशातला काही भाग नाहीय, पण असं लिहिलं कि स्वत:लाच कसं बरं बरं वाटतं :) ). टॉपिक वर जास्त लक्ष देऊ नका. कळेलच का दिलाय असला उरफाटा टॉपिक :)

काही दिवसांपूर्वी ’आयुष्यावर बोलू काही’ च्या ५०० व्या प्रयोगात ’निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटातील एक गाणं सादर करण्यात आलं होतं. apalimarathi.com वर हा चित्रपट पाहण्याचा योग आला. सरकारतर्फे तीन वर्षे गावा गावांत राबवण्यात आलेला प्रौढ साक्षरता कार्यक्रम आणि त्यासाठी हक्काच्या दावणीला बांधलेल्या गुरांची अर्थात शिक्षकांची होणारी ससेहोलपट या बद्द्ल हा चित्रपट आहे. निरक्षर शोधणे, सकाळ दुपार मुलांची शाळा चालवून रात्री ८ ते १० मोबदला न घेता हे साक्षरतेचे वर्ग घेणे या सर्व जबाबदाऱ्या शिक्षकांवरच टाकण्यात आलेल्या असतात. तीन वर्षांत एकही निरक्षराला साक्षर न करता आल्यामुळे बहिर्मुल्यमापनावेळी (स्पेलिंग बरोबर आहे ना) ते शिक्षक आणि गावकरी कशी वेळ मारुन नेतात याचं विनोदी ढंगाने चित्रण करण्यात आलय. काही अपवाद वगळता हा चित्रपट एकदा बघणेबल झालाय.

या लेखाचा हेतू चित्रपट परिक्षण हा नसून त्या निमित्त तशाच जुन्या आठवणी चाळवणे हा आहे. मी बहुतेक पाचवीला असताना आमच्या शाळेतर्फेसुद्धा साक्षरता अभियान राबवण्यात आले होते. पाचवीला पुजल्याप्रमाणे सरकारने शाळांना, शाळेंनी शिक्षकांना आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या कामाला जुंपले होते. या अभियानासाठी माझ्यासारख्या हुशार मुलांची निवड करण्यात आली होती. साक्षरता अभियानाचे निरक्षरता निर्मुलन हे ध्येय होते. या बाबतीत माझा नेमका घोळ व्हायचा. कुठले तरी शिक्षणमंत्री या अभियानाचे इन्स्पेक्टर म्हणून आले असताना आमच्या मुख्याध्यापकांनी लंबे चौडे भाषण ठोकुन भाषणाच्या मधेच विचारले होते,
" तर सांग पाताडे, आपण कुठलं अभियान करतोय आणि त्याचं ध्येय काय?"
" निरक्षरता अभियान अन त्याचे साक्षरता निर्मुलन हे ध्येय.." - द ग्रेट पाताडे उत्तरले.
नशिबाने त्या अभियानाचे धोरण बदलण्याचा मला प्रसाद खावा लागला नव्ह्ता. आता या साक्षरता अभियानासाठी निरक्षर शोधणं हा मोठा प्रॉब्लेम होता. म्हमै सारख्या शहरात निरक्षर आणायचे कुठून? तरी नशीबाने माझ्या मित्राची आजी निरक्षर होती. व्हय नाय करत म्हातारी एकदाची शिकायला तयार झाली होती. एक आठवडा घातल्यानंतर म्हातारीला अ लिहायला येवू लागला. माझे शिकवण्याचे आणि म्हातारीचे शिकण्याचे patience संपले होते. शाळेतर्फे बऱ्याच दिवसात या बद्दल न विचारल्याने एका दिवशी माझं शिकवणं आणि म्हातारीचं शिकणं थांबलं. त्यानंतर काहीच झालं नाही.

आज जेव्हा विचार करतो, तेव्हा असं वाटत की काय मिळवलं सरकारनं कर भरणाऱ्या लोकांचा पैसा असा उधळून? काय फायदा होणार होता ह्या म्हाताऱ्यांना शिकवून ? कुठे नोकरी धंदा करणार होते? कुठलाही मोबदला न देता शिक्षकांना या कामाला जुंपणं कितपत योग्य? हे अभियान संमत करण्याअगोदर तेव्ढ्या बजेट मध्ये किती गरजू विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं असतं याचा कुणीच विचार केला नव्ह्ता? मुंबईत किती साक्षर झाले ते माहित नाही पण एके दिवशी बातमी आली कि सिंधुदुर्ग जिल्हा १०० % साक्षर झाला म्हणून. ही गोष्ट साधारण १९८७ मधील असेल. आजही मी कमीत कमी १००० स्थलांतर न केलेले निरक्षर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखवू शकतो. त्यावरून अजून एक आठवलं. दोन तीन दिवसापूर्वी सकाळ मध्ये एक news प्रसिद्ध झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नववीतल्या १४७१६ मुलांना मोफत लॅपटॉप वाटण्यात येणार आहेत म्हणून. अरे काय चालवलय काय? काय करणार आहेत नववीची मुलं लॅपटॉप घेऊन? आणि फक्त नववीचीच का? दहावी अकरावीची का नाहीत? किंवा जी मुले पदवीधर होऊन नोकर्‍या शोधायला बाहेर पडतील ती का नाहीत? संगणक प्रशिक्षणच द्यायचे असेल तर तेवढ्या लॅपटॉपच्या किमतीत नवीन किंवा जुने डेस्कटॉप घेऊन पुर्ण सिंधुदुर्ग जिल्हा संगणक साक्षर करता आला असता. ज्याने हा प्रकल्प मंजूर केला त्याला माझ्या मते लॅपटॉप आणि डेस्कटॉप यातला फरकही कळत नसणार. ज्याची लायकी नाही ती माणसे पदावर बसतात. खेळाडू नसलेले क्रिडामंत्री काय होतात, अंगठेबहाद्दर शिक्षणमंत्री काय होतात, कशाला कशाचाच मेळ नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं कि यांना आपणच निवडून देतो. ऑप्शन्सच नसतील तर आपण तरी काय करणार म्हणा. नो वंडर तरुण पीढी निवडणुकांवर बहिष्कार टाकते.

चला लेख कुठेतरी भरकटत चाललाय. लेखाला सुरूवात केली तेव्हा आता जे उतरलय पोस्ट मध्ये ते सांगायचे नव्हते आणि नक्की काय सांगायचे आहे ते नेमके आता सुचत नाहीय. पब्लिश करणार नव्हतो, पण कि बोर्ड वर दिड तास टकटकाट केलाय म्हणून पब्लिश करतोय. क्रुपया गोड मानून घ्या.

Wednesday, August 19, 2009

मराठवाडा के शोले

रामगढ्ला राम राम ठोकून गब्बरने आपले बस्तान मराठवाड्यात हलवले. रामगढमध्ये लुटण्यासारखे काही शिल्लक राहिले नव्हते. त्याच्यापाठोपाठ ठाकुर सुद्धा जय वीरु आणि रामुकाका यांच्यासहित मराठवाडयात आले. गब्बरला पकड्ण्याच्या प्रोजेक्ट ची कॉस्ट वाढतच चालली होती. त्यामुळे खरं तर ते रामुकाकांना आणणार नव्ह्ते, पण जय आणि वीरु ने त्यांच्या गब्बरला पकडण्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी शिवाय इतर कामे करण्यास नकार दिला होता. रामुकाकांशिवाय ठाकुर साहेबांचे सकाळचे महत्वाचे काम अडले असते, त्यामुळे त्यांना झक मारत रामुकाकांना आणावे लागले होते.

असेच एका सकाळी ठाकुरसाहेब घरात शिरले. मागोमाग रामुकाकाही आले. रामुकाका तडक न्हाणीघरात गेले आणि चुलीची राख हाताला लावून हात खसाखसा धुतले. रामगढला कमीत कमी नदीला पाणी तरी भरपूर असायचे पण इकडे मराठवाडयात पाण्याचा दुष्काळ, त्यामुळे रामुकाकांचे अजुनच हाल होत.

"अजून किती दिवस हेच काम करावे लागणार आहे कुणास ठावूक. यापेक्षा उचलत का नाहीस रे देवा? मला नाही त्या ठाकुरला..." रोज हात धुताना रामुकाकांच्या मनात हेच विचार येत.

" काय रे जय, प्रोजेक्ट्चं स्टेटस काय आहे? आणि तो वीरु कुठे भटकतोय काम सोडुन? " प्रोजेक्ट मॅनेजर ठाकुरांनी मॉड्युल लिड जय ला विचारले.
जय आपला बाजा वाजवण्यात मग्न होता. प्रोजेक्ट्ची कॉस्ट वाचवण्यासाठी ठाकुरसाहेबांनी राधेला रामगढलाच ठेवले होते. त्यामुळे त्याचं कामात लक्षच लागत नव्हतं. तरी सुद्धा काही तरी स्टेटस द्यायचं म्हणून तो उत्तरला.
" नवीन एके-४७ प्लस प्लस ऑर्डर केलीय. येइल दुपारपर्यंत. " - जय
" सी प्लस प्लस ऐकली होती. ही एके-४७ प्लस प्लस काय भानगड आहे?" - ठाकुरसाहेब
" ही फ़ुल्ली ऑटोमॅटिक आहे. तिच्याबरोबर एक रिमोट सुद्धा येतो. रायफ़ल एक जागेवर सेट केली कि ती रिमोट ने कंट्रोल करता येते. मग हात न लावता सगळी कामे ऑटोमॅटिकली होतात" - जय

हात न लावता सगळी कामे ऑटोमॅटिकली होतात हे ऐकुन रामुकाकाच्या मनात विचार डोकावला , ’सकाळी ठाकुरसाहेबांच्या नेहमीच्या जागेवर हिला सेट केलं तर?....’ पण तो विचार मनातच राहिला, कारण ती रायफ़ल 'त्या' कामासाठी बनली नव्हती.

" फ़क्त एक प्रॉब्लेम आहे ठाकुरसाहेब ..."
प्रॉब्लेमचे नाव ऐकताच सगळ्या प्रोजेक्ट मॅनेजर प्रमाणे ठाकुरसाहेबांच्या कपाळावरही आठया पडल्या.
" आता कसला प्रॉब्लेम आहे" - ठाकुरसाहेब
" त्या रायफ़लची काडतूसे अजून महाराष्ट्रात रिलिज झालेली नाहीत "
" अरे मग बाहेरून मागवा ना " - ठाकुरसाहेब
" हो पण त्यामुळे प्रोजेक्ट ची कॉस्ट अजुन वाढेल"
ते ऐकून ठाकुरचा चेहराच पडला. घरची शेतं अगोदरच विकून झाली होती. आता विकण्यासारखं अजुन काही शिल्लक राहिलं नव्ह्तं. चार घरची धुणी-भांडी करावीत तर हात नसल्याने तेही शक्य नव्ह्तं.

" मग आता?" - ठाकुरसाहेब
" तिची पायरेटेड काडतूसे मिळतायत असं ऐकलं होतं. त्याच्याबद्दल माहिती काढायला मी वीरुला पाठवलय. ती जर का मिळाली तर आपला काड्तुसांचा खर्च निम्म्याने कमी होईल आणि प्रोजेक्ट ची कॉस्ट अजुन कमी होईल." - जय

प्रोजेक्ट कॉस्ट कमी करण्याचा विचार करणार डेवलपर ठेवल्याचा योग्य निर्णय घेतल्याबद्दल ठाकुरसाहेबांनी मनातल्या मनात आपल्या नसलेल्या हातांनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली आणि अप्रेजल मध्ये जय ला चांगली रेटिंग द्यायचं पक्क केलं.

" आज काडतुसं मिळाली तर रात्री ’मेह्बूबा मेह्बूबा’ गाणं चालू असताना वीरु रायफ़ल सेट करेल आणि मग आपण कधीही गब्बरला उडवू शकू " - जय
"त्या नाचगाण्याचा खर्च कोण करणार आहे? ", ठाकुरांनी काळजीच्या सुरात विचारलं.
" तो खर्च गब्बर करणार आहे " - जय

हे ऐकताच ठाकुरचा जीव भांड्यात पडला. प्रोजेक्ट कॉस्ट अजून वाढणार नाही हा विचार करुन त्यांना बरं वाटलं.

" ही एके-४७ प्लस प्लस बाळगल्याबद्दल काही केस तर होणार नाही ना? असं ऐकलय की ती फ़क्त कसाबसारखे अतिरेकी वापरतात म्हणे" - ठाकुर
" काही काळजी करु नका. संजय दत्त ने काही वर्षांपूर्वी हिचं अगोदरचं वर्जन बाळगलं होतं. तो केस होवून सुद्धा जामीनावर सहीसलामत बाहेर आहे. मान्यता नसताना लग्न काय करतोय, सिनेमे काय करतोय, निवडणुका काय लढवतोय, काय नी काय. त्याच्या जामीनावर तो मरेपर्यंत काही ऍक्शन घेतली जाईल असं दिसत नाहीयं. " - जय

आपल्या डेवलपरने सगळ्या बाजुंनी विचार करुन डेवलपमेंट केलीय हे बघून ठाकूरसाहेबांना आनंदाचं भरतं आलं.

"बल्ले बल्ले, ओ शावा शावा...बल्ले बल्ले, ओ शावा शावा..."
कोण बेसुरं गातय हे बघायला सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या. पाहतात तो वीरु दोन्ही हात वर करून भांगडा करत येत होता.

"ऐसी खबर लाया हूँ के दंग रह जाओगे.." -वीरू
"काय झालं?"-ठाकुर
"वो पार्टी आधे रेट पे काडतूस देने के लिये राजी हो गयी है, बोलो है ना भांगडा करने वाली खबर. ये जय तो भांगडा नही करेगा. रामूकाका और ठाकुरसाहब, आप दोनो हात उठाके मेरे साथ भांगडा करो" - वीरु

ठाकुरसाहेबांनी रागाने वीरु कडे पाहिलं. वीरुच्या पैलवानी डोक्यात काही प्रकाश पडेना के ठाकुर असे रागाने का बघतायतं

"क्या हुआ ठाकुरसाहब, मुझे लगा आप खुश होवोगे, शबाशी दोगे..." - वीरु

त्याला समजवायच्या फ़ंदात न पडता ठाकूर त्याच्यावर गरजले.
" हे काय मघापासून हिंदीत बोलतोयस? तू आता महाराष्ट्रात आहेस. मराठीत बोल. मनसे वाल्यांनी ऐकलं तर तुझी मनापासून धुलाई करतील."
" हो, त्यादिवशी त्या असत्यम सॉफ़्ट्वेअर मध्ये एक इंजिनीअर अमेरिकेच्या क्लाईंट बरोबर इंग्लिश्मध्ये बोलला तर त्याला धुतला होता" - जय
" अरे पण मी मराठी शीक रहा हूँ. ठाकुर तुमची पोस्टींग महाराष्ट्र मे होती २ साल इसलिये तुमको मराठी येते " - वीरू
" गंगा किनारे का छोरा असून मी नाही शिकलो २ महिन्यात ?" - जय

त्यांचं संभाषण चालू असतानाच अचानक गोळीबार सुरू झाल्याचा आवाज आला. गब्बरची माणसं गोळीबार करत होते. त्या गोळीबाराने घराच्या सगळ्या काचा फुटल्या. नशीबाने त्यांच्यापैकी कुणाला गोळी लागली नव्हती. नाही म्हणायला जयच्या दंडावर गोळी लागली होती, पण तिथे त्याचा दीवार मधला ७८६ नंबरचा बिल्ला होता. दीवारच्या शूटींग नंतर तो न परत केल्याबद्दल त्याला आज फार बरे वाटत होते. गोळीबार करून ते डाकू निघून गेले.

" अरे, ये गोळ्या तो एके ५७ प्लस प्लस च्या है" वीरु पडलेल्या पुंगळ्यांकडे बोट दाखवत म्हणाला"
" पण एके ५७ प्लस प्लस तर अजुन मार्केट मध्ये लाँच झाली नाहीय. मग गब्बरकडे कशा आल्या?" - जय

त्या बिचाऱ्यांना कुठे माहित होतं की गब्बर त्या रायफ़ल कंपनीचा बीटा कस्टमर आहे ते.

" अब आपल्याला एके-१२० रायफ़ल आणने पडेंगे" - वीरु
" हो आणि त्यामुळे प्रोजेक्ट कॉस्ट वाढणार" - जय

ठाकूरसाहेब तेव्हापासून ही ऍडिशनल कॉस्ट कशी कवर करावी याचा विचार करताहेत. मराठवाड्यातल्या कुठल्यातरी कुंभाराकडे चिखल तुडवण्याचा जॉब करणे आणि कॉस्ट कटिंग साठी रामुकाकाला परत पाठवून रोज सकाळी 'तसच' राहणे हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे होते ......

Friday, August 14, 2009

कुणी निंदा कुणी वंदा आमचा ब्लॉग लिहीण्याचा धंदा

रविवारचा दिवस. म्हणजे बेड पे लोळने का वार. भल्या पहाटे साडे दहा वाजता आळोखे पिळोखे देत उठलो. मनाशीच म्हटल, चला, ब्लॉगवर काही तरी एकदम धांसू लिहु की कमीत कमी 7-8 कॉमेंट्स तरी आले पाहिजेत. तोच एक आवाज आला,
"गप्प बस रे मुर्खा.."
दचकून इकडे तिकडे पाहिल तर कुणीच नव्हत. बायको सकाळीच बाजारात भाजी आणायला गेली होती. जरी ती जगातल्या सर्व बायकांप्रमाणे स्वत:च्या नवर्‍याला मूर्ख समजत असली तरी इतक्या उघडपणे माझ्यावर खेकसणार नाही याबद्दल मला खात्री होती.
" इकडे तिकडे काय बघतोयस मूर्खासारखा??"
च्यामारी पुन्हा मूर्ख? सकाळी सकाळी इज्जतचा भाजीपाला?? आता काहीतरी केलच पाहिजे.
" च्या मारी, कोन हाय थित? कवादरना मूर्ख बोलून र्‍हायलाय"..
जोर दाखवायचा असेल तर मी अस अधून मधून ग्रामीण मराठीत बोलतो. पुणेरी मराठीतून शालजोड्यातला ठेवून देता येत, पण जोर हवा तर रांगडी ग्रामीण मराठीच उपयोगाला येते. त्यात एक दोन फुल्यावाले शब्द असतील तर अजुनच जोर चढतो.
"गप्प बस.... कसला विचार करतोयस सकाळी उठल्या उठल्या... मूर्खासारखा..."
आयला, याला कस कळल की मी विचार करतोय ते? नीट आठवल तर आवाज माझ्या आवाजासारखाच होता. अंतरात्म्याचा आवाज अंतरात्म्याचा आवाज म्हणतात तो हाच की काय? इथे आवाज तर येत होता पण हिंदी सिनेमात जसे आरशात दुसर रूप दाखवतात तसे दुसरे रूप काही इथे दिसत नव्हते. म्हटल आरशात जाऊन पहावे मग दिसेल दुसरे रूप.
"काही गरज नाहीय आरशात जाऊन पाहायची..."
आता तर 100% confirmed की हा माझ्या अंतरात्म्याचाच आवाज. म्हटल आलाच आहे आतला आत्मा बाहेर तर साधावा संवाद त्याच्याशी.
" काय रे बाबा? माझाच आतला आवाज असून मलाच मूर्ख का म्हणतोयस?"
" नाहीतर काय? कसला विचार करत होतास सकाळी उठल्या उठल्या?"
" कसला म्हणजे? ब्लॉगवर काहीतरी पोस्ट करायचा"
" आणि?...."
" आणि काय?..."
" 7-8 कॉमेंट्स चा विचार नव्हतास करत?"
" हम्म्म्म.... मग त्यात काय चुकल?"
" काय चुकल? म्हणजे तू फळाची अपेक्षा ठेवून कर्म करतोयस....."
" मग.. कॉमेंट्स ची अपेक्षा केली तर काय फरक पडतो? कॉमेंट्स आल्याशिवाय कळणार कस की मी चांगला लिहितो की वाईट ते? बाकीची लोक कॉमेंट्स नाही आली की आपल्या प्रोफाइल मध्ये लिहितात की मी हा ब्लॉग कॉमेंट्स साठी लिहतच नाहीय मुळी. आपल्याला बाबा नाही जमणार ते... गायकाला कसा फीडबॅक टाळ्यांनी मिळतो तसा ब्लॉग लेखकाला कॉमेंट्सनी मिळतो. मग कॉमेंट्स नको यायला?"
" तुझ्या लेखनाला लोकांनी का म्हणून कॉमेंट्स द्याव्यात? अस आहे तरी काय तुझ्या लेखनात..?"
" का म्हणजे?"... आता मला काही सुचेनास झाल. तरीही मी आपल घोड पुढे दामटवले
" का म्हणजे?... इतक्या वेगवेगळ्या विषयांवर इतक सर्वांगसुंदर, सुलभ लेखन. अगदी इंग्लीश मीडियम मधले लोक सुद्धा वाचून खुश होतात. थेट हृदयाला भिडणार लेखन आणि ते ही मोफत... माझ लेखन म्हणजे..... "
माझ बोलण अर्धवट तोडत माझा आतला आवाज खो खो करून हसायला लागला. मी एकदम फर्स्ट क्लास आणि रुचकर जेवण बनवू शकतो अस जेव्हा जेव्हा म्हणतो तेव्हा तेव्हा माझी बायकोही असच खो खो करून हसते. आपल हस दाबत तो म्हणाला.
" अस? मग तुझ्या प्रत्येक पोस्ट च्या 'बंद करा' बॉक्स वर कोण का क्लिक करत आहे"
आईई ग्ग्ग्ग.. एकदम माझ्या दुखर्‍या नसेवर त्याने हात ठेवला.मी ब्लॉग प्रसिद्ध केल्यापासून ते आजतागायत, माझ्या प्रत्येक पोस्टवर कोणीतरी 'बंद करा' च्या बॉक्स वर क्लिक करतोय. मी समजू शकतो जर मराठी मीडियम आणि रावसाहेबसारख्या पोस्ट ने त्याच्या/तिच्या भावना दुखावल्या असतील पण अगदी मी माझ्या कोकणातल्या दिवसावर पोस्ट टाकली त्यावर सुद्धा 'बंद करा' म्हणून क्लिक केल गेलय. मला समजत नाहीय की तो बंद का करावा हे कॉमेंट टाकून का सांगत नाहीय ते.
" का ते मला माहीत नाही. जो पर्यंत तो वा ती व्यवस्थित कॉमेंट लिहत नाही तो पर्यंत मी त्याकडे दुर्लक्षच करणार"
" एक सल्ला देऊ? "
" फुकटचे सल्ले देणार्‍या शतमुर्खा... मगितलाय कोणी तुझा सल्ला? ठेव तुझ्याजवळच" - मी मनातल्या मनात.
" तुला नकोय तरी हा शतमूर्ख तुला सल्ला देणार आहे"
अरेच्चा विसरलोच होतो की याला माझ्या मनात विचार केलेल समजत ते.
" सल्ला असा आहे की कॉमेंट्स ची अपेक्षा करून लिहण्यापेक्षा लिहिण बंद कर"
घ्या. देऊन देऊन काय सल्ला दिला तर म्हणे कॉमेंट्स ची अपेक्षा करून नका.
"नकोय मला तुझा सल्ला. ठेव तुझ्यापाशीच"
" अरे माझ म्हणणे पूर्ण ऐकून तर घे. कॉमेंट्स ची अपेक्षा ठेवून लिहु नकोस. लिखाणातील मजा अनुभवण्यासाठी लिहीत जा. मनातली तगमग व्यक्त करण्यासाठी लिहीत जा. कॉमेंट्स चा विचार करून लिहिलेली पोस्ट्स नंतर वाचल्यावर तुला तरी त्यावर कॉमेंट्स द्यावसा वाटतो का?"
"खरय. नंतर मी माझी पोस्ट्स जेव्हा वाचतो तेव्हा पहिला विचार येतो की शी काय लिहिलायस हे?"
" म्हणूनच म्हणतो की लिखाणाची मजा अनुभव. ती नक्कीच तुझ्या लिखाणात उतरेल आणि लोकांना ती नक्कीच आवडतील. त्यांना आवडली की कॉमेंट्स नक्कीच टाकतील. त्या अनिकेत, महेन्द्र, अपर्णा चे ब्लॉग्स बघ. वाचल्यावर वाटत ना कॉमेंट्स द्याविशी? "
हम्म्म्म. त्याच बोलण तर पटल. आत्ता यापुढे कॉमेंट्स साठी लिहिण बंद. एन्जॉय करत लिहायच. चांगला लेख झाला तर 'बंद करा' म्हणणारा सुद्दा बंद करा म्हणणार नाही.
" काही विषय सुचतोय का? " मी विचारात असतानाच माझ्या आतल्या आत्म्याचा आवाज आला
" अ नाही. कंपनी मधल्या गमती जमतीवर लिहु का?"
" अरे त्या सॉफ्टवेर मधली लोक सोडली तर कोणाला कळणार आहेत का?"
" मग माझ्या लग्नाची गोष्ट लिहु ?"
" का तुझ लग्न म्हणजे काय ऐश्वर्या अभिषेकच लग्न आहे का?"
" अरे म्हणून काय झाल? बर तूच सुचव काही विषय"
" "
" अरे सुचव ना, मी सुचवलेल्या सगळ्या विषयांवर काट मारलीस"
" "
" अरे आत्ता गप्प का? बोल ना काही तरी"
" "
माझा आतला आवाज एकदम बंद का झाला म्हणून मागे पाहील तर बायको उभी होती. आररेच्चा, ही बाजारातून आल्याच मला कळल कस नाही?

तिच्या चेहरा म्हणत होता, " माझा नवरा अस स्वत:शीच काय बडबडतोय........ मूर्खासारखा"

Thursday, August 13, 2009

24 तास पाण्याचा अपव्यय


24 तास पाण्याचा अपव्यय. म्हणजे महिन्याला अन् त्यानंतर वर्षाला किती पाणी वाया जाईल याचा हिशेबच नाही. :) चला विषयावर जाऊ नका :) ऑफीस मधून घरी परत येत असताना ही गाडी समोर दिसली. कॅमरा बरोबर नव्हता म्हणून गाडी चालवता चालवता मोबाइल फोन वर हा फोटो काढलाय. ते म्हणतायात की ते जगातले सर्वात अनुभवी क्लीनर्स आहेत म्हणून (नीट वाचा बारीक अक्षरात लिहिलेल ). बहुतेक कारपेट वगैरे क्लीन करताना ते 24 तास पाण्याचा अपव्यय करत असावेत :) बिचार्‍या लोकांना कल्पनाही नाहीय की जाहिरातीत काही तरी चूक झालीय म्हणून. :)

Monday, August 10, 2009

आम्ही सगळे रावसाहेब...

पु. ल. चे रावसाहेब आणि आम्ही समोरच्याला वाक्यागणिक किमान एक 'मधुर' शब्द या हिशेबाने त्या 'मधुर' रसात चिंब करण्याबाबत प्रसिद्ध आहोत. तसा हा गुण आम्हास अगदी शालेय जीवनात लाभला होता, परंतु त्याचा सढळ मुखे वापर कॉलेज जीवनात आणि व्यावसायिक जीवनात जास्त झाला. इतका की जर का त्या विषयावर पी. एच. डी. करायची झाली तर आम्ही सगळे कसलाही अभ्यास न करता A++++++ ग्रेड ने पास होऊ. आम्ही सगळे म्हणजे एका माळेचे मणी असलेले आमचे मित्रगण. थोडक्यात आमचे बोलणे म्हणजे 'birds of the same beak चिवचिवाट together' असे असते. त्या चिवचिवाटात किती मधुर शब्द असतील याची कल्पनाच केलेली बरी.

आमचा पी.एच. डी. चा अभ्यास सांगतो की हिंदी आणि मराठी या भाषेतील मधुर शब्दांमध्ये जितकी ताकद आहे तितकी इंग्रजी भाषेतील मधुर शब्दांमध्ये नाही. त्यामुळे अगदी इंगजाळलेल्या माणसालाही मारामारी करताना वा भांडण करताना मराठी किंवा हिंदितल्या मधुर शब्दांचा आधार घ्यावा लागतो :)आमचा अभ्यास असेही सांगतो की दहा हजारात एखादाच असा दांडेकर असतो जो आपल्या दैनंदीन जीवनात 'मधुर' शब्दांचा वापर करत नसतो (आणि भारतातल्या जवळपास प्रत्येक मातेला आणि प्रत्येक बायकोला अनुक्रमे तो आपला पुत्र आणि आपला पती आहे असे वाटत असते).
ज्यांस माहिती नाही अशांसाठी, दांडेकर = पुरूष वर्ग, होळकर = स्त्री वर्ग. ज्या लोकांना अजूनही याचे detailed explanation हवे आहे ते लोक हा लेख वाचायच्या लायकीचे नाहीत, त्यांनी पुढे न वाचणेच चांगले. खरतर आमच्या माहितीप्रमाणे बर्‍याच मुली सुद्धा मधुर शब्द वापरतात. त्यावर एक विनोद आहे. एक मुलगी दुसर्‍या मुलीला विचारते
" काय ग ही मुले फक्त मुलांच्या घोळक्यात असतात तेव्हा काय बोलत असतील ग ?"
"काय म्हणजे? आपण जेव्हा मुलींच्या घोळक्यात असताना बोलतो तेच "
" शी.. मुले पण इतकी घाण घाण बोलतात??" :)

आमच्या कॉलेज मध्ये पवन नावाचा एक मित्र होता. आमच्यापैकी बरेच जण मधुर शब्द वापरताना आजूबाजूला एकाच चोचेचे पक्षी (birds of the same beak... remember??) असल्याची खात्री करून घेत. पवन महाशय मात्र याला अपवाद होते. रावसाहेबांना ज्या प्रमाणे आपण कोणासमोर बोलतो आहोत याचे भान नसायचे त्याच प्रमाणे हे महाशय सुद्धा मुलींसमोर आपली अमृतवाणी व्यक्त करायचे. आमच्या कॉलेजची एकदा माथेरानला पिकनिक गेली होती आणि पवन आमचा खजीनदार होता. पिकनिक वरुन परत आल्यावर हा एका ऑफ पीरियड ला शेवटच्या बाकावर बसून हिशेब करत होता आणि मी पहिल्या बाकावर बसलो होतो (फक्त ऑफ पीरियडलाच मी पहिल्या बाकवर बसायचे धाडस करू शके). पवनला हिशेब काही केल्या लागेना. त्याने शेवटच्या बाकावरून आरोळी ठोकली,
"ए प्रवीण उधर क्या XX मरवा रहा है. इधर आके मेरेको हेल्प कर. इस माथेरान के खर्चे से तो मेरे XX मुह मे आ गये है..."
संपूर्ण क्लास ची काय अवस्था झाली असेल त्याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल.

बंगलोरला असताना एका बंगल्यात आम्ही मुंबईची 7 आणि दिल्लीची 3 असे 10 जण एकत्र रहात असु. दिल्लीची 3 जण जास्त शिव्यांचा वापर करत नसत. या उलट सी प्रोग्रँमिंग मध्ये जसा प्रत्येक स्टेट्मेंट शेवटी एक सेमिकोलन वापरतात त्याप्रमाणे मुंबईचे 7 जण प्रत्येक वाक्याच्या शेवटी एक शिवी वापरत. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. दिल्लीच्या शेजारी मुंबईला बांधल्याने त्याना वाण नाही पण आमचा गुण लागलाच :) त्या तिघांपैकी सुदर्शन सुट्टीवर आपल्या घरी गेला होता. घरच्यांसोबत कुठली तरी क्रिकेटची मॅच पाहत होता. एका टेन्स्ड मोमेंटला कुणाची तरी विकेट पडली आणि हे महाराज चित्कारले ... " भेXXXX......" आई वडील आणि बहीण आ वासून त्याच्याकडे बघायला लागले होते, पण कोणी काही बोलले नाही. कमावत्या पोराला कोण काय बोलणार म्हणा :)

ग्रूप मधल्या मुलींसमोर आम्हाला एकमेकांना शिव्या देण्याची उर्मी आली तरी देता येत नसत. यावर तोडगा म्हणून आम्ही त्यांच्या समोर फक्त buffer buffer असे म्हणत असू :) पण आमच्या पैकी शफी आणि माझा buffer लवकर फुल्ल व्हायचा आणि मुलींसमोर कधी कधी 'overflow' व्हायचा.:)

आमच्यापैकी समीर कडे कायनेटिक होंडा होती. ती आम्हा सर्वांची सार्वजनिक मालमत्ता होती. गाडीत आपल्या प्रवासाला लागेल त्यापेक्षा थोडे जास्त पेट्रोल भरून वापरली तर समीर ही खुश राहत असे. बंगलोर मध्ये रिक्षाला पैसे घालण्यापेक्षा ते परवडायचे. कारण बंगलोर मध्ये कधीही रिक्षा करायची झाली तर, " वन अँड हाल्फ मीटर होना..." यानेच सुरूवात असायची. एका संध्याकाळी नारायणला स्कूटर न्यायची होती तर त्याच रात्री समीरला लिडो थियेटर मध्ये नऊच्या शो ला जायचे होते. नारायणने आठ पर्यंत परत येण्याचे आश्वासन देऊन स्कूटर घेऊन गेला. आठ वाजून गेले तरी नारायणाचा पत्ता नव्हता.
समीरला त्या दिवशी तो चित्रपट बघायचाच होता. सव्वा आठ, साडे आठ झाले तसा समीरचा पारा चढू लागला होता. पावणे नऊ झाले तरी नारायण आला नव्हता. समीर ने त्याच्या सात पिढ्यांचा उद्धार तोवर केला होता. आम्ही समीरला सांगत होतो की सगळ्या शिव्या buffer करून नारायण आल्यावर एकदम दे :) रोज साधारण पावणे नऊ -नऊच्या सुमारास एक सरदारजी आमचे डिनर चे डबे घेऊन येई. त्या सरदारजीकडे पण कायनेटिक होती. साधारण पावणे नऊला तो सरदार आपल्या कायनेटिक वरुन डबे घेऊन आला. पोर्च मध्ये कायनेटिक चा आवाज आल्यावर समीरला वाटले की नारायणच आलाय म्हणून. दरवाजा उघडाच होता. सरदार दरवाजात पोचताच नारायण समजून समीरच्या तोंडून फुले बाहेर पडली
" भाग भोXXX"...
त्या बिचार्‍या सरदारला कल्पना नव्हती की आपले स्वागत आज अशा पद्धतीने होईल म्हणून. त्याला समीर ने सॉरी म्हटल आणि सांगितल की ती फुले त्याच्या साठी नव्हती. तरीही काही तरी बोलायच म्हणून तो सरदार बोलून गेला,
" मुझे लगा की कोई बकवास मूवी देख ली जो इतनी गाली दे रहे हो"
झाल जाता जाता तो सरदार समीरच्या जखमेवर मीठ चोळून गेला. मूवी चुकल्यामूळे नारायण परत आल्यावर त्याच्यावर समीरचा buffer overflow झाला. आगीत तेल ओतायला आमच्यासारखे मित्र तत्पर होतेच :)

वर म्हटल्याप्रमाणे दहा हजारात शिव्या न देणारा एकच असतो आणि तो म्हणजे श्रीनी होता. माझा त्या 7 पैकी एक मित्र कुरियन आणि मी कॅनडा मध्ये असताना हा श्रीनी हैदेराबाद हून कुरियानचा roommate म्हणून नवीनच आला होता. त्याच इंग्रजी यथा तथाच होत. कॅनडात आल्याच्या दुसर्‍याच दिवशी हा कुरियनला न सांगता त्याच्या एका गुल्ट मित्राकडे मुक्कामाला राहिला. एकडे रात्रभर वाट बघून कुरियन हैराण.पोलिसात जायच तर त्या श्रिनि च्या नावाशिवाय आमच्याकडे दुसर काहीच नव्हते. दुसर्‍या दिवशी सकाळी श्रीनी घरी परत येताच कुरियन ची सटकली..
" क्यो बे माXXXX किधर XX मरवाने गया था रात भर??"
हे ऐकताच त्या श्रिनि चे तोंडच उतरले, रडवेल्या सुरात तो कुरियन ला म्हणाला,
"If you want to scold me then scold me, why to bring mother and father in between..."

ते ऐकताच कुरियनला (आणि मला सुद्दा) बहुतेक आयुष्यात पहिल्यांदा त्या शिव्यांच्या ख-या अर्थाची जाणीव झाली. तोवर आम्ही त्या शिव्या खरा अर्थ न घेता एकमेकांना करोडो वेळा तरी दिल्या असतील. मग त्या बिचार्‍या श्री नी ला आम्ही समजावले की त्या शिव्या आमच्या तोंडात बसल्या आहेत पण त्यांचा खरा अर्थ आम्हाला अभिप्रेत नसतो.

तर मित्रहो. चुकुन माझ्या तोंडून तुम्ही मधुर शब्द ऐकलेत (खर तर चुकुन न ऐकण्याचे chances जास्त आहेत), तर लक्षात ठेवा की मजला त्यांचे खरे अर्थ अभिप्रेत नाहीत :)

Saturday, August 8, 2009

तुम्हाला काय वाटते?

भारतीय क्रिकेट खेळाडूंनी वाडा च्या अटीन्वर सही करण्यास मनाई केलीय आणि BCCI त्यांच्या पाठीशी उभी राहिलीय. त्यावरून विश्वभरात वादंग सुरू आहे. संपूर्ण क्रीडा विश्वाने त्या मान्य केल्या असताना हे कोण टिकोजीराव लागून आलेत असा ही सूर लावला जातोय. सानिया मिर्जानेही खिलाडू वृत्तीने त्या क्रिकेटपटुनी मान्य कराव्यात असे सुचवले आहे.

खेळाडूंचा मुख्य विरोध आहे तो आपला विश्रांती दरम्यानचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबत. त्यांचा सामन्या दरम्यान आणि सरवा दरम्यान वाडाच्या उत्तेजक चाचणीला विरोध नाही आहे. मला वाटते ते एक प्रकारे योग्यही आहे. व्यक्‍तिगत स्वातंत्र्यावर गदा आणि सुरक्षितता ही दोन मुख्य कारणे त्यानी दिलीत. काही लोकांचा मुद्दा आहे की जर का क्रिकेट खेळाडूंनी विश्रांती दरम्यान उत्तेजक द्रव्यांचे सेवन केले तर? मुद्दा बरोबर आहे, पण हेही लक्षात घेतल पाहिजे की क्रिकेट खेळाडू वर्षातले कमीत कमी दहा ते अकरा महिने क्रिकेट खेळतात. जर का त्यानी विश्रांती काळात उत्तेजक द्रव्य घेतले असेल तर पुढच्या सरावादरम्यान वा सामन्या दरम्यान घेतलेल्या चाचण्यात ते पकडले जायला हवे.

दुसरा मुद्दा सुरक्षिततेचा. रॉजेर फेडेरर सारख्या खेळाडूने या करावर सही केलीय. काही लोकांचे म्हणणे असे आहे की रॉजर ची सुरक्षा सुरक्षा नाही का? पण खरच तस आहे का? रॉजर त्याच्या देशात कुठल्याही सुरक्षेविना मॉल मध्ये वा सार्वजनिक ठिकाणी फिरू शकतो. इतर देशांच्या क्रिकेट खेळाडूंना त्यांच्या देशातील जनता भारतातील खेळाडूना भारतातील जनता जितका त्रास देते तितका नक्कीच देत नसेल. त्यामुळे भारतातील खेळाडूंना त्यांच्या हक्काचा विश्रान्तीचा काळ एन्जॉय करता आला पाहिजे. संपूर्ण जगाने त्या करारावर सही केली म्हणून क्रिकेटपटुनी सुद्धा केली पाहिजे अशी मागणी करणे चुकीचे आहे.

मला करारातील अटींबद्दल पुरेशी माहिती नाही परंतू वरकरणी तरी क्रिकेटपटुन्चा विरोध मला योग्य वाटतो. तुम्हाला काय वाटते?

Friday, August 7, 2009

खेड्यामधले घर कौलारू -2


जेवताना घरात अनेक पंगती उठत. सर्वात प्रथम लहान मुले (अर्थात नदीवर डुंबायला गेली नसतील तर), नंतर मोठी माणसे आणि सर्वात शेवटी घरातील बायका. पंगती उठत असताना चुलीवर रन टाइम भाकरी भाजणे चालूच असायचे. त्या भाकरी भाजण्याला लष्कराच्या भाकर्‍या भाजणे हा एकाच शब्द प्रयोग योग्य वाटतो. सगळ्यांची जेवणे झाल्यावर तो भांड्यांचा डोंगराएवढा ढीग घासणे पार पडे. कधी कोंबडा, बकरा, डुक्कराचे मटण बनवायचे असेल तर त्यांची कामे अजूनच वाढत. (डुककर हे जंगलातून शिकार करून आणलेले असत, मुंबई उपनगरात गटारात लोळणारे डुककर नव्हेत).

दुपारी मग बायका आणि मोठी माणसे जरा सुस्तावायची आणि आम्ही मात्र पत्ते किंवा गाण्याच्या भेंड्या खेळणे नाहीतर नुसतीच एकमेकांची मस्करी करणे असली कामे करू. मुंबईत वर्षभर राहून सुद्दा एकमेकांची तोंडे कधी दिसत नसत, मग ती कसर या उन्हाळ्याच्या सुट्टीत काढली जाई. संध्याकाळी अजुन एकदा बिनदुधाचा चहा गळ्याखाली उतरवल्यानंतर गुरांना चरायला नेण्याची ड्यूटी असे. गुरांना रानात लावल्यावर आम्ही जांभळे, कैर्‍या, आंबे काढणे असले उद्योग करत असू. गावची मुळे सरसर झाडावर चढून त्या गोष्टी काढायची आणि आम्ही त्या खाली झेलायचो. जांभळे खाऊन जीभ काळी जांभळी करून घ्यायचो. जीभ जास्तीत जास्त जांभळी करण्याची अघोषित स्पर्धाच असे. हे करता करता अंधार कधी पडायचा ते कळायचे नाही. मग गुरेच जवळ येऊन जणू काही 'आता नेवा आमका घराक' म्हणून सांगायची. घरी गुरे नेऊन एक एक करून दावणीला बांधायची आणि त्यांच्या पुढयात त्यांचे डिनर टाकायचे ही पुढची कामे. आमची गुरे कधी मोजली नाहीत. मोजली तर मरतात असा समज होता. पण सहज 30-40 च्या वर असतील.

तोवर दिवे लागणीची वेळ झालेली असे. गावात वीज पुरवठा तसा कागदोपत्री होता. दिवसातले जवळपास 16 तास वीज नसायची. आली तरी ट्यूब पेटायची नाही. पण त्यामुळे काही अडले नाही. भर उन्हाळ्यात गर्द झाडे आणि वाहत्या वार्‍यामुळे कधी उष्मा जाणवला नाही. रात्री तर भर उन्हाळ्यात पांघरूण ओढावे लागे. त्यामुळे घरात चुलीच्या प्रकाशात गप्पा रंगत. जवळपास सर्वजण तिथे असत. कोणी एस टी स्टॅंडवर गेला असला तर पेपर आणी. मुंबईचे पेपर एक दिवस उशिराने मिळत. मग चुलीच्या प्रकाशात त्याचे वाचन होई. नंतर दुपारच्या प्रमाणेच पंगती होऊन सर्वजण जमिनीवर अंग टाकत. गप्पा मारता मारता डोळा कधी लागे ते कळायचेही नाही.

कधीतरी मग जेवणानंतर शिकारीचा बेत ठरायचा. [कृपया हे वाचून पोलिसात वर्दी देऊ नये. आम्ही सांगू की आम्ही नैच केली शिकार म्हणून:)पुढे शिकारीच थोडस वर्णन आहे. कमजोर हृदयाच्या लोकांनी आणि ज्यांना शिकारी विषयी तिटकारा आहे त्यांनी वाचू नये) ]. मग मोठ्या दादाच्या ट्रॅक्स मधे जागा असेल त्याप्रमाणे माणसे ठुसुन भरली जायची. बंदुका सांभाळून ठेवल्या जायच्या आणि आम्ही मग खारेपाटणच्या नजीक असलेल्या जंगलात जायचो. वाघ सिंह नसायचे पण ससे, डुक्करे आणि तत्सम छोटे प्राणी असायचे. जंगलात पोचल्यावर गाडीच्या टपावर दोघे बंदुक घेऊन बसायचे. सशाचे डोळे गाडीच्या प्रकाशामुळे दिपायचे आणि ते मग गाडीसमोरून रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करायचे आणि कधी कधी आम्हाला अलगद मिळायचे. डुक्करे सहज मिळायची नाहीत. ते कानात दडे भरवणारे आवाज करायचे. पण मी असताना काही कधी डुककर मिळाले नाहीत. जर का शिकार झाली तर ती गाडीत टाकून आणली जायची आणि दुसर्‍या दिवशी मग मेजवानी असायची.

गावी बहुतेक लग्ने उन्हाळ्यात होत. सर्वांना असलेल्या सुट्ट्या हे त्यामागचे मूळ कारण होय. लग्नाची वर्‍हाडे ट्रक मधून जात. माझ्या लग्नाला माझे वर्‍हाड सुद्धा ट्रक मधून आले होते. माझ्या सासारच्या मंडळीणने ते बहुदा पहिल्यांदाच लाइव्ह पहिले होते :) जरी ते धोकादायक असले तरी त्यात एक वेगळी मजा होती. लग्न करून परतताना फक्त नवरदेव/ नवरी आणि करवल्या ट्रक च्या कॅबिन मध्ये बसायचे आणि बाकी सगळे मागे. मग तो ट्रक गावपसून थोड्या अलीकडे थांबायचा आणि तिथून वरात वाजत गाजत गावकडे निघायची. बनाठ्या फिरवणे, काठीच्या टोकाना आगी लावून फिरवणे, तोंडात रॉकेल भरून आग काढणे असले चित्तथरारक प्रकार केले जात. मग संपूर्ण गाव लग्नाच्या पंगतीत जेवायचा. गावात लग्न असले तर दुपार संध्याकाळ दोन्ही वेळ. लाउडस्पिकर वरुन 'कृपया जेवल्याशिवाय कोणीही घरी जाऊ नये' अशी अनाउन्स्मेंट केली जायची :) ही गाव जेवणे मात्र मोस्ट्ली गावातील पुरूष बनवत. बर्‍याच दिवसा अगोदर पासून रानातून वडाची पाने खुडुन आणून पत्रावळ्या बनवणे, साखरेच्या पुड्या बांधणे, पताका लावणे असली कामे केली जात. लग्नाच्या दिवशी अंगण शेणाने (हो शेणाने) सारवली जात. खरच मस्त दिसत ती शेणाने सारवलेली अन्गणे. कोणी पाहिली नसतील तर जमल्यास एकदा कोकणात जाऊन जरूर पहा. कसली मजा येई लग्नात. त्या साखरेच्या पुड्या मी किती खाई याचा हिशेबच नसे.

या धामधुमीत मग एक दीड महिना कसा निघून जाई याचा पत्ताच लागत नसे. टीवी नसल्याने काही एक बिघडत नसे. जर का असे भूर्रकन उडून जाणारे दिवस असतील तर टीवी हवाय कोणास. परतीचा प्रवास मात्र कमीत कमी माझ्यासाठी फार depressing असे. परत जाऊच नये असे वाटायचे. परत आल्यावर ते मुंबईतले लहान घर अजुनच लहान वाटायचे. पण जणू काही तो एक दीड महिना वर्षभर तगून राहायची energy देई. आता नोकरीला लागल्यापासून आणि गेली तीन वर्षे अमेरिकेत असल्यामुळे गावी जाणे काही झालेले नाहीय. तसच गावच राहणीमानही थोडे शहराळलय. पण तरीही गावी जायची ओढ ती आहेच. पाहु कधी योग येतो ते :(

Tuesday, August 4, 2009

खेड्यामधले घर कौलारू -1

अनिकेतच्या कोकणातल्या आठवणी वाचल्या माझ्या मनात निद्रिस्त असलेल्या कोकणातल्या आठवणी दाटून आल्या. तसा मी काही कोकणात जन्मलो वा वाढलो नाही पण दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत साधारण महिना दोन महिने आम्हा चाकरमान्यांचे कोकणात वास्तव्य असायचे. मी जन्मल्यापासून ते साधारण माझे ग्रॅजुयेशन संपेपर्यंत यात खंड पडला नाही.

मुंबई गोवा महामार्गावर विजयदूर्गला जायला जिथे फाटा फुटतो तिथे असलेले कासार्डे हे माझे गाव. आम्ही सख्खे चुलत मिळून 12 भाऊ आणि 6 बहिणी, त्यापैकी मी शेंडेफळ. त्यामुळे बहुतेक पुतणे / पुतण्या आणि भाचे भाच्या एकतर माझ्यापेक्षा वयाने मोठे नाहीतर माझ्या वयाचे होते :) मे महिन्यात सर्वांची कुटुंबे एकाच वेळी खाली फोटोत असणार्‍या घरात नांदत असत.


कधी मोजली नाहीत पण सहज 80-90 लोक उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या घरात गुण्या गोविंदाने नांदत असत. मुंबईत केवळ लग्नाच्या वेळी दिसणार्‍या मोठाल्या टोपामध्ये त्या वेळी रोज दुपार संध्याकाळ इतक्या माणसांचे जेवण बने. रात्री झोपायला गावात कुणाच्याही अंगणात आडवे पडले तरी चालत असे. परवानगी मागण्याचा तर प्रश्नच नव्हता. गावातील सगळीच घरे आपलीच असल्याच्या थाटात सगळे गावकरी वागत. कुणाच्याही घरी कोणत्याही वक्ताला कुणीही जाऊ शकत असे. So called आगंतुक पाहुणा आणि यजमान कुणालाही त्यात काही वावगे आहे असे वाटत नसे.

मुंबईच्या त्या 10X20 च्या खुरड्यातून गावच्या त्या ऐसपैस घरात जायला जीव परीक्षेच्या अगोदरपासून आतुर व्हायचा.त्यात गावी जाणे हा एक मोठा event असायचा ज्याची तयारी साधारणपणे दोन एक महिने अगोदरपासून सुरू व्हायची. सगळ्यात महत्वाचे मिशन म्हणजे एस टी उर्फ लाल डब्ब्याची तिकिटे काढणे. त्या काळी कोरे झाली नव्हती. त्यासाठी वडील आणि भाऊ रात्रभर रिज़र्वेशन खिडकी पाशी रांगेत राहायचे. मग जायच्या आठवडाभर अगोदरपासून सामानाची बांधाबांध व्हयायची जी जायच्या मिनिटापर्यन्त चालू असायची. कुणी तिसर्‍या माणसाने पाहिले तर त्याला वाटेल की ही लोक हे घर सोडून दुसर्‍या घरात राहायला चाललीत इतके ते सामान असायचे. ते सामान आणि 10-12 माणसे कांजूरमार्ग ते ठाणे अथवा परेलपर्यंत मध्य रेलवे मधून सहीसलामत नेणे म्हणजे एक दिव्य असायचे आणि नंतर तेवढे सामान बस च्या टपावर चढवून सगळ्यांनी आपापल्या सीटवर बसणे हे त्याहून मोठे दिव्य असायचे. सगळ्यांना खिडकीजवळ जागा हवी असे, कारण बर्‍याच जणांना गाडी लागायची, त्यामुळे ती जागा सोइस्कर असायची :) मला मात्र ड्राइवर च्या मागची सीट आवडायची. रात्री बस मधले दिवे बंद झाले की मला रात्रभर समोरचा रस्ता बघायला कोण मजा यायची. मी आजही गावी जायच म्हटल तर कोकण रेलवे आणि वोल्वो पेक्षा एस टी लाच पसंती देईन. आयुष्यभर वोल्वो ने प्रवास करणार्‍या लोकांना कदाचित नाही कळणार एस टी च्या प्रवासातली मजा. कधी एस टी च्या प्रवासातल्या मजा सविस्तर लिहेन.

गावी पोचल्यावर पहिले एक दोन दिवस जो भेटेल तो 'काय चाकरमाण्यानू, कवा इलास' म्हणून विचारी. आम्ही त्याला किंवा तो आम्हाला ओळखत नसला तरी काही फरक पडत नसे. एक दोन दिवसात माझे समवयस्क भाचे / पुतणे /पुतण्या आले की खरी मजा सुरू होई. मुंबईत भल्या पहाटे नऊ वाजता उठणारा मी गावी मात्र सर्वांबरोबर सकाळी सहाला उठायचो. घरातल्या बायकांचा दिवस तर सकाळी चारच्या अगोदर पासून सुरू होई. उठल्यावर सगळ्या बाळगोपालांना उठवून एकत्र परसाकडे (शौचाला) जायचा कार्यक्रम असे. साधारणता 2000 सालापर्यंत आमच्या आणि कोकणातल्या बहुसंख्य गावांत निसर्ग हेच शौचालय असे. जाताना रस्त्यात असणार्‍या प्रत्येक आंब्याच्या झाडावर दगड मारुन 1-2 आंबे पाडून खाल्ल्याशिवाय कोणाचे पोट साफ होत नसे :)परत आल्यावर राखेने किंवा कोळशाने दात घासले जात. टूथपेस्ट ही तेव्हा चैनीची गोष्ट होती.असली तरी इतक्या लोकांमधे ती 1-2 दिवसात संपे. नंतर चहा नाश्ता होई. चहा शक्यतो बिन दुधाचाच असे.

साधारणतः 10-11 वाजता दोन वहिन्या आणि एखादी बहीण घरातल्या सगळ्या लोकांचे कपडे टोपल्यांमध्ये भरून नदीवर धुवायला नेत असत. इतक्या लोकांचे कपडे धुणे आणि जेवणाची भांडी घासणे ही महाकठीण कामे घरातल्या बायका लीलया पार पाडीत असत. पुरुषांनी घरकामात मदत करण्याइतपत समाज तेव्हा सुधारलेला नव्हता :) आदल्या दिवशी धुतलेल्या कपड्यांमधून आपले कपडे ओळखने मुश्कील ही नही नामुमकीन भी असे. खास करून सफेद बनियान. मग आपापल्या बनियानला रंगीबेरंगी धागे बांधून ठेवावे लागत. पण तेही फारसे टिकत नसत. बाय द वे आमच्यात बनियानला बॉडी म्हणतात. माझी बायको जेव्हा नवीन लग्न होऊन आली होती तेव्हा कुणीतरी कुणाला तरी विचारात होते की आमच्या अमक्या अमक्याची बॉडी बघलास खयसर (म्हणजे आमच्या अमक्या अमक्याची बनियान पाहिलित का कुठे?) माझ्या बायकोला वाटले की कोणीतरी कुणाची तरी डेड बॉडी शोधतय :)

बायका कपडे धुण्यासाठी नदीवर निघाल्या की आम्ही पोरटोर गुरांना नदीवर नेण्याच्या बहाण्याने नदीवर सटकत असू. वास्तविक पाहता गुरांना कुठल्या direction ची गरज नव्हती, पण आम्हाला नदीवर डुंबायला जाण्यासाठी काहीतरी बहाणा हवा असे. एकदा घर दिसेनासे झाले की गुरे आपणहून नदीकडे जात आणि आमचे पुन्हा आंबे, काजू पाडणे असले उद्योग चालू होत :) आयला कसला सॉलिड नेम होता आम्हा लोकांचा. चार पाच दगडात कितीही उंचावरचा आंबा पडलाच पाहिजे असा. मग अशीच मजल दरमजल करीत आम्ही नदीवर पोचायचो आणि धडा धड पाण्यात उड्या टाकायचो. नदीत विविध प्रकारची जनावर (अका साप) सुद्धा असायचे. नदीचे पाणी शांत असले की ते पाण्याच्या बाहेर डोकी वर काढून बसायचे. ते विषारी होते की बिनविषारी ते माहीत नाही पण आम्ही नदीत असताना मात्र आम्हाला ते कधी चावले नाहीत.

तास दीड तास मनसोक्त डुंबल्यावर परत घराकडे निघायचो. जाता जाता जमल्यास भिजलेले कपडे आमच्या घरातील बायकांकडे धुवायला द्यायचो. जाताना पुन्हा आंब्यांवर नेम धरणे ओघाने आलच कारण इतक्या लोकांच्या गदारोळात घरी पोटभर जेवायला मिळेलच याची शाश्वती नसायची. आम्ही इतके आंबे खायचो की महिन्याच्या अखेरीस आंबा तोंडाला लावला की दातातून शिरशिरी यायची. याला आम्ही दात आंबणे असे म्हणायचो. घरी आल्यावर गुरे परतली तरी आम्ही न परतल्याबद्दल आणि नदीत डुंबण्याबद्दल ओरडा मिळायचा. तो एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देऊन जेवायला बसू. ते चुलिवरचे जेवण इतके रुचकर असे की आठवणीने आत्ताही माझ्या तोंडाला पाणी सुटलय.

[क्रमश:]

Saturday, August 1, 2009

होर्न ओके प्लीज़

एका टॅंकर च्या मागे लिहिलेल होत ,
कत्ल करो नजरो से तलवारो मे क्या रखा है
सफर करो टॅंकरो से कारो मे क्या रखा है :)

या ट्रक, लॉरी च्या मागे किती छान छान लिहिलेल असत नाही? हिंजवडिला आय टी पार्क कडे जाताना वाकड जवळ एक ट्रक बर्‍याचदा दिसतो. त्याच्या मागे लिहिलय

तेजस, वैशु, सचिन, रमेश, सुरेश, सायली, माया, चंदू
धन्य ते माता पिता

नावे नीट लक्षात नाहीत पण खरच त्या माता पित्यांना धन्य या पेक्षा दुसरी उपमाच देता येणार नाही.

सगळ्या ट्रक च्या मागे ' Horn OK Please' आणि 'मेरा भारत महान' असे का लिहिलेले असते हे मला आजतगायत न सुटलेले कोडे आहे. एकाने तर '100 मे से 80 बेईमान लेकिन फिर भी मेरा भारत महान' असे कटू सत्य लिहिले होते. मला ट्रक मागे लिहिलेले तत्वज्ञान् वाचायची सवयच जडली होती. ती सवय अमेरिकेत आल्यावरही कायम राहिली होती. ही पहा इकडची थोडी सुभाषिते :)

JESUS LOVES YOU
Everyone else thinks you are an a****le :)

I got this truck for my wife
Thought it was a pretty good trade

WIFE and DOG missing
REWARD FOR DOG

तसेच रस्त्यावर धोक्याची सूचना देणारे फलकही मजेदार असतात. हिमाचल मध्ये कुठेतरी हा फलक दिसेल
Please be soft on my curves
they are dangeorous
खाली अजुन काही साइन्स दिली आहेत.

Speed is a 5 letter word so is death
Slow is a 4 letter word so is life

Be Mr late
than LATE Mr.

Mind your brakes
or break your mind

घरी तुमची वाट पहात आहेत
तुमच्या अपघाताच्या बातमीची नाही

चला तर तुमच्याकडेही असली काही साइन्स असतील तर मला सांगा बघू.....

Thursday, July 30, 2009

मराठी माध्यम की English Medium???

अशा विवाद्पूर्ण विषयास हात घातल्याबद्दल अगोदरच माफी मागतो. या पोस्ट मध्ये व्यक्त केलेली मते पूर्णपणे माझीच आहेत आणि कुणाच्याही भाषाविषयक भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही.

पाल्याने कुठल्या माध्यमात शिकावे असला प्रश्न जर कुणी विचारला तर माझे उत्तर इंग्रजी माध्यम असे असेल. कमीत कमी माझी मुले (जेव्हा होतील तेव्हा) इंग्रजी माध्यमात (किंवा त्यावेळी जे माध्यम स्ट्रॉंग असेल त्यात) शिकतील. त्यामागे ज्या भाषेत दहावी नंतर पुढील कमीत कमी सहा वर्षे शिक्षण घ्यायचे आहे आणि ज्या भाषेत कदाचित निवृत्त होईपर्यंत काम कारायचे आहे अशा भाषेचा पाया सुरुवातीपासूनच मजबूत करणे हेच थोडक्यात कारण आहे. मान्य आहे की फक्त मराठीत शिकुनही निवृत्त होईपर्यंत मानाने जगता येईल, पण असे पर्याय फारच थोडे आहेत किंवा मला माहीत नाहीत. पण इंग्रजी भाषेत मराठी भाषेपेक्षा व्यावसायिक दृष्ट्या जास्त ज्ञान् आहे याबाबत कुणाचेही फारसे दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे हे ज्ञान् चांगल्या प्रकारे घेता यावे यासाठी इंग्रजीवर 'चांगले' प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

बर्‍याचशा मराठी शाळांमध्ये इंग्रजी पाचवी नंतर शिकवायला सुरूवात केली जाते आणि बर्‍याचशा विद्यार्थ्यांसाठी दहावीपार्यंत तो घाबरवणारा विषय राहून जातो. तसेच इंगजी संभाषणावर अगदी नगण्य मेहनत घेतली जाते. परिणामी जेव्हा तोच विद्यार्थी कॉलेज विश्वात प्रवेश करतो तेव्हा तो कुठेतरी तो थोडासा बुजलेला असतो आणि बर्‍याचशा केसेस मध्ये तो आपला आत्मविश्वासही हरवून बसलेला असतो. बरेच विद्यार्थी शेवटपर्यंत हा आत्मविश्वास परत मिळवू शकत नाहीत. कॉलेज मधील पहिली 1-2 वर्षे तर इंग्रजीशी जुळवून घेण्यात जातात. थोडक्यात उदाहरण द्यायचे झाले तर सुरुवातीचे काही दिवस त्रिज्या, परावर्तन, लम्बक, प्रकाश संश्लेषन, षटकोन म्हणजे अनुक्रमे radius, reflection, pendulum, photo synthesis, hexagon असतात हेच मुळी समजत नाही. हे एकदम साधे उदाहरण दिलय. बर काही शंका विचारायची झाल्यास ती इंग्रजीमधून न चुकता विचारता येईल हा विश्वास नसल्याने बर्‍याचशा शंका मनातच राहतात.

बरेच लोक यावर विवाद करताना म्हणतात की आम्ही सुद्धा यातून गेलोय, आम्ही यातून मार्ग काढलाय आणि आज आम्ही यशस्वी आहोत. आम्ही इंग्रजीत अगदी बाप नसू पण इंग्रजीवर चांगल्यापैकी प्रभुत्व आहे. हो मी म्हणतो त्याबद्दल वादच नाही. पण दहावीनंतर आपले बरेचसे एफर्ट्स हे इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यात खर्च होतात. कमीत कमी माझे तरी झालेत. हेच एफर्ट्स आणि खर्ची पडलेला वेळ अधिक चांगल्या प्रकारे वापरता आला असता तर प्रोफेशनल लाइफ मध्ये कदाचित दुणावलेल्या आत्मविश्वासाने वावरता आले असते. तसेच सर्व मराठी माध्यमातील विद्यार्थी हे एफर्ट्स देऊ शकत नाहीत आणि बर्‍याच केसेस मध्ये आपले ग्रॅजुयेशनसुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. आता इंग्रजी माध्यमातील किती मुले ते पूर्ण करतात हा मुद्दा वेगळा, पण केवळ इंग्रजी संभाषणाच्या जोरावर त्यातली बरीचशी मुले कॉल सेंटर सारख्या क्षेत्रांमध्ये बर्‍यापैकी स्थिरावतात. थोडक्यात इंग्रजी माध्यमातील आणि मराठी माध्यमातील मुलांच्या मार्गाची तुलना खालील प्रमाणे करता येईल.
इंग्रजी माध्यम: शाळेत इंग्रजीत शिकाणे > कॉलेजमध्ये इंग्रजीत शिकाणे > व्यावसायिक जीवनात इंग्रजीचा वापर करत वावरणे.
मराठी माध्यम: शाळेत मराठीत शिकाणे > कॉलेजमध्ये अगोदर इंग्रजीला सरावणे > नंतर कॉलेजमध्ये इंग्रजीत शिकाणे > व्यावसायिक जीवनात इंग्रजीचा वापर करत वावरणे.
मराठी शाळेनंतर इंग्रजी कॉलेज हे स्थित्यंतर इंग्रजी शाळेनंतर इंग्रजी कॉलेज या स्थित्यंतरापेक्षा मोठे आणि अवघड असते (10 पैकी कमीत कमी 8 जणांसाठी ).

इतके करूनही व्यावसायिक जीवनात comfortably वावरता येईल याची प्रत्येकाला शाश्वती नसतेच. उदा. मोठ्या ग्रूप समोर एखादे मोठे प्रेज़ेंटेशन देणे. शाळेत असताना पूर्ण भरलेल्या सभागृहात लोकमान्य टिळाकांविषयी चार शब्द सांगताना माझी कधी
तन्तरली नाही,पण आय टी मध्ये सुरुवातीला एखादे presentation देताना माझी फार फाटायची. इथे मला इतके लोक समोर बसलेत त्याचे टेन्शन नसायचे तर मी इंग्रजीत बोलताना चुकणार तर नाही ना याची भीती असायची.

बरेचसे लोक मराठी माध्यमातील बर्‍याचशा यशस्वी लोकांची उदाहरणे देतात (कदाचित लोक माझेही उदा देत असतील). त्यांच्यामते मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठीतून शिक्षण घेणे अत्यावश्यक आहे. मी म्हणतो इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन मराठी भाषा का टिकवता येणार नाही? मराठीची गळचेपी होतेय आणि ती लवकरच मान टाकेल अशीही ओरड काही लोक करतायत. अरे अमृततेही पैजा जिंकणारी माझी मराठी अशी कशी मान टाकेल. Survival of the fittest हा काळाचा मंत्र आहे. माझी मराठी जर सशक्त असेल (जी ती आहेच) तर ती टिकणारच. पण जर काळाच्या ओघात ती जर लुप्त झाली तर मला वाईट जरूर वाटेल पण कालाय तत्स्मैएय नमः असे मानून ते ही मी स्विकारेन. ती पाळी येणार नाही याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. माझ्यातर्फे ती टिकवण्यासाठी जे काही करता येईल ते मी करेनच पण ज्या अडचणींचा सामना मला करावा लागला त्या अडचणींचा सामना पुढच्या पिढीला करावा लागणार नाही याचीही काळजी घेईन. मला पूर्ण खात्री आहे की मी माझ्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवूनही मराठीची गोडी लावू शकेन. जर मराठी माध्यमातून शिकूनही इंग्रजीची पातळी इंग्रजी माध्यमाइतकी ठेवणार कोणता पर्याय असेल तर तो मी नक्कीच स्वीकारेन, पण तूर्तास तरी I will support the english medium education..

Tuesday, July 21, 2009

कप्प्यातल्या आठवणी....

दर आठवड्याला स्तंभलेखन करणार्‍यांना विषय तरी कसे सुचतात देव जाणे. इकडे मला विषय सुचत नव्हते म्हणून इतके दिवस काही लिहिले नव्हते. पण आज ऑफीस मधे करायला अगदीच काही नव्हते. माशा माराव्या म्हटल्या तर माशाही नव्हत्या (हे गोरे लोक जरा जास्तच स्वच्छता ठेवतात बाबा). मग विचार केला की ब्लॉगवारच काही का खरडू नये? शेवटी दुसर्‍या कुठल्या प्रवीण ने शिव्या देऊ नयेत म्हणून ही URL जिवंत ठेवण्याच वचन दिलाय मी माझ्या पहिल्या पोस्ट मधे:) काही आठवणी मनात घर करून रहातात. कधीतरी काहीतरी कारण असते म्हणून तर कधीतरी विनाकारण. या अशाच काही आठवणी आहेत.

कॉलेज संपल्यावर माझी विप्रो कंपनी तर्फे बंगलोर मधे WASE नावाच्या प्रोग्रॅम साठी निवड झाली. सोमवार ते शुक्रवार पूर्ण वेळ काम आणि शनिवारी दिवसभर M.S. in Software Engineering चे लेक्चर्स असे त्याचे स्वरूप होते. ही डिग्री आम्हाला BITS Pilani, Rajasthan तर्फे देण्यात येणार होती. मुंबईहून आम्ही 7 मुले आणि 11 सुंदर मुली असे 18 जण बंगलोर ला पोचलो. तिथे कळले की याच प्रोग्रॅम साठी चेन्नई आणि हैदराबादहून सुद्धा काही जणांची निवड झाली होती. त्यापैकी मुंबई आणि चेन्नईच्या मुलांना दुसर्‍याच दिवशी पहिल्या सत्रासाठी राजस्थानला जाण्यास सांगण्यात आले. उरलेल्या चेन्नई, मुंबई, हैदराबादच्या मुली आणि हैदराबादची मुले यांचे पहिले सत्र बंगलोर मध्येच घ्यायचे ठरले.. जवळपास 70 मुली आणि 30 मुले. म्हणजे आम्ही 47 मुले त्या राजस्थानच्या गरमीत करपणार आणि हे हैदराबादचे नवाब बेटे 1:2 पेक्षा जास्त च्या ratio ने बंगलोरच्या आल्हाददायी वातावरणात अभ्यास (??) करणार. आम्हा सगळ्यांचा असला जळफळात झाला होता म्हणून सांगू. नशीबच XX त्याला काय करणार पांडू (XX = झन्डू, तुम्हाला काय वाटल? ). कंपनीने आमची ग्रँड ट्रंक एक्सप्रेस ची तिकिटे काढली होती पण त्यातली निम्म्याहून अधिक waitlisted/RAC होती आणि सीट नंबर A1 ते A12 बोग्यामधे विखुरलेले होते. ग्रँड ट्रंक एक्सप्रेस आम्हाला चेन्नईला जाऊन पकडायची होती. आमच्यासोबत विप्रो चा एक प्रतिनिधी चेन्नई पर्यंत येणार होता. आमची जवळपास 10-15 तिकिटे त्याच्याकडे होती. आम्ही 47 जण त्याच दिवशी प्रथमच एकमेकांना भेटलो होतो त्यामुळे एकमेकांची नावे सोडाच चेहरे सुद्धा नीट ओळखीचे नव्हते. सीट नंबर विखुरलेले असल्याने आम्ही 4-5 जणांचे ग्रुप बनवून प्रत्येक बोगी समोर उभे होतो. ट्रेन येताच सगळे आत घुसलो. या घाई गडबडीत त्या प्रतिनिधिकडून तिकिटे घ्यायची राहूनच गेली. नशिबाने एकजवळ त्या तिकिटांची xerox होती. त्याच्या आधारे आम्ही कसे तरी अड्जस्ट झालो. तिकीट चेकर आल्यावरच मोठा प्रॉब्लेम होणार होता. सर्व तिकिटे आणि xerox ग्रुपमधल्या एका 4-5 जणांच्या चमुकडे सोपवली आणि सांभाळून घेण्यास सांगितले. रात्री 2:30 च्या सुमारास तपासनीस आला. तो तिकिटवरच्या प्रत्येक नावासाठी ओळखपत्र मागू लागला. काही नावांची स्पेलिंग सरळ सरळ चुकली होती ते आम्हाला गाडीत चढतानाच लक्षात आले होते. त्यासाठी कुठल्याही ओळखपत्राची गरज नव्हती. पंचपकक्वान्नाचे ताट पाहिल्यावर सोमालियाहून आलेल्या माणसाच्या डोळ्यात जी चमक दिसेल तीच चमक आता भरपूर पैसे खायला भेटणार या विचारात खूष असणार्‍या त्या कर्तव्यदक्ष टीसीच्या डोळ्यात होती. त्याने आम्हाला ऑफर दिली की 18000 दंड भरा नाहीतर 5000 मध्ये मांडवली करा. अर्थात आमची काहीच चूक नसल्याने आम्ही दंड भरवयाचे ठरवले. रात्री 3 च्या सुमारास प्रत्येक बोगीत जात आम्ही आमच्या मित्रांना शोधायला सुरूवात केली. प्रत्येकाकडून जवळपास 400 जमा करून आम्ही तो दंड भरला. नंतर तो दंड आम्ही कंपनी कडून वसूल केला ती गोष्ट वेगळी. पण या गडबड गोन्धळात रात्रीच्या झोपेचे पार खोबरे झाले होते. त्यामुळे दिवस वर आला तरी आमच्या पैकी बरेच जण झोपूनच होते. अशाच एका साइड बर्थ वर कुरियन आणि मनोज झोपले होते. भारतीय रेल्वे प्रवासात हमखास त्रास देणारे छक्के या प्रवासालाही अपवाद नव्हते. एका छक्याने कुरियनला उठवून पैसे मागायला सुरवात केली. त्याने सांगितले की साब उपर सो रहे है उनसे पैसा लेलो आणि तो पुन्हा झोपी गेला. त्या छक्क्याने मनोजला उठवून पैसे मागायला सुरवात केली. अर्ध्या झोपेतच त्याने बडबडायला सुरूवात केली.

"मेरे पास कुछ नही है !" - मनोज

" तेरे पास ही सब कुछ है रे मेरे धर्मेंदर, हमारे पास ही कुछ नही है, चल पैसा निकाल " असे म्हणत त्या छक्क्याने मनोजचा नको तो भाग पकडला आणि मनोजची उरली सुरली झोपही उडून गेली. टनकन उडी मारुन मनोज खाली उतरला आणि दुसर्‍या बोगीत त्याच्या मित्रांकडे जाऊन म्हणाला, " यार मुझे कहि छुपा दो, उनको पैसा नही दिया तो ऊन लोगो ने मेरा पकड लिया ". थोड्याच वेळात मनोज 'का' पकड लिया ही चर्चा गावभर (सॉरी ट्रेनभर ) झाली :)

जवळपास दोन दिवसांच्या प्रवासानंतर ती गाडी एकदाची दिल्लीला पोचली. 2 दिवस फक्त ब्रश करून आणि तोंड धुवून काढले होते. दिल्लीहून राजस्थानचा बस प्रवास 6-7 तासांचा आहे. आमच्यासाठी एक बस बुक करण्यात आली होती. दिल्लीची गरमी काय असते त्याचा अनुभव आम्हाला आलाच होता. बस मधे बसताच आमच्यातील बहुतेक सर्वजण टॉपलेस झाले होते. बीट्स पिलानीच्या कॅंपस मधील शंकर-भवन हॉस्टेल मधे आम्हाला ठेवण्यात आले होते. आम्हाला वाटले होते की कुठेतरी वाळवंट बघायला मिळेल म्हणून, पण पिलानीचा कॅंपस एकदम हिरवागार होता. जाताच आमच्या दृष्टीला दोन मोर पडले. कॅमरा काढेपर्यंत ते पसार झाले होते. नंतर कळले की या कॅंपस मधे कुत्रे कमी आणि मोर जास्त आहेत.
दुसर्‍याच दिवसापासून आमचे सत्र सुरू झाले. सकाळी आठ ते संध्याकाळी सहा लेक्चर. सहा ते आठ assignments आणि रात्री 9 ते 1 कंप्यूटर रूम. आम्ही 6 महिन्यांचा कोर्स 1 महिन्यात पूर्ण केला.

Assignments करता करता एकमेकांची चांगली ओळख झाली. आमच्यात एक रामारत्नाम म्हणून एक मुलगा होता. तो मोडक्या तोडक्या हिंदीत बोलायचा. असेच एक दिवस अजित नावाच्या मित्राच्या खोलीत आम्ही गप्पा मारत बसलो होतो. अजितकडे कसलीशी बिस्किट होती. ती त्याने आम्हाला दिली. ती खाऊन संपता संपता हा राम खोलीत आला. त्याच्या तोडक्या हिंदीत विचारू लागला के ये तुम लोग क्या खाता है. आम्ही सांगितले की अजितने बिस्किट दिया वो खा रहे है. त्यावर तो अजितला म्हणाला की क्या रे तू अकेला अकेला खाता है, मेरेको नही दिया. अजित मस्करीत म्हणाला की अब तो खतम हो गया है अब डायरेक्ट सुबह मिलेगा. त्या रामला सुबह मिलेगाचा अर्थच कळला नाही :) तो म्हणाला सुबह पक्का देगा ना?? दुसर्‍या दिवशी संध्याकाळी तो धावत आला आणि अजीतच्या पार्श्वभागावर लाथ मारत म्हणाला, " क्या रे तू सुबह बिस्किट देने वाला था, अभी तक नही दिया." त्यावर अजित म्हणाला, " तूने तो फॅक्टरी पे लाथ मारा है, अब तुझे बिस्किट नही मिलेगा" त्याला कुठली फॅक्टरी आणि बिस्किट कुठल्या रूपात मिळणार होते याचा आजतागायत उलगडा झाला नसेल :)

चला तर हा पोस्ट फारच लांबत चाललाय. तुम्हाला कंटाळा येण्याअगोदर आवरते घेतो. अगोदरच कंटाळा आला असेल तर माफ करा :).. पुन्हा भेटू.. असेच.... कधीतरी...

Monday, June 15, 2009

.... आणि कसाब रडला.

आजची ब्रेकिंग न्यूज़ वाचली असेलच तुम्ही. क्रूरकर्मा कसाब सी एस टी स्थानकातील मृतदेह आणि रक्ताचे सडे असलेली छायचित्रे बघून कोर्टात रडला. त्याच्या वकिलांनी म्हणे त्याला ही छायाचित्रे कोर्टाच्या सुटीत दाखवली आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यात आलेली आसवे सर्वानी पाहिली. जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी कसाबला कुठेतरी मानवतेचे अंग असल्याची ब्रेकिंग न्यूज़ करून टाकलीय.

प्रिंट मीडियाच्या कसाबबाबातच्या गेल्या काही महिन्यातील बातम्या तुम्ही वाचल्याच असतील. त्याला मटण काय आवडते, अमिताभचे सिनेमे काय आवडतात, त्याला वर्तमानपत्रे काय दिली जात नाहीत, काय नी काय. प्रिंट मीडिया ने फडतूस कसाब वरुन त्याला सूपरस्टार कसाबसाहेब करून टाकला आहे. हा मीडिया म्हणजे एक स्वतन्त्र विषय आहे. अरे जो मनुष्य अंदाधुंद गोळीबार करून शेकडयाने माणसे मारतो आणि वर ती मेलेली माणसे पाहून नाच करतो, त्या माणसाला भावना असतील? खरच त्याला पश्चात्ताप होण्याचा काही तरी स्कोप असेल? आणि खरच पश्चात्ताप झाला असला तरी तो दयेस पात्र ठरतो का? तो 26/11 चा थरार मुंबई पासून हजारो मैल दूर असणार्‍या माझ्यासारख्या माणसाच्या डोक्यातून आठवडाभर गेला नव्हता. रोज रात्री स्वप्नात अतिरेकी आणि बंदुका दिसत. माझ्या सारख्याची ही अवस्था तर ज्यांनी तो थरार प्रत्यक्षात अनुभवला त्यांची काय अवस्था झाली असेल.

आता कसाबचे अश्रू बघून या राज्यकर्त्यांना त्याच्यावर दया दाखवावीशी वाटली तर नवल नाही. कसाबला जाहीर फाशी देण्याची जनमानसाची मागणी जोर धरत असताना त्याला केवळ जन्मठेपेची शिक्षा झाली तर आश्चर्य वाटू नये. किंबहुना फाशीची शिक्षा झालीच तरी तिची अंमलबजावणी व्हायला किती दिवस / महिने / वर्ष लागतील काहीच सांगता येऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही त्या अफजल नावाच्या गुरू माणसाची फाशी नाही का बरीच वर्षे रखडलीय. का तर म्हणे राष्ट्रपती नामक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या टेबलावर ती फाईल अजून पोहोचू शकली नाही. अरे मग पोहोचवा ना. काय आषाढी एकादशीच्या मुहूर्ताची वाट बघताय? की तिला पाय फुटायची वाट बघताय? नशीब अजुन त्या फाईलीला पाय फुटलेत की नाही बघायला एक कारकून ठेवण्यात येईल अशी घोषणा करण्यात आलेली नाहीय. म्हणे त्याच्या अगोदर 30 जणांचा फाशीचा नंबर आहे. पण त्यापैकी किती जणांना सुप्रीम कोर्टाने फाशी दिलीय. फाशी सारखी शिक्षा अपवादात्मक परिस्थितीत दिली जात असल्याने मुळात खरच 30 लोक अफजल च्या पुढे आहेत का? उद्या कसाबला फाशीची शिक्षा झाली तर त्याचा क्रमांक किती असेल असे एक ना अनेक प्रश्न आहेत. असो, मूळ मुद्द्याकडे वळतो. या कसाबच्या खटल्यातून अनेक प्रश्न माझ्या डोक्यात पिंगा घालतायत. पहा तुम्हाला पटतात का.

1. खटला किती काळ चालेल? 1992 च्या मुंबई खटल्याला 12-14 वर्षे लागली. असले खटले लवकर निकाली काढण्यासाठी काही करता येऊ शकते का? माझ्यामते " शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला फाशी होता कामा नये" ही मानसिकता बदलली तरच खटले लवकर निकालात लागतील.

2. मुळात कसाबवर खटला चालवण्याची खरच काही गरज आहे का? आपल्या देशातील कायद्याप्रमाणे प्रत्येकाला बचावची संधी आणि वकील दिला जातो. पण कसाबने जे काही केले आहे त्यामुळे कोणाच्याही मनात तो गुन्हेगार नाही असे वाटण्याची सूतराम शक्यता नाहीय. अशा अपवादात्मक परिस्थीत आपण कठोर निर्णय घेऊन कसाबला चट गुन्हा पट फाशी का देऊ शकत नाही? कदाचित आंतरराष्ट्रीय परिषदांमधे यावर निषेध नोंदवला जाईल, पण हा आपल्या देशातल्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आहे आणि आपण आपल्याला हवा तो निर्णय घेऊ शकतो. अमेरिकेने सद्दाम च्या फाशिबद्दल घेतला तसा. जर आपण असा धाडसी निर्णय घेऊ शकलो तरच कदाचित भविष्यात होणार्‍या अतिरेकी हल्ल्यांवर थोडा आळा बसू शकेल. नाहीतरी आता आपल्या मीडियाच्या कृपेंने अतिरेक्यांना माहीत झालेच आहे की भारतात अल्पवयीन खटले वेगळ्या न्यायालयात चालवले जातात. भविष्यात हल्लेखोर 18 वर्षाखालील असल्यास नवल वाटू नये. जर का हा निर्णय आपण घेऊ शकलो तर त्या कसाबच्या सुरक्षेवर येणारा दररोजचा लाखोंचा खर्च पोलिस दलाच्या सक्षमिकारणासाठी वापरता येईल.

3. कोर्टाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी एक निश्चित काळ का ठरवता येऊ नये? खासकरून ज्या शिक्षांवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहेत त्या शिक्षा.जर का या शिक्षांची अंमलबजावणी व्हायला वर्षानुवर्षे लागणार असतील तर या अतिरेकी संघटना त्याच्या अतिरेक्यांना सांगतील की बाबांनो हल्ल्ला करून हजारो माणसे मारुन झाली की सरळ पोलिसांच्या स्वाधीन व्हा आणि भारताच्या जेल मधे आराम करा. भारत सरकार तुमची योग्या ती बडदास्त ठेवीलच. कसाबवर दिवसाला लाखो उधळतायत, तुमच्यावर करोडो उधळतील. थोडक्यात शिक्षा ठोठावून काही उपयोग नाही, ती शक्य तितक्या लवकर प्रत्यक्षातही आणली पाहिजे.

असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करता येतील आणि हे केवळ सरकारच्या धाडसी निर्णयाने चुटकीसरशी सुटू शकतील. त्यासाठी लागेल ती सद्य स्थिती बदलण्याची इच्छाशक्ति. आपल्या सरकारकडे ती आहे? मला नाही वाटत. आपल्याला काय वाटत?

Wednesday, June 10, 2009

पहिले पुष्प...

बर्‍याच दिवसांपासून (खरतर बर्‍याच वर्षांपासून ) मनात होते की एक मराठी ब्लॉग सुरू करू म्हणून, पण बर्‍याचशा कारणामुळे आणि मुख्य म्हणजे माझ्या आळशीपणामुळे कधी मुहुर्तच सापडला नव्हता. शाळेत असताना मी मराठीत बर्‍यापैकी बरा होतो :) पण दहावी नंतर मराठी संबध केवळ वर्तमानपत्र वाचण्यापुरता आणि घरच्यांशी मराठी बोलण्यापुरता राहिला होता. B.Sc. नंतर बॅंग्लॉरला गेल्यानंतर तोही जवळपास संपला. आता आंतरजालाच्या माध्यमातून तो संबंध पुन्हा प्रस्थापित करायचा प्रयत्‍न करतो आहे. आशा आहे आपल्याला आवडेल :)

ब्लॉग सुरू करताना थोड्या अडचणी आल्या. सर्वात प्रथम अडचण म्हणजे मराठीत टाइप कुठे करायचे. नशीबाणे quillpad.in माझ्या मदतीला आले. नंतरचा प्रश्न म्हणजे ब्लॉगला नाव काय द्यायचे. विचार करून थकलो आणि शेवटी "असेच... कधीतरी..... काहीतरी...." वर शिक्कामोर्तब केले. नंतर ब्लॉगची URL काय असावी याच्यावर विचार करावा लागला. इतका विचार मी सॉफ्टवेर इंजिनियर झाल्यापासून केलाच नव्हता :) मला माझ्या ब्लॉगच्या URL मध्ये मराठी हा शब्द हवाच होता, पण बर्‍याच लोकांनी हा शब्द वापरुन उगाच बरेच domain names बरबाद केलेत. असला वैताग आला होता, पण शेवटी नशीब बलवत्तर म्हणून ही URL मिळाली आणि माझा ब्लॉग तयार झाला. :) हा domain name जिवंत ठेवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.

आता थोडस माझ्या मराठी ब्लॉग बद्दल. माझ्या ब्लॉग चे नाव " असेच... कधीतरी..... काहीतरी...." वाचून तुम्हाला माझ्या आळशीपणाचा अंदाज आलाच असेल :) याचा अर्थ असा की मी जमेल तेव्हा लिहीत जाईन. माझ्या ब्लॉगला विषयाचे बंधन नाहीय. जे मनात येईल ते कागदावर (अर्थात ब्लॉगवर) उतरवायचा मानस आहे. बघू कितपत शक्य होतेय ते. आणि हो, कृपा करून माझ्या मराठीतल्या spelling mistakes कडे जरा काणा डोळा करा. जवळपास 15 वर्षानंतर मी मराठीत लिहीत आहे आणि सर्व शब्द मराठी एडिटर मधे व्यवस्थित लिहीणे शक्य होत नाही. तसेच थोडे फार इंग्रजी शब्द माझ्या पोस्ट्स मधे असतील, त्याकडेही थोडा काणा डोळा करावा.

चला, आता आपली रजा घेतो. एका नवीन पोस्ट सह लवकरच भेट होईल अशी आशा करतो.