Friday, April 30, 2010

फोर्ट ब्रॅग

माझी मोटरसायकल बहुतेक माझ्यावर रुसली होती. हजार वेळा स्टार्ट करूनदेखील स्टार्ट होत नव्ह्ती. जॉय आणि मी होण्डा व्ही टी एक्स १३०० एस चे सगळे फोरम्स वाचून काढले होते. स्पार्क प्लग बदलले, धक्का स्टार्ट, जम्प स्टार्ट करायचा प्रयन्त केला, पण तरीही ती सुरू होईना. शेवटी जॉय ने पेटकॉक पासून निघालेला छोटा वॅक्युम पाईप पाहिला. तो पुन्हा जोडल्यावर ती फुरफुरत स्टार्ट झाली. बहुतेक आठवडाभर बाहेर न नेल्यामुळे रुसली होती. म्हणून विकांताला तिला कुठेतरी लांब फिरायला न्यायचं ठरवलं.

जॉय/प्रिति आणि पियुश यांनी जवळपास २०० मैलांवर असलेल्या फोर्ट ब्रॅग येथे जायचं ठरवलं. शनिवारी भल्या पहाटे ९:३० वाजता जॉयच्या घरी भेटायचं ठरलं. इतर राईड्स प्रमाणे ही राईड मध्यरात्री ६:०० वाजता सुरु न झाल्याने मी तसा आनंदी होतो :) जॉयच्या घरी जॉयचा मित्र वैभव याने बनवलेली ऑम्लेट्स आणि कॉफी हादडून शेवटी ११:३० ला आमची राईड सुरु झाली. हो ना करत शेवटी वैभव, पूजा आणि त्यांची क्युट ८ महिन्यांची मुलगी सिमी कारमधून आमच्या बरोबर यायला तयार झाले. जॉय/प्रिती त्यांच्या १८०० सीसी च्या होण्डा गोल्डविंग वर, पियुश त्याच्या होण्डा व्हीएफ़ार ८०० सीसी वर आणि मी माझ्या होण्डा व्हीटीएक्स १३०० सीसी वर असा आमचा लवाजमा निघाला.


सुरुवातीला मुक्तमार्ग १०१ वर जवळपास २ एक तास चालायचं होतं. मुक्तमार्गावर मोटरसायकल चालवणं यासारखं बोरिंग काम या जगात दुसरं कोणतच नसेल. सुरुवाती सुरुवातीला हाय स्पीड ची मजा वाटायची पण आता नाही :( त्यात १०१ मार्गावर या हाय स्पीड मुळे माझं इंजिन कव्हर निखळून पडलं. बहुतेक स्पार्क प्लग लावल्यावर मी घट्ट बंद केलं नव्हतं. मी बाकिच्यांना थांबायला सांगेपर्यंत आम्ही जवळपास अर्धा पाऊण मैल पुढे आलो होतो. मुक्तमार्गावर मागे जाऊन रस्त्याच्या मधोमध पडलेलं कव्हर उचलणे म्हणजे मरणाला स्वत:हून मिठी मारण्यासारखं होतं, म्हणून शेवटी तसच पुढे जायचं ठरलं. त्यात माझ्या मोटरसायकलची पेट्रोल टाकीची क्षमता फक्त ५ गॅलन (जवळपास १९ लिटर) आहे. पुढे घाटात पेट्रोलपंप असेल की नाही याची गॅरण्टी नव्हती, त्यामुळे आमचं दिसला पम्प की भर पेट्रोल असं चालू होतं.

शेवटी एकदाचा १०१ मुक्तमार्ग संपला. आम्ही दुपारचा लंच केला आणि हाय्वे १२८ च्या घाटाला लागलो. आता फोर्ट ब्रॅग येईपर्यंत या घाटात चालायचं होतं. दोन्ही बाजूला दाट झाडी आणि वळणावळणांचा रस्ता, आत्ता कुठे राईडची मजा यायला सुरुवात झाली होती. पियुश एकदम धूम स्टाईलने पुढे दिसेनासाही झाला. बाकीच्या तीन गाड्या एकत्र चालल्या होत्या. शेवटी एका जागेवर पियुश आणि आम्ही एकत्र आलो आणि फोटो सेशन सुरु केलं.


जवळपास २४० मैल चालवल्यावर आम्ही फोर्ट ब्रॅगला पोचलो. फोनवर बुक केलेलं मोटेल बाहेरून तरी आमच्या पसंतीस उतरलं नव्ह्तं. पण दुसरी काही व्यवस्था होण्यासारखी नसल्यानं आम्ही तिथेचं राहायचा निर्णय घेतला. त्या माणसाने पर नाईट रेट म्हणून ६५ डॉलर लिहिला. प्रिती ने सांगितलं कि फोनवर ४५ सांगितलं होतं, तेव्हा त्याने ६५ खोडून ४५ लिहिलं :) रूम्स ठिकठाक होत्या. बाहेर पार्किंगमध्ये मला एक इंटरेस्टिंग हार्लेचा साईड स्टॅण्ड दिसला. तुम्हीही पहा :)संध्याकाळी आम्ही जवळच्याचं ग्लास बीचला सनसेट पाहण्यासाठी गेलो होतो. त्या ग्लासबीच वर एक बीअरची बाटली वगळता दुसरा कुठलाही ग्लासचा तुकडा दिसला नाही. सनसेट पाहून आणि थोडे फोटो काढून आम्ही मोटेलवर परतलो.
रात्री जेवणानंतर गप्पा मारता मारता झोपी गेलो. त्या जागेवर बीचवर जाण्याव्यतिरिक्त दुसरे करण्यासारखे काहीही नव्हते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोणतातरी वेगळा मार्ग पकडून घरी जायचं ठरलं.

सकाळी जवळच्याच एका रेस्टॉरंट मध्ये एकदम पोटभरून नाश्ता झाला. नाश्ता केल्यावर आम्ही आमच्या मार्गी लागलो. नवीन रस्ता देखील घाटाघाटांचा आणि दोन्ही बाजूला गर्द झाडी असणारा होता. जवळपास अर्धा तास चालल्यावर एका जागी फोटो शूट साठी थांबलो. कॅमेरा घेण्यासाठी टॅंन्क बॅग काढायला गेलो आणि पाहतो तर काय, टॅंन्क बॅग नव्हतीच पेट्रोलच्या टाकीवर. थोडक्यात मी ती रेस्टॉरंट मध्येच विसरलो होतो. माझ्या बाईकवर जाण्यापेक्षा ट्विस्टीमास्टर पियुशच्या बाईकवर जाणे हा वेगवान मार्ग होता. मी आणि पियुश परत गेलो आणि बाकीची जनता तिथेच फोटो काढत थांबली. माझ्या नशीबाने रेस्टॉरंटवाल्यांनी ती बॅग जपून ठेवली होती. पियुशच्या बाईकवर गेल्यामुळे आम्ही अर्ध्या तासाचा रस्ता जवळपास वीस मिनिटातच कव्हर केला :)

परत येताना आम्ही क्लिअर लेक स्टेटपार्क मध्ये थोडा वेळ थांबलो. नंतर पुढचे ६० मैल आम्ही एकमेकांच्या बाईक्स चालवल्या. मी जॉयची, जॉयने पियुशची आणि पियुशने माझी बाईक चालवली.नंतर घरापर्यंतची राईड पुन्हा मुक्तमार्गावरची असल्याने बोरिंग होती :( रात्री ८:३० वाजता आम्ही घरी पोचलो. जवळपास ५२५ मैलांची आम्ही दोन दिवसांत रपेट केली. दुर्दैवाने माझा फोटोशॉप असलेला लॅपटॉप खराब झाला असल्याने अजून फोटो प्रोसेस केलेले नाहीत. वरच्या फोटोंचं क्रेडिट जॉय आणि प्रितीला जातं :)

तर पुन्हा भेटू असेच... कधीतरी.... कुठेतरी ...