Tuesday, April 24, 2012

तूफान - ए - तेंडूलकर

सचिन रमेश तेंडूलकर उर्फ देवबाप्पांचा आज वाढदिवस. तसं मी त्याला शब्द्श: देवत्व बहाल करत नाहीय पण २२+ वर्षांची दैदिप्यमान कारकिर्द, १०० १००, अगदी श्रीकांत, अझर च्या खांद्याला खांदा लावून मैदान गाजवण्यापासून त्याच्या पदार्पणात अगदी लंगोटात असणाऱ्या वा जन्मालाही न आलेल्या खेळाडूंच्या खांद्यावर कौतुकाची थाप मारत त्यांच्यापेक्षा तसूभरही कमी नसलेल्या कारकिर्दीच्या मालकाकडे दैवी शक्ती नसेल यावर कुणाचा कसा विश्वास बसावा.

आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एका ’तुफानी’ खेळीची सकाळपासून आठवण येत होती. म्हटलं की त्याच निमित्ताने २०१२ मधली आपली पहिला रन (उर्फ पहिली पोस्ट) काढावी.

नेमेची येतो पावसाळा प्रमाणे नेहमी प्रमाणे भारताला फायनलला पोहोचण्यासाठी ह्याने त्याला इतक्या रनरेटने हरवलं, त्याने ह्याला नाही हरवलं असली क्लिष्ट आकडेमोड करत ऑस्ट्रेलियाने केलेल्या २८४ धावांपैकी २५२ धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाची बॅटिंग चालू असताना आम्ही गल्लीत तुफानी बॅटिंग करून घेतली. घरी गेल्यावर टीव्ही वर पाहिलं तर बेव्हन नेहमीप्रमाणे झोडत होता. बहुतेक शेवटच्या बॉलवर चौकार मारून त्याने शतक पूर्ण केलं होतं.

२८४ बघून आता कसले जिंकतोय आणि फायनलल जायला कसले २५२ करतोय असं वाटायला लागलं होतं. भारताने जवळपास ३० षटकात १३८ वर ४ विकेट पाडून हमारा शक जवळपास यकीन मे बदलवला होता. तेवढ्यात त्या मैदानाच्या दिशेने एक वादळ आलं. खेळ थांबला. सगळे खेळाडू त्या वादळाची धूळ डोळ्यात जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होते. कुणी टोपी डोळ्यासमोर धरत होते तर कुणी टी-शर्ट ने चेहरा झाकत होते. कुणीतरी एकाने तर कुला वर करून मैदानावरच बसकण मांडली होती. तेवढ्यात कॅमेरा सचिनकडे वळला. तो एक हात कमरेवर ठेवून दुसऱ्या हाताने बॅट धरून तो वादळाच्या डोळ्यात डोळे भिडवून उभा होता. जणू त्याला सांगत होता, बस्स, इतकीच तुझी शक्ती?? आता बघच, तूफान - ए - तेंडूलकर काय असतं ते.

खेळ सुरू झाला तेव्हा टारगेट बदललं होतं. आता जिंकण्यासाठी ४६ षटकांत २७६ धावा करायच्या होत्या तर फायनलला जाण्यासाठी २३७ धावा करायच्या होत्या. सचिनच्या साथीला त्यावेळी व्हेरी व्हेरी नवीन असलेला लक्ष्मण होता. सचिनच्या बॅटमधून चेंडू गोळीसारखे निघू लागले होते. जिथे चौकार जाईल तिथे त्याने षटकार ठोकले, २ धावांच्या जागी चेंडूला सीमापार पाठवले आणि जिथे १ धाव होती तिथे धावून २-२ धावा घेतल्या. सहास सचिन मैदानावर शांत असतो पण एकदा कॉल दिल्यावर धावला नाही म्हणून तो कधी नाही तो त्या लक्षमणवरही तो ओरडला. त्याकाळी २०-२० आलं नव्हतं. षटकामागे ९-१० चा रनरेट त्याकाळी अशक्य वाटायचा. गावस्कर म्हणाला की आता लिट्ल मास्टरही ही मॅच भारतासाठी जिंकू शकणार नाहीय. त्यांनी गपचूप २३७ वर लक्ष केंद्रीत करावं. पण सच्याचा इरादा वेगळाच होता. २३७ च लक्ष तर कधीच पार झालं होतं. आता तो २७६ पार करायच्या इराद्याने खेळत होता. पण त्याचवेळी भारताचा सुख दु:खाचा साथी स्टीव बकनर धावून आला. (हा @#$@#$ नसता तर सचिनचं १०० १०० कमीत कमी दोन वर्ष अगोदर पूर्ण झाले असते.) ह्या माणसाने जो चेंडू नो बॉल आहे हे एखादं शेंबडं पोरही सांगू शकलं असतं त्या चेंडूवर सचिनला झेलबाद दिलं.

सचिन १४३ धावांवर बाद झाला तेव्हा ३ षटकात ३४ धावा हव्या होत्या, पण लक्ष्मण आणि कानिटकरांच्या ह्रुषिकेशने फक्त ८ धावा जमवल्या त्याही एकही चौकार/षटकार न मारता. ही मॅच हरल्याची परतफेड सचिनने बरोबर दोनच दिवसात फायनल जिंकून करून दिली. स्टीव वॉ ने आम्ही एका ग्रेट प्लेयर कडून हरलो आहोत असं म्हणत उरलेल्या संघाची चार चौघात उतरवली होती. आज सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याला इतकच सांगण आहे की सचिन जे लोक तुला निवृत्त व्हायला सांगत आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता असाच खेळत राहा. ज्या दिवशी तू निवृत्ती जाहीर करशील त्याच दिवशी मी देखील क्रिकेट बघण्यापासून निवृत्ती जाहीर करणार आहे.

त्या सामन्याचा धावफलक इथे पाहता येईल. http://www.espncricinfo.com/ci/engine/match/65773.html

Tuesday, November 22, 2011

झोप!!!!!

शनिवारी रविवारी वा एखाद्या लाँग विकेंडला जर का कुठे भटकंतीचा बेत नसेल तर जास्तीत जास्त कसं काय झोपता येईल याचाच विचार मनात असतो. तशी माझी झोप म्हणजे कुठेही खुट्ट झालं कि डोळे खाडकन उघडणारी त्यामुळे गाढ झोप येणारयांची मला जरा असुयाच वाटते. पण तरीही झोपणे हा माझा फेवरेट टाईमपास आहे :) तसंच एकदा झोपल्यावर पुढच्या दिवशी मी अलार्म न लावताही उठू शकतो. म्हणजे तसा मी अलार्म लावतोच आणि अलार्म वाजायच्या २ मिनिटं अगोदर उठून तो वाजल्यावर स्नूझ करून पुन्हा १०-10 मिनिटं झोपतो. असं जवळपास ४-५ वेळेला झाल्यावर एकदाचा उठतो. गरज पडल्यास रात्री कितीही वेळ मी जागू शकतो पण सकाळी उठण्यासाठी तितकंच सॉलिड आमिष असल्याशिवाय उठणं शक्यच नाही. लहान असताना सुद्धा घरचे परीक्षेचा अभ्यास करायला भल्या पहाटे उठवायचे पण पुस्तकातले काही दिसले असेल तर शप्पथ. एक वाक्य वाचता वाचता मन ब्रम्हांडाच्या चार फेऱ्या मारून यायचं पण पुस्तकातले ते एक वाक्य काही डोक्यात घुसायचे नाही. नशिबाने शाळा घराच्या जवळच होती. धावत जास्तीत जास्त २ मिनिटांत मी शाळेत पोहोचायचो. ७ ला शाळा भरून प्रार्थना वगैरे होऊन ७:३० ला सुरु व्हायची आणि मी ६:३५ ला उठून अंघोळ करून तयार होऊन चहा पिऊन ७ च्या जरा अगोदरच शाळेत पोचायचो.

कामानिमित्त बंगलोरला असताना एक रूम आम्ही तिघांनी मिळून शेअर केला होता. तिघंही एकाच ऑफिस मध्ये असल्यामुळे एकत्रच निघायचो. त्यामुळे आम्ही रोज पहिलं, दुसरं कोण उठणार याचे दिवसच ठरवून ठेवले होते. एखाद्याच्या पहिलं उठायच्या दिवशी सुट्टी आली तर तो लकी. मी व्यवस्थित उठून तयार व्हायचो पण हे दोघं #$#@ कधीच XX वर लाथा खाल्याशिवाय उठायचेच नाहीत. त्यांना रोज उठवून ते तयार होईपर्यंत मी पुन्हा झोपायचो :) शुक्रवारी रात्री ऑफिस नंतर सिनेमे बघून डीनर करून कमीत कमी ४०-५० किमी मोटरसायकल वर चढवल्यावर कधीतरी पहाटे ३-४ वाजता आम्ही झोपायचो. शनिवारी दुपारी १-२ च्या सुमारास कधीतरी पोटातल्या कावळ्यांनी चोची मारून उठवल्यावर उठायचो. सुखसागर मध्ये जाऊन मस्त पैकी एक थाळी आणि एक लस्सी मारून परत यायचो. दुवायचे कपडे सर्फ एक्सेल मध्ये गरम पाण्यात बुडवायचो आणि पुन्हा तंगड्या वर करून ताणून द्यायचो ते पुन्हा सात आठ वाजल्याशिवाय उठायचो नाही. मग भिजत टाकलेले कपडे साफ पाण्यातून खंगाळून काढून सुकत टाकायचे आणि पुन्हा रात्रीचे भटकायला मोकळे. रविवारी शक्यतोवर दुपारी न झोपण्याचा प्रयत्न करायचो, पण डोळे हे जुलमी गडे, ते ऐकायचेच नाहीत.

अमेरिकेत आल्यावर सुद्धा शक्यतोवर मी झोपायचा प्रयत्न करतो परंतू लग्नानंतर वाढलेल्या प्रापंचिक जबाबदारीमुळे वाटेल तेवढे झोपता येत नाही. त्याचा साइड इफेक्ट म्हणून ६ वर्षानंतर सुद्धा माझा जेटलॅग कायम आहे. दुपारी असली झोप येते म्हणून सांगू. पण पापी पेट का सवाल असल्यामुळे जुलमी डोळ्यांच्या पापण्यांना एकमेकांना भेटू न देण्याची कसरत करावी लागते. या झोपेचा अजून एक पैलू म्हणजे झोपल्यावर पडणारी स्वप्नं. सुरुवातीची काही वर्ष माझ्या मेलच्या सिग्नेचर Your future depends on your dream वा झोप आहे तर होप आहे अशा असायच्या:) मागे कुणाचा तरी झोपेवराचा लेख वाचत होतो. त्यात लेखिकेच्या भावाला त्याचे वडील उठवत होते तर तो पठ्ठ्या वडीलांना म्हणतो कसा, " बाबा अजून पाचच मिनिटं, स्वप्न पडतंय.." :) तर अशी स्वप्न मला रोज रात्री न चुकता पडतात आणि शेंडा ना बुडखा असलेल्या या स्वप्नांचा सिनेमा मी मस्त एन्जॉय करतो. ४-५ दिवसांपूर्वीच मला एक सॉलिड स्वप्न पडलं होतं. भगतसिंग, सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, अण्णा हजारे आणि मी एकाच तुरुंगात आहोत. तुरुंगात गप्पागोष्टी करताना भगतसिंग त्यांची hat तर सुभाष बाबू त्यांचा चष्मा मला भेट म्हणून देतात आणि या दोन्ही गोष्टी मी ebay वर विकतो :)

काही वर्षापूर्वी मला सगळी स्वप्नं जशीच्या तशी लक्षात राहत. अगदी मध्येच डोळे उघडले आणि मी ते पुन्हा मिटले तर तेच स्वप्न पुढे कंटिन्यू पण होई. पण आजकाल (बहुतेक वय वाढत चालल्याने) ती लक्षात राहत नाहीत. पण तरीही माझा जोपायाचा उत्साह काही कमी झालेला नाही. आता ४ दिवसांचा thanksgiving चा विकेंड आहे. चार दिवसांपैकी कमीत कमी ३ दिवस झोपायचा बेत आहे. बघुया कितपत शक्य होतंय ते :)

Tuesday, May 10, 2011

जय बजरंगा हुप्पा हुय्या !!!!

"काय रे तुका आव्स बापूस खाव्क घालित नाय काय"

"ह्येची हाडाची काडा नी **चा तुनतुना"

"अर्रे बाबा, जास्त धावूबिवू नुको, वाऱ्यान उडान जाशी..."


घरी येणाऱ्या अतिथी देवोभवांकडून अशी अनेक मुक्ताफळे ऐकल्यावर आपण लाईट्वेट चॅम्पियन असल्याबद्दल स्व:ताचा खूप राग येई. भरपूर पेट्रोल पिऊनही १५ च्या स्पीडने जाणाऱ्या गाडीसारखी आमची बॉडी. कितीही खा पण अंगावर चरबी चढायची नाही म्हणजे नाही. व्यायामाच्या नावाने आनंदच होता. एक तर आमच्या खानदानाची हाताच्या बोटावर मोजण्याइतकी संपत्ती असल्यामुळे जिम परवडायची नाही आणि दुसरं म्हणजे पायावर डंबल पडला तर काय घ्या त्यामुळे जिमच्या वाट्याला गेलोच नाही. नाही म्हणायला उन्हाळ्याच्या सुट्टीत लवकर उठून जॉगिंगला जाणं हा व्यायाम दरवर्षी व्हायचा. पण कडका असलो तरी कोणी माझ्याशी मारामारी करायच्या भानगडीत पडायचा नाही. समोरचा माझ्यापेक्षा चारपटींनी असला तरी मी त्याला बुकलून काढायचो. कडका आहे पण काय सॉल्लिड मारामारी करतो असं जेव्हा मित्र म्हणायचे तेव्हाच काय ते अंगावर मूठभर मांस चढायचं.

कोणी सांगितलं कि कराटे केले की समोरच्याला मारता पण येतं आणि ऑटोमॅटिकली बॉडी पण बनते. शाळेत कराटे स्वस्त दरात शिकवायचे म्हणून कराटे मध्ये नाव घालायचं ठरवलं तर आमच्या मातोश्रीनी "कराटे करशी नी आमकाच तंगडी घालून पाडशी" म्हणून परवानगी नाकारली. शेवटी हो ना करता एकदा कराटेला जायची परवानगी मिळाली. २ वर्षे हू हा करून अर्ध्या फूटाने उंची, ५-६ किलोमीटर पळण्याचा स्टॅमिना आणि एक नारंगी पट्टा एवढी कमाई केली पण अंगावरची चरबी जैसे थे. कराटे डोक्यात जायला लागले होते. शेवटी १० वीचं वर्ष म्हणून कराटे बंद करण्यात आले.

दहावीच वर्ष बाकीच्या १०वीच्या विद्यार्थ्यांचं जितक्या रोमॅण्टिकली जातं तितकच आमचही गेलं. नंतर महाविद्यालयात गेलो तर तिथे आमचा काटकपणा आमच्याच डोळ्यात खुपायला लागला. महाविद्यालयात जिमखाना होता. ४ टी टी टेबल्स, ८-९ कॅरम आणि १०-१० पौंडाचे दोन डंबल असं त्या जिमखान्याचं रूपडं होतं. कॅरम किंवा टी टी साठी वाट बघताना कधी त्या डंबेल्स्ना उचललं तेवढच. ते पण धड उचलता यायचे नाहीत. शेवटी ठरवलं कि आता जिम लावलीच पाहिजे. घराजवळची जिम महिन्याला ५० रूपये घेत होती. ते घरात परवडत नव्हतं. त्यामुळे चालत ४५ मिनिटे दूर असलेल्या आणि महिना १५ रुपये घेणाऱ्या जिममध्ये नाव नोंदवणी करण्यात आली. माझ्यासारखी अजून ५ टाळकी तयार झाली. सकाळी पाच वाजता उठून ४५ मिनीटं एकमेकांशी गप्पा मारत (आणि शिव्या देत) जिमला जायचं, सहा ते सात असा एक तास व्यायाम करायचा असा प्लॅन ठरला. पण एक गोची होती. जिमच्या बाजूला एक महाविद्यालय होतं. सकाळची बॅच सातची असायची, त्यामुळे साडे सहा पासून महाविद्यालयीन कन्यांचे झुंडच्या झंड जिमच्या बाजूच्या रस्त्याने जायचे. या अर्ध्या तासात जिममधील सगळी उपकरणं वापरण्यासाठी उपलब्ध असत कारण सगळे पैलवान तेवढ्या वेळात जिमच्या बाहेर असलेल्या पुल अप रॉडवर तरी असायचे नाही तर उगाच स्ट्रेचिंग करत उभे राहायचे. आम्हीही त्याला अपवाद कसे असणार :) तरी आपलं एक तास नाही तर अर्धा तास व्यायाम व्हायचा. चार पाच दिवस व्यायाम करून आल्यावर अंगावर किती मांस चढलय ते उगाच आरशासमोर बघत राहायचो. महिना व्यवस्थित गेला. मग हळूहळू सहा टाळक्यांची पाच, पाचाची चार, चाराचे तीन झाले. दिड महिन्यानंतर पहाटे पाचला झापडं उघडेनाशी झाली. त्यात पावसाळा सुरू झाला आणि झापडांना न उघडण्यासाठी सबळ कारण मिळालं. शेवटी उरलेली ३ टाळकीही घरी झोपा काढू लागली. हाडाची काडं तशीच राहिली आणि वरून घरातून जिमवर घातलेले पैसे फुकट घालवले म्हणून पावलो पावली उद्धार होत राहिला तो वेगळाच.

त्यानंतर पुढची चार वर्षे जिमचं तोंडदेखील पाहिलं नाही. कॉलेज संपताच बंगलोरला (हो बंगलोरच, मी गेलो तेव्हा ते बेंगलूरू झालं नव्हतं) नोकरी मिळाली. तिथे इतर लोकांच्या मानाने मी १२ वीतला मुलगाच वाटायचो. माझा एक रूममेट जिमला जायचा. शेवटी त्याच्याबरोबर जायला लागलो. अगदी इन्स्ट्रक्टर सुद्धा लावला. त्याने सांगितलं कि भात आणि डाळ भरपूर खा. त्याला बिचाऱ्याला माहित नव्हतं की मी जितका डाळ भात दिवसाला खायचो बहुधा त्याच कुटूंब तेवढा आठवड्याला खात नसेल. त्याला माझ्या खाण्याबद्दल सांगितलं तेव्हा फक्त त्याचे डोळे पांढरे व्हायचे बाकी होते. त्यानंतर प्रोजेक्ट प्रेशरच्या नावाखाली ती जिमदेखील कधी बंद झाली ते कळलं नाही.

शेवटी ते जिमचं भूत मी माझ्या मानगुटीवरून काढून टाकलं. आपल्याला बॉडी बनवून कुठे मारामारी करायला जायचं नाहीय हे स्व:ताला समजावलं. बॉडी बिल्डींगपेक्षा फिटनेस महत्वाचा आहे हे मनाला पटवलं. आज रोज बऱ्यापैकी अंतर चालणं, लिफ्ट न घेता जिन्याने चढणं, बऱ्याच लॉंग डिस्टन्स मोटर सायकल राईड्स करणं, अधून मधून क्रिकेट खेळणं असं करून मी आजपर्यंत माझा फिटनेस टिकवून आहे, पण अंगावर मांस कधी चढलं नाही ते नाहीच.