Saturday, September 19, 2009

कुणी सांगेल का?

१. अमेरिकेतून परत आलेल्या जवळपास प्रत्येकाच्या प्रत्येक वाक्यात ’अमेरिका’ एकदा तरी का डोकावते?
२. कुत्र्या मांजरांवर प्रेम करणारे चिकन/मटण बिर्याणी एकदम आवडीने कसे खातात?
३. ABCD (a.k.a. low waist) जीन्स घालणाऱ्या मुली बसल्यावर सारख्या सारख्या मागून टी-शर्ट का खाली खेचत असतात?
४. बाजू बाजूच्या क्युबिकल मध्ये बसणारे एकमेकांशी डायरेक्ट न बोलता messenger किंवा e-mail द्वारे का बोलतात?
५. समोर उघडेबंब गणराय दिसत असताना दर्शनाच्या रांगेतील एक माणूस स्वत: घातलेला शर्ट दुसऱ्याला दाखवत "हा शर्ट गणपतीला शिवला" असं का सांगत होता?
६. विषाच्या बाटलीवर expiry date असते का?
७. पुण्यात दुचाकीवरील ९९% मुली संपूर्ण तोंडाला स्कार्फ बांधून अतिरेकी का बनलेल्या असतात? प्रदूषण हे उत्तर असेल तर त्याचा त्रास पुरुष वर्गाला होत नाही का?
८. काही माणसं आपल्याला मोबाईलवर फोन करून कोण बोलतय असं का विचारतात?
९. (कविता करणाऱ्या सर्वांची माफी मागून) ब्लॉगवर ९०% हून अधिक लोक ओढून ताणून यमक जुळवून वा मुक्तछंद वापरूनच कविता का करतात?
१०. कुठल्याही मुलीला propose केल्यावर तिचं पहिलं उत्तर ’मी तुला त्या नजरेने कधी पाहिलच नाही’ हेच का असतं?

तुर्तास इतकेच.... अजून प्रश्न पडले की याचा भाग-२ लिहेन :)

Monday, September 7, 2009

हे भलते अवघड असते..

दरवाजाचं लॅच उघडून अरुण आत आला. डिश वॉशरचा आवाज येत होता. म्हणजे वैशाली घरी आलेली असणार. बूट काढून सोफ्यावर बसेपर्यंत वैशाली किचनमधून पाणी घेऊन आली.
" ए वैशू, चहा टाकतेस? डोकं बघ कसं जड जड झालय"
" हो अगोदरच टाकलाय. होईलच इतक्यात, तोपर्यंत फ्रेश होऊन ये"

अरुण उठला अन बाथरूम मध्ये गेला. वैशू किचन मध्ये गेली. अरुण फ्रेश होऊन यॆईस्तोवर वैशू ने गरमागरम चहा आणि त्याच्या आवडीची पारले-जी ची बिस्किटं मांडून ठेवली होती.

"अर्रे व्वा!! कुठे मिळाली ग ही बिस्किटं. येत नव्हती ना आजकाल इंडियन स्टोर मध्ये ?" - अरूण एकदम चार बिस्किटं उचलत म्हणाला
" अरे दूध आणायला गेली तेव्हा दिसली शेल्फ वर. उचलली आणि आणली. आणि ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये."
" बरं बरं, सकाळी सकाळी उपदेश नको देऊस " ती चार बिस्किटं एकदम चहात बुडवत अरूण म्हणाला.

अगदी रात्री बारा वाजताही सकाळी सकाळी ने सुरुवात करण्याची अरूणची सवयच होती. बिस्किटं संपल्यावर अरुण चहा बशीत ओतून भुरके मारून पिऊ लागला. त्याला तसच चहा प्यायला आवडायचं, पण बाहेर लोकलज्जेस्त्व ते करता येत नसे.

" ए अरु.."
" हम्म्म्म.. काय ग?"
" काही विचार केलायस का?"
" कशाबद्दल??
" अरे असं काय करतोयस? आपली फॅमिली सुरु करण्याबद्दल. लग्न होऊन साडे पाच वर्षे होतील आता. घरी फोन केला तर हेच ऐकाव लागत. तुझं बरं आहे, तुला कोणी बोलत नाहीत. सगळे उपदेशाचे डोस मलाच. हल्ली तर मी फोन करणच सोडून दिलय" वैशू त्राग्याने बोलू लागली.
" हे बघ वैशू, फॅमिली सुरू करायला माझी ना नाहीय. पण सध्यातरी ते शक्य नाहीय. लग्न झाल्यावर सांगत होतो, पण तेव्हा तुझं करियर तुला महत्वाचं होतं. सध्या अशा..." - अरुण उत्तरला
" जुन्या गोष्टी नको उकरून काढूस रे. आत्ताच्या परिस्थित काय करायचं त्यावर विचार केलायस का?"

अरूण उर्फ अरु आणि वैशाली उर्फ वैशू. दोघही एकाच मल्टीनॅशनल कंपनीत कामाला. गेली ३ वर्षे अमेरिकेत वेगवेगळ्या क्लायंटसाठी काम करणार एक भारतीय जोडप. तस त्यांचं अरेंज्ड मॅरेजच होत, पण त्यांच्याकडे पाहिल्यावर ते कोणी खरं मानणार नाही इतक प्रेम त्या दोघांत होतं. अरु सातारचा तर वैशू पुण्याची. अरुचे जीवनाबद्दलचे विचार एकदम स्पष्ट तर वैशू तिला काय पाहिजे याबद्दल थोडीसी कन्फ्युज्ड. अरु आणि वैशूचे घरवाले तर आता त्यांच्या हाती छोटं खेळणं कधी येतय याचीच आस लावून बसले होते. लग्नानंतर जेव्हा अरुने लगेचच फॅमिली सुरू करण्याबद्दल वैशूचं मत विचारलं तेव्हा वैशू थोडी गोंधळलेली होती. फॅमिली आणि करिअर यापैकी कशाला प्राधान्य द्यायचं हे ती निश्चित करू शकत नव्हती. शेवटी मित्रमैत्रिणींच्या सांगण्यावरून तिने करिअरला प्राधान्य द्यायचं ठरवलं. अरुनेही तिच्या मताचा आदर राखत दोघांच्याही घरच्यांना समजावलं.

लग्न झालं होतं खर पण एकत्र राहण त्या दोघांच्याही नशीबी जणू काही नव्हतच. अरुच्या कामाच्या स्वरूपामुळे त्याला भारतातल्या भारतात बरेच फिरवे लागत असे. आठवडा आठवडाभर तो या ना त्या शहरात फिरत असे. त्यात त्याला अनिश्चित काळासाठी अमेरिकेला जाण्यास सांगण्यात आलं. खरं तर अरुला जायचं नव्हतं पण वैशूच्या सांगण्यामुळे तो अमेरिकेत आला. वैशूचाही एच-१ झाला होता. एकाच कंपनीत असल्यामुळे तीही त्याला लवकरच जॉईन करणार होती. पण तिची assingment या ना त्या कारणाने पुढे ढकलली जात होती. होता होता दिड वर्ष निघून गेल. रोज याहू वर वेबकॅम वर एकमेकांना पाहून दिवस ढकलत होते, पण प्रत्यक्षात पाहण्यासाठी डोळे आसुसलेले होते. नाही म्हणायला महिन्याभराच्या सुटटीवर अरु एकदा भारतात येऊन गेला पण सर्व नातेवाईकांना आणि घरच्या मंडळींना भेटण्यात तो वेळ कसा निघून गेला हे त्या दोघांना कळलही नव्हतं. शेवटी एकदाची वैशूला assignment मिळाली अन ती अमेरिकेला रवाना झाली. पण तरीही एकत्र राहण काही त्यांच्या नशीबी नव्हतच. आता अरुची नोकरी स्थिर तर वैशूच्या पायाला भिंगऱ्या लागल्या होत्या. तिला तिच्या नवीन क्लायंटच्या अमेरिकाभर असलेल्या लोकेशन्स वर फिरावे लागे. महिन्याचे कमीत कमी २ विकेंड्स तरी ती घराच्या बाहेर असे. त्यांच्याबरोबरच्या जोडप्यांना एक दोन मुलही झाली होती. प्ले ग्राऊंडवर खेळणाऱ्या त्या लहान मुलांना पाहून आपण करिअरला प्राधान्य देऊन काही चूक तर केले नाही ना अस वैशूला राहून राहून वाटे. आता वैशूलाही आई बनावसं वाटत होत, त्यामुळे ती जवळपास रोज अरुकडे त्याचा लकडा लावत होती. पण अरूचे मुलाला वाढवण्याबाबत काही स्पष्ट विचार होते.

" विचार तर मी केलाय आणि तुला तो सांगितलाही आहे" - अरु म्हणाला.
" अरे पण हे सर्व सांभाळून काहीच का करता येणार नाहीय?" - वैशू
" हे बघ, मुल झाल्यावर आई-वडील किंवा त्याचे आजी आजोबा यांचा पुर्णवेळ त्या मुलाला मिळालाच पाहिजे या मताचा मी आहे. त्याला इथे डे केअर मध्ये मी अजिबात टाकणार नाही. "
" मग बोलावून घेऊ ना आई दादांना नाहीतर माझ्या आई बाबांना"
" नाही मला ते पटत नाही" - अरु चहाचा कप सिंक मध्ये ठेवत म्हणाला
" ते मला ही माहीत आहे पण का ते तू कधीच सांगितल नाहीयस" - वैशू म्हणाली.
" बरं आज सांगतो. तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर आई दादांना बोलवायचं झालं तर ते येणार नाहीत. अगं माझी आई सातारच्या बाहेर एस.टी. ने कधी गेली नाही, ती विमानात बसून साता समुद्रापलीकडे कशी येइल? आणि ...."
" मग माझ्या आईबाबांना बोलावून घेऊ ना, ते नक्की येतील." - त्याचं बोलणं मध्येच तोडत वैशू म्हणाली
" हे बघ त्यांना इकडे हवापालट करण्यासाठी बोलावण्यासाठी माझी काहीही हरकत नाहीय. पण फक्त आपली मुल सांभाळायला बोलावण मला पटत नाही. भारतात असतो तर गोष्ट वेगळी होती. एक तर तू १५-१५ दिवस घराच्या बाहेर असतेस, माझी ही घरी परत यायची अशी निश्चित वेळ नाहीय. आजूबाजूलाही मिसळ्यासाठी कुणी नाही. घरातल्या घरात तरी किती दिवस काढणार ते?" - अरु एका दमात उत्तरला
" अरे माझे आईबाबा करतील माझ्यासाठी तेवढं "
" मला माहित आहे ते, एखादा आठवडा वगैरे ठीक आहे पण ३-४ महिने त्यांना इकडे बोलावून त्यांची घुसमट करण्याइतका स्वार्थी मी नक्कीच नाही. आणि समज जर का ते आले, त्यांनी ३-४ महिने त्यांनी काढले कसे तरी, तर ते परत गेल्यावर काय?"
" मग यावर काहीच उपाय नाही का?" - वैशूने जवळ जवळ रडवेल्या सुरात विचारलं.
" आहे. आपल्यापैकी एकाने मुलाला पूर्ण वेळ द्यायचा. कमीत कमी तो सजाण होईपर्यंत तरी"
" आणि मग माझं करिअर??" - वैशू
" तूच पुर्ण वेळ द्यावास अस मी म्हणत नाहीय. तुला करिअर वर लक्ष द्यायचं असेल तर मी नोकरी सोडतो. मी घराची संपूर्ण जबाबदारी पाहीन. हाऊस हसबंड म्हण हव तर "
" अरे काही काय बोलतोयस. लोक काय म्हणतील. बायको कमावतेय अन नवरा बसून खातोय. " - वैशू
" हे बघ वैशू, लोक काय म्हणतील याचा विचार मी कधीच केला नाही. "
" दोघांचं करियर सांभाळून काहीच का करता येणं शक्य नाहीय" - वैशू
" आहे, त्यासाठी आपण भारतात परत जायचं" - अरु म्हणाला
" अरे पण ते आपल्याला परवडणार आहे का? आजकाल मुलांची शिक्षणे किती महाग झालीत ठावूक नाही का तुला? वर्षाला दिड दोन लाख कुठेच गेले नाहीत. पैसे कमवायला म्हणून आलो ना आपण इथे. माझ्या विसा ची ३ तर तुझी २ वर्षे बाकी आहेत. अजून आपली पाहिजे तशी सेव्हिंगसुद्दा झालेली नाहीय" - वैशू
" हे बघ कितीही सेव्हिंग झाली तरी ती आपल्याला अपुरीच वाटणार. पैसा वाढतो तशा गरजा वाढतात माणसाच्या. आणि कोणी सांगितलय की महागड्या शाळेतच घालायला हव मुलांना. मी म्युन्सिपाल्टी च्या शाळेत शिकून आणि तू समर्थ विद्यामंदीर मध्ये शिकून आज आपण चांगल्या पोजिशनला नाही आहोत का? लक्षात ठेव बदकाला राजहंसाच्या बाजूला बसवलं तरी बदक ते बदकच आणि हिऱ्याला काचेच्या गोट्यांमध्ये ठेवलं तरी हिरा तो हिराच. फक्त या हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी आपल्याला पूर्ण वेळ देता आला पाहिजे" - अरू उत्तरला.
"भारतात गेल्यावर त्याला आपल्याला पूर्ण वेळ देता येइल?" - वैशू
" इकडच्या पेक्षा नक्कीच जास्त वेळ देता येइल. आपला पूर्ण वेळ जरी नाही मिळाला तरी आजी आजोबांचा वेळ त्याला नक्की मिळेल. इकडे डे केअरला टाकण्यापेक्षा ते नक्कीच चांगलं. इकडे म्हणे शाळेतच मुलांना त्यांचे आईवडील त्यांच्यावर ओरडले तर ९११ डायल करायला शिकवतात म्हणे. इकडे मूल हाताबाहेर जायला जास्त वेळ लागणार नाही. to be very frank मला या संस्कृतीत आपलं मूल वाढवायचं नाहीय. बुरसटलेल्या विचाराचा म्हण हवं तर मला, पण याबाबत मी माझी मतं तुला अगोदरच सांगितली होती. आज तुला त्यांची कारणही सांगितली. लग्नानंतर लगेच मूल न होऊ देण्याच्या तुझं मत मी स्वीकारलं होतं. आशा करतो की माझी मतेही तुला पटतील"
" इतकं फॉर्मल बोलायची काही गरज नाहीय.." असं म्हणून वैशूनं तो विषय तिथच संपवला.

रात्रभर वैशूच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. अरुचे विचार तिला कळत होते पण वळत नव्ह्ते. बराचं विचार केल्यावर तिचं मत पक्क झालं. पहाटे पहाटे कुठे तिचा डोळा लागला.

सकाळी डोळे उघडले तर आठ वाजून गेले होते. तितक्यात किचनमधून खडखडाट ऐकू आला म्हणून उठून ती किचन मध्ये गेली. अरू चहा करण्यात गुंतला होता.

" अरू "
" अरे उठलात राणी सरकार. मला वाटलं आज कामाला बुटटी मारताय की काय " - अरू आलं किसत म्हणाला
" बुटटीच मारणार होते, पण माझा विचार पक्का झालाय, तो मॅनेजरला सांगायला मी आज जाणार आहे" - वैशू उत्तरली.
" कसला विचार ग"
" नोकरी सोडायची किंवा भारतात परत जायचं यापैकी जे प्रथम होईल ते करायचं आणि लवकरात लवकर पाळणा हलवायचा " वैशू लाजत उत्तरली.
" अरे व्वा. काल सांगितलं असतस तर कालच सुरुवात केली नसती का, चल मारच दांडी तू. मी ही मारतो " डोळे मिचकावत अरु म्हणाला.
" चल चावट कुठचा " वैशू लाजत त्याच्या मिठीत शिरत म्हणाली
" चला राणीसरकार, जा दात घासा, चहा तयारच आहे "
" ही ही.. घासते रे बाबा. मी माझ्या मॅनेजरशी बोलते आणि तुला फोन करते. भारतात जायचं ठरलं तर तूही तुझ्या मॅनेजरशी बोलून घे"
" जशी आज्ञा राणी सरकार"

ऑफिसला येऊन सर्वप्रथम वैशू ने मॅनेजरला गाठले आणि तिचा निर्णय सांगितला

" वैशाली मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो. पण तुम्ही तुमचा निर्णय चार महिने पुढे ढकला. या नव्या assignment बद्दल मी तुम्हाला सांगणारच होतो आज. तुम्हाला या विकेंडलाच निघायचय न्यू यॉर्कला जायला. दोन महिने असणार आहात तुम्ही तिथं. बाकीच तुम्ही परत आल्यावर बघू " - मॅनेजर उत्तरला.

वैशूला हसावं की रडावं तेच कळेना.

Saturday, September 5, 2009

हे करून पहा.. मज्जाच मज्जा!!!

कधी कधी रस्त्यावर चालताना वा गाडी चालवताना विषय सुचतात, वाटतं आत्ता घरी गेल्यावर यावर पोस्ट लिहून टाकू. पण घरी येइपर्यंत ते काय होतं तेच आठवत नाही. तर कधी कधी काही विषय, काही घटना इतक्या छोट्या असतात की त्यावर (माझ्या कुवतीच्या लेखकाला) एक लेख शक्य होत नाही. म्हटलं की आज अशाच छोट्या छोट्या गोष्टींना एकत्र करुन काही लिहिता येतय का ते पाहू. यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या वेंधळेपणाच्या आहेत, तेव्हा हासू नका बरं आम्हास्नी :)

१. अकरावीला माझं कॉलेज घरापासून चालत २५ मिनिटांवर होतं. रोज चालत जायचो अन चालत यायचो. शायनींग मारायला माझी सायकल कधी येतेय याची वाट बघत होतो. म्हणजे घरच्यांनी सायकल घेऊन द्यायचं प्रॉमिस केलं होतं. दहावीला ८१% मिळाले होते ना (असं काय बघताय फडतूसासारख, १९९२ साली ते भरपूर होते बरं का). शेवटी एकदाची सायकल आली. दुपारी सायकलवरून गेलो कॉलेजला. संध्याकाळी निघताना रोजच्या गँगबरोबर बाहेर पडलो. अर्ध अंतर चालल्यावर लक्षात आलं.. आयला आपली सायकल कुठाय?? ती बिचारी तशीच कॉलेजच्या पार्किंग लॉट मध्ये आपल्या धन्याची पाट बघत होती.

२. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यासारखं कंटाळवाणं काम कुठलं नसेल. पण जन रीत म्हणून करावं लागतं. अशाच एका सकाळी मी ब्रश करायला सुरुवात केली. बश करताना मी जवळ जवळ अर्ध्या झोपेतच असतो. तसाच त्या दिवशीही होतो. ब्रश करताना काहीतरी वेगळं वेगळं जाणवत होतं. जरा डोळे उघडून नीट बघितलं.... त्या दिवशी वापरली गेलेली टूथपेस्ट होती.... पामोलिव्ह शेविंग क्रिम.... पामोलिव्ह दा जवाब नही...

३. मुंबईत नाल्याच्या बाजूला भैय्याच्या बरबटलेल्या हातांनी बनवलेली पाणीपुरी खाणारा मी इकडे अमेरिकेत आल्यापासून पाणी मात्र विकत आणून पितो (माज चढलाय, दुसरं काय). पाच गॅलन ची ३ कॅन्स भरून आणतो. पुरतात २-३ आठवडे. एकदा भरलं पाणी आणि मग लक्षात आलं कि पैशाचे पाकीट घरीच विसरलो. मग काय, ट्रॉली लावली कोपऱ्यात, गेलो घरी, आणलं पाकीट .. बरं एकदा करून शिकायचं की नाही? ही गोष्ट मी ३-४ वेळा केलीय. शेवटी मी गाडीतच थोडे पैसे ठेवायला सुरुवात केली.

४. हे मी केलेलं नाहीय (हुश्श्श, बरं वाटलं बाबा). शाळेत असताना आम्हाला भूगोलात कस्तुरी मृगावर एक धडा होता. कस्तुरीमृगाच्या बेंबीत कस्तुरी असते म्हणे. परिक्षेत कस्तुरीमृगावर टीप लिहा म्हणून प्रश्न होता. त्यात माझ्या एका वर्ग मित्राने लिहिलं होतं.... कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरीची डबी असते... आणि तो पेपर आमच्या मॅडम नी वर्गात वाचून दाखवला होता :) मी पण असला करामाती प्रकार केलाय पण सर्वांसमोर नाही :) कुठल्या तरी शिक्षक दिनी मी गणितातली समीकरणे शिकवणार होतो. त्याची आदल्या दिवशी प्रॅक्टिस करत होतो. आई, वडील आणि मुलाचं समीकरणे वापरून वय काढायचं होतं. माझ्या समीकरणाने मला मुलाचं वय २५ वर्षे, आईचं वय १३ वर्षे आणि वडीलांचं वय ६-७ वर्षे असं काहीतरी दिलं होतं :)

बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आता आवरतं घेतो :) आहे का मला कॉम्पिटिशन देणारा कुणी???

Thursday, September 3, 2009

इट्स माय कप ऑफ टी!!!!!!

दिड आठवड्याच्या सुटटीत सगळ्यात जास्त कोणती गोष्ट मिस केली असेल तर ती म्हणजे सकाळ आणि संध्याकाळचा चहा. इकडे बे एरियात फुटा फुटाला देसी रेस्टॉरंट्स आहेत पण ज्या अमेरिकन खेड्यात गेलो होतो तिकडे एकही नव्हतं. एखाद्या अटटल दारुड्याला आठवडाभर दारु न मिळाल्यास त्याची जी अवस्था होईल त्याहीपेक्षा वाईट अवस्था माझी झाली होती. नाही म्हणायला चहाच्या वेळेला कॉफी ढकलत होतो गळ्याखाली, पण सकाळ संध्याकाळ चहा ढोसण्यात जी मजा आहे ती कॉफी ढोसण्यात नाही. तुलनाच करायची झाली तर ते विलायती दारुची तहान हातभटटीच्या दारूवर भागवण्यासारखे होते.

प्रवीण पाताडे उर्फ मी म्हणजे अटटल चहाबाज. १९९८ ते २००१ च्या दरम्यान दिवसाला जवळपास १६-१७ कप चहा सहज रिचवणारा माणूस. आयुष्यात सुपारीच्या खांडाचही व्यसन नाही, पण चहा म्हणजे जीव की प्राण. १९९८ च्या अगोदरही मला चहा आवडायचा पण दिवसाला दोन कप, घरी जेव्हा बनत असे तेव्हाच. १९९८ ला घरापासून दूर बंगलोरला सॉफ्ट्वेअर इंजिनीअर म्हणून विप्रो कंपनीत रुजू झालो. कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांसाठी २४ तास चहाची सोय करून ठेवली होती (हो, तेव्हा विप्रो आतासारखी चिंधीगिरी करत नव्हती ). सकाळी ९ ते ६ कँटीन मध्ये चहा मिळायचा आणि रात्री २ मोठे थर्मास प्रत्येक फ्लोअरवर ठेवायचे. त्यापैकी सकाळी ९ चा आणि दुपारी २ चा चहा कँटीन वाला नायर जागेवर आणून द्यायचा. माझ्या मते तो मी माझ्या आजवरच्या आयुष्यातील प्यालेला सर्वोत्तम चहा होता. त्यामुळे रात्री कितीही उशीर झालेला असला तरी तो चहा पिण्यासाठी मी ९ च्या आत ऑफीसला टच होत असे. काम करता करता मी पार्ट टाईम एम.एस. सुद्दा करत होतो. दिवस कामात (आणि टी ब्रेकमध्ये) कसा निघुन जायचा ते कळायचं नाही, त्यामुळे रोज रात्रभर जागून अभ्यास करणे भाग असायचे. मग संध्याकाळी सहा ते रात्री दोन अडीज पर्यंत जवळपास तासाला दोन या हिशेबाने मी चहाचे कप रेटायचो.

मग जणू ते व्यसनच जडलं. पहिला प्रॉब्लेम २००१ मध्ये जेव्हा मी कॅनडाला गेलो तेव्हा आला. जाताना मी चहा पावडर वगैरे घेऊन गेलो होतो. सकाळ संध्याकाळ घरी चहा व्हायचा पण ऑफीसमध्ये पंचाईत व्हायची. मग तिकडे लिप्टनची डिप चहा प्यायचो, पण त्याने तलफ काही जायची नाही. हळू हळू घरातली पावडरही संपली. देसी स्टोर १०-१५ मैलांवर होतं आणि माझ्याकडे गाडी नव्हती. टी टाईम मध्ये मी लिटरली फ्रस्ट्रेट होत असे. मी तिकडच्या एक गोऱ्याला मस्करीत म्हटलही होत की कसला देश आहे तुमचा, साधी चहा मिळत नाही इथे. त्या माणसाने देसी स्टोर शोधून माझ्या वाढदिवसाला रेड लेबल चहाचा मोठा पॅक आणून दिला होता. माझ्या मते ते आजवरचं सर्वात बेस्ट बर्थ डे गिफ्ट आहे.

कॅनडाच्या ट्रिपमुळे माझं चहाचं प्रमाण ४-५ कप वर आलं होतं, पण चहा पिणं मला अतिशय आवडू लागलं होतं. कोणीही दिवसाच्या कुठल्याही वेळेला चहाचं आमंत्रण दिलं तर मी ते आनंदाने स्वीकारत होतो. माझ्या बायकोने जेव्हा ती माझी गर्ल्फ्रेंड होती तेव्हा विचारलं होतं कि तुझ्या आयुष्याच्या प्रायोरिटिज काय आहेत. मी म्हटलं की चहा, बाईक, फोटोग्राफी फ्रेंड्स/फॅमिली आणि काम.
"मग माझा नंबर कुठे लागतो" - आमच्या (तेव्हा नसलेल्या) सौ.
मी म्हटलं, " बाईक नंतर... "
नंतर काय झालं ते तुम्ही ओळखलं असेलच :) आमच्या घरात किचनमधली मी उचललेली एकमेव जबाबदारी म्हणजे चहा बनवणं :) सध्या चहाचं प्रमाण दिवसाला २-३ कपांवर आलय, पण आजही चहा माझा जीव की प्राण आहे आणि कोणी ऑफर केला तर मी आजही नाही म्हणत नाही. कुठल्याही लॉन्ग ड्राईव्ह ची मजा टपरीवर चहा प्याल्याशिवाय येत नाही, पण दुर्दैवाने इकडे चहाच्या टपऱ्याच नाहीत. त्यामुळे दिड आठवडा मी चहासाठी वखवखलेला होतो (वखवखलेला शब्द प्रयोग चालेल ना?) कोणी सांगितलं असतं की याचा खून कर मी तुला चहा देतो तर मी खूनही केला असता (भावना लक्षात घ्या, मी काही खून वगैरे करणार नाहीय:)). त्यामुळे दिड आठवड्यानंतर आल्यावर घरात पहिली गोष्ट कोणती झाली असेल तर ती म्हणजे चहा टाकणं, आणि हो, हा चहा माझ्या बायकोनं टाकला होता :)

Wednesday, September 2, 2009

साक्षरता निर्मूलन

दिड आठवड्याच्या मस्तपैकी सुटटीमुळे काही पोस्ट करता आलं नव्हतं, त्यामुळे क्षमस्व ( वाचक माझ्या पोस्ट्स ची आतुरतेने वाट बघतात अशातला काही भाग नाहीय, पण असं लिहिलं कि स्वत:लाच कसं बरं बरं वाटतं :) ). टॉपिक वर जास्त लक्ष देऊ नका. कळेलच का दिलाय असला उरफाटा टॉपिक :)

काही दिवसांपूर्वी ’आयुष्यावर बोलू काही’ च्या ५०० व्या प्रयोगात ’निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटातील एक गाणं सादर करण्यात आलं होतं. apalimarathi.com वर हा चित्रपट पाहण्याचा योग आला. सरकारतर्फे तीन वर्षे गावा गावांत राबवण्यात आलेला प्रौढ साक्षरता कार्यक्रम आणि त्यासाठी हक्काच्या दावणीला बांधलेल्या गुरांची अर्थात शिक्षकांची होणारी ससेहोलपट या बद्द्ल हा चित्रपट आहे. निरक्षर शोधणे, सकाळ दुपार मुलांची शाळा चालवून रात्री ८ ते १० मोबदला न घेता हे साक्षरतेचे वर्ग घेणे या सर्व जबाबदाऱ्या शिक्षकांवरच टाकण्यात आलेल्या असतात. तीन वर्षांत एकही निरक्षराला साक्षर न करता आल्यामुळे बहिर्मुल्यमापनावेळी (स्पेलिंग बरोबर आहे ना) ते शिक्षक आणि गावकरी कशी वेळ मारुन नेतात याचं विनोदी ढंगाने चित्रण करण्यात आलय. काही अपवाद वगळता हा चित्रपट एकदा बघणेबल झालाय.

या लेखाचा हेतू चित्रपट परिक्षण हा नसून त्या निमित्त तशाच जुन्या आठवणी चाळवणे हा आहे. मी बहुतेक पाचवीला असताना आमच्या शाळेतर्फेसुद्धा साक्षरता अभियान राबवण्यात आले होते. पाचवीला पुजल्याप्रमाणे सरकारने शाळांना, शाळेंनी शिक्षकांना आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या कामाला जुंपले होते. या अभियानासाठी माझ्यासारख्या हुशार मुलांची निवड करण्यात आली होती. साक्षरता अभियानाचे निरक्षरता निर्मुलन हे ध्येय होते. या बाबतीत माझा नेमका घोळ व्हायचा. कुठले तरी शिक्षणमंत्री या अभियानाचे इन्स्पेक्टर म्हणून आले असताना आमच्या मुख्याध्यापकांनी लंबे चौडे भाषण ठोकुन भाषणाच्या मधेच विचारले होते,
" तर सांग पाताडे, आपण कुठलं अभियान करतोय आणि त्याचं ध्येय काय?"
" निरक्षरता अभियान अन त्याचे साक्षरता निर्मुलन हे ध्येय.." - द ग्रेट पाताडे उत्तरले.
नशिबाने त्या अभियानाचे धोरण बदलण्याचा मला प्रसाद खावा लागला नव्ह्ता. आता या साक्षरता अभियानासाठी निरक्षर शोधणं हा मोठा प्रॉब्लेम होता. म्हमै सारख्या शहरात निरक्षर आणायचे कुठून? तरी नशीबाने माझ्या मित्राची आजी निरक्षर होती. व्हय नाय करत म्हातारी एकदाची शिकायला तयार झाली होती. एक आठवडा घातल्यानंतर म्हातारीला अ लिहायला येवू लागला. माझे शिकवण्याचे आणि म्हातारीचे शिकण्याचे patience संपले होते. शाळेतर्फे बऱ्याच दिवसात या बद्दल न विचारल्याने एका दिवशी माझं शिकवणं आणि म्हातारीचं शिकणं थांबलं. त्यानंतर काहीच झालं नाही.

आज जेव्हा विचार करतो, तेव्हा असं वाटत की काय मिळवलं सरकारनं कर भरणाऱ्या लोकांचा पैसा असा उधळून? काय फायदा होणार होता ह्या म्हाताऱ्यांना शिकवून ? कुठे नोकरी धंदा करणार होते? कुठलाही मोबदला न देता शिक्षकांना या कामाला जुंपणं कितपत योग्य? हे अभियान संमत करण्याअगोदर तेव्ढ्या बजेट मध्ये किती गरजू विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं असतं याचा कुणीच विचार केला नव्ह्ता? मुंबईत किती साक्षर झाले ते माहित नाही पण एके दिवशी बातमी आली कि सिंधुदुर्ग जिल्हा १०० % साक्षर झाला म्हणून. ही गोष्ट साधारण १९८७ मधील असेल. आजही मी कमीत कमी १००० स्थलांतर न केलेले निरक्षर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखवू शकतो. त्यावरून अजून एक आठवलं. दोन तीन दिवसापूर्वी सकाळ मध्ये एक news प्रसिद्ध झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नववीतल्या १४७१६ मुलांना मोफत लॅपटॉप वाटण्यात येणार आहेत म्हणून. अरे काय चालवलय काय? काय करणार आहेत नववीची मुलं लॅपटॉप घेऊन? आणि फक्त नववीचीच का? दहावी अकरावीची का नाहीत? किंवा जी मुले पदवीधर होऊन नोकर्‍या शोधायला बाहेर पडतील ती का नाहीत? संगणक प्रशिक्षणच द्यायचे असेल तर तेवढ्या लॅपटॉपच्या किमतीत नवीन किंवा जुने डेस्कटॉप घेऊन पुर्ण सिंधुदुर्ग जिल्हा संगणक साक्षर करता आला असता. ज्याने हा प्रकल्प मंजूर केला त्याला माझ्या मते लॅपटॉप आणि डेस्कटॉप यातला फरकही कळत नसणार. ज्याची लायकी नाही ती माणसे पदावर बसतात. खेळाडू नसलेले क्रिडामंत्री काय होतात, अंगठेबहाद्दर शिक्षणमंत्री काय होतात, कशाला कशाचाच मेळ नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं कि यांना आपणच निवडून देतो. ऑप्शन्सच नसतील तर आपण तरी काय करणार म्हणा. नो वंडर तरुण पीढी निवडणुकांवर बहिष्कार टाकते.

चला लेख कुठेतरी भरकटत चाललाय. लेखाला सुरूवात केली तेव्हा आता जे उतरलय पोस्ट मध्ये ते सांगायचे नव्हते आणि नक्की काय सांगायचे आहे ते नेमके आता सुचत नाहीय. पब्लिश करणार नव्हतो, पण कि बोर्ड वर दिड तास टकटकाट केलाय म्हणून पब्लिश करतोय. क्रुपया गोड मानून घ्या.